आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोटीत प्राण्याच्या झुंजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोकणात पर्यटनाला जावे आणि समुद्राचे सौंदर्य अनुभवावे असे म्हणतात. बोटीतून होणारा प्रवास काय असतो, याचा अनुभव अनेकांना ब-याचदा येतो; पण याकडे सर्वच जण सजगपणे पाहतात असे नाही. काही मरीन सर्व्हिसेस अनेक वर्षांपासून वेश्वी, कोलमांडले, दाभोळ, धोपावे भागातील बाणकोट समुद्र खाडीत लहान-मोठ्या बोटीतून जलवाहतूक करत आहेत. यातील ब-याचशा बोटी जुन्या झालेल्या असून, या बोटींवर एकाच वेळी लहान, मोठी वाहने, पशुपक्षी, सामान चढवले जाते. त्यामुळे प्रवाशांना बोटीवर दाटीवाटीने उभे राहावे लागते. बोटींमध्ये पुष्कळदा जड वाहने एका बाजूस उभी केली जातात. परिणामी या बोटी एका बाजूला कलण्याची शक्यता नाकारता येत नाही. लांबवरचा वळसा टाळण्यासाठी पर्यटक व स्थानिक लोक मोठ्या संख्येने बोटींमधून खाडी पार करून पुढील प्रवासास जातात. मात्र, त्यांच्यासाठी या बोटींवर जीवरक्षक व इतर अत्यावश्यक सुविधा उपलब्ध असत नाहीत. अशा बोटींवर जनावरेही असतात. समुद्रातून बोट मार्गक्रमण करत असताना अचानकच कोंबड्या, म्हशी, बैलाच्या चित्तथरारक झुंजी किंवा टकरी सुरू होतात आणि बोटींवर एकच हलकल्लोळ उडतो.

सार्वजनिक वाहनांमधून पशुपक्ष्यांची ने-आण करताना त्यांना जेरबंद करून न्यावे हा नियम पाळला जात नाही. गेल्या 20 ते 25 वर्षांत तेथील जलवाहतूक कित्येक पटींनी वाढलेली आहे. बोटींपर्यंत जाण्यासाठी किना-यांवर सुरक्षित, पक्के, मोठे रस्ते नाहीत. बोटींमध्ये वाहने चढवण्या-उतरवण्यासाठी पुरेशी जागा नाही. एखादे मिनी टायटॅनिक घडण्याआधी जलवाहतूकदार आणि प्रशासनाने काळजी घेणे आवश्यक आहे. कोकणात पर्यटनाला जाणा-या पर्यटकांची संख्या आता वाढते आहे. तेथील नैसर्गिक सौंदर्याचा आनंद पर्यटकांना मनमोकळेपणांने लुटता येईल. कोकणाला नैसर्गिक समुद्रकिना-यांचे सौंदर्य लाभलेले आहे. त्याचा आनंद तेथे गेल्यानंतर अनुभवावा लागतो.