आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाव्य युतीत मोठा भाऊ कुणीच नाही; दोघेही जुळे!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये नितीशकुमारांच्या जदयुबरोबर भाजपने युती करून जागावाटपात फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला अंमलात आणल्यानंतर महाराष्ट्रातही शिवसेना-भाजप युतीची चर्चा पुन्हा एकदा जोमाने सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे तसे संकेतही देऊन टाकले आहेत. राज्यातील ही संभाव्य युती बिहारप्रमाणे होणार की, पुन्हा जागावाटपावरून त्यांच्यात त्रांगडे होणार, याची उत्सुकता दाटून आलेली असतानाच नगर जिल्ह्यामध्येही संभाव्य युतीच्या हालचालींमुळे राजकीय पातळीवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. नगर महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना आणि या दोन्ही पक्षांचे उमेदवार जवळपास निश्चित होत आलेले असताना राज्यात अशी युती झाली, तर त्याचा नेमका परिणाम महापालिका निवडणुकीवर कसा होईल, याची प्रचंड उत्सुकता नगरमध्येसुद्धा आहे. 

 

नगर जिल्ह्याच्या राजकारणाची चवच काहीशी निराळी आहे. ती कधी गोड असते, तर कधी तिखट. कधी खारट असते, तर कधी तुरट. आणि अशा या संमिश्र चवीच्या राजकारणामध्ये जेव्हा अनपेक्षितपणे काही गोष्टी घडू लागतात, तेव्हा त्याची सरमिसळ होत. त्यामुळे राजकारणाची एक वेगळीच अशी आंबट-तुरट चव तयार होते. सध्या नगर जिल्ह्यात नेमका असाच प्रकार झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच युतीची संभावना व्यक्त केली.तशा हालचाली मात्र त्याआधीच सुरू झाल्या त्या नगर जिल्ह्यातूनच! नगर जिल्हा अशा अनेक नव्या राजकीय समीकरणांना जन्म देणारा जिल्हा आहे. उद्या युतीचं नवं समीकरण जर पुन्हा अस्तित्वात आलं, तर त्याची मुहूर्तमेढ नगर जिल्ह्यातच रोवली गेली होती हे लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. त्याची कारणेही काहीशी अशीच आहेत. 

 

गेला पंधरवड्यात देशपातळीवर अतिमहत्त्वाचे स्थान असणाऱ्या आणि निर्णय क्षमतेमध्ये मातब्बर असणाऱ्या तीन प्रमुख दिग्गजांनी जिल्ह्याचा दौरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीला येऊन गेले. त्यांच्यापाठोपाठ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नगरमध्ये मेळावा झाला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचाही नगर शहरामध्ये दौरा झाला या तीनही दौऱ्यांचा आपापसात तसा विशेष संबंध नसला, तरी हे तीनही दौरे समन्वय साधून झालेले आहेत, याचा अंदाज आल्याशिवाय रहात नाही. गेल्या १९ ऑक्टोबर रोजी साईबाबा जन्म शताब्दी वर्षाच्या सांगता समारोहाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये आले होते. त्यांच्या उपस्थितीत घरकुल वाटपाचा कार्यक्रम झाला. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच झालं होतं हे तर नक्की! अवघ्या दोन अडीच तासांच्या शिर्डी दौऱ्यात साईबाबांच्या दर्शनाबरोबरच पंतप्रधानांनी अनेक विषयांना स्पर्शही केला. त्यातच काही संकेत दिले. काही गोपनीय चर्चा देखील झाल्या आणि त्या अनुषंगाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली. 

 

नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यामध्ये त्यांच्यासमवेत व्यासपीठावर झळकण्यासाठी किंबहुना एअरपोर्टवर त्यांचे स्वागत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच भाजप नेत्यांची जी झुंबड उडाली होती, ते पाहिल्यानंतर कोणी आहे ते तिकीट निश्चित करण्यासाठी, कोणी तिकीट मिळवण्यासाठी, तर कोणी नव्याने प्रवेश करण्यासाठी इच्छुक असल्याचे दिसून आले.

 

अर्थात या सर्व छोट्या-मोठ्या बाबींकडे नरेंद्र मोदी फारसं लक्ष देत नसले, तरी त्यांच्या नजरेसमोर राहण्याची धडपड ज्या नेत्यांनी अहमहमिकेने केली, त्यातून काही वेगळे संदेश लोकांपर्यंत गेले आहेत हे तर नक्की. याचं एक उदाहरणच द्यायचं झालं, तर मोदींसोबत व्यासपीठावर शिवाजी कर्डिले सातत्याने दिसले. पण विद्यमान खासदार दिलीप गांधी मात्र चित्रीकरणात कुठे दिसले नाहीत. शिवाजी कर्डिले सातत्याने डॉ. सुजय विखे यांना भाजपमध्ये येण्याचे आमंत्रण देत आहेत. त्याचबरोबर गांधी यांच्या विरोधात अजाणतेपणाने का होईना, जिथे कुठे बोलण्याची संधी मिळेल ती सोडत नाहीयेत. याचा अर्थ सर्व सामान्य नगरकरांनी नेमका काय घ्यायचा? पाथर्डी-शेवगाव मतदारसंघांमध्ये राजळे विरुद्ध गांधी असा एक नवा संघर्ष उदयास येऊ पाहतो आहे. या संघर्षातही शिवाजी कर्डिले यांची काही सुप्त रणनीती तर नाही ना? मध्यंतरी याच मतदारसंघातले एक मातब्बर नेते 'नागपूर'ची वारी करून आले. या वारीचा आणि कर्डिले यांच्या समारंभात वावरण्याचा काही परस्पर संबंध तर नाही ना? असे अनेक नवनवीन प्रश्न मोदींच्या दौऱ्यामुळे नव्याने उपस्थित झालेेले आहेत. 

 

मोदींचा हा दौरा झाल्यानंतर त्यापाठोपाठ २१ तारखेला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नगरमध्ये मेळाव्याचं आयोजन केलं. भर दुपारच्या उन्हात चांगली गर्दी या मेळाव्याला जमली होती. पारनेर -श्रीगोंदे- कर्जत-जामखेड या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील तालुक्यांमधून असलेली उपस्थिती लक्षणीय होती.

 

नेमके याचे कारण काय? तर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी श्रीगोंद्यातील ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांनाच मिळणार, अशी वंदता या दौऱ्याच्या आधी केली गेली. त्यामुळे नगरच्या मेळाव्यात बहुतेक घनश्याम शेलार यांचे नाव लोकसभेचे उमेदवार म्हणून शिवसेनाप्रमुख जाहीर करतील, अशी अपेक्षा होती आणि त्यासाठीच शेलार यांनी आपले शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. प्रत्यक्षात मात्र उद्धव ठाकरेंनी राज्य आणि देश फिरवून आणला पण; भाषणामध्ये लोकसभा उमेदवारीची घोषणा, महानगरपालिका निवडणूक यापैकी एकही स्थानिक विषय मांडला नाही. महापालिका निवडणूक लढवा आणि स्वबळावर सत्ता आणा, असा नेहमीचा ठेवणीतला सल्ला द्यायला ते विसरले नाहीत.

 

 या मेळाव्याच्या आधी उमेदवारीची नुसतीच हवा करून शिवसेनेने नेमके काय साधले, याचं उत्तर कालपर्यंत मिळालं नव्हतं. ते उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यातून सहजगत्या मिळून गेलं. शिवसेनेनेही आता हिंदुत्वाचा मुद्दा परत एकदा लावून धरायला सुरुवात केली आहे. हे उद्धव ठाकरेंच्या शिर्डी आणि नगर या मेळाव्यातून समोर आलं. नगरच्या मेळाव्यात तर प्रभू रामचंद्रांची मूर्तीच व्यासपीठावर विराजमान होती. त्यातून शिवसेनेने जो संदेश दिला; तो संदेश आणि उमेदवाराची घोषणा न करणे याचा आपापसातील संबंध लक्षात घेतला, तर शिवसेनेची वाटचाल सुद्धा युतीच्या दिशेनेच आहे हे लक्षात आल्याशिवाय राहणार नाही.

 

उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ सोमवारी २२ तारखेला सरसंघचालक मोहन भागवत नगरच्या दौऱ्यावर आले होते. प्रज्ञाचक्षू मुकुंदकाका जाटदेवळेकर यांच्या सेवा गौरव समारंभाचे निमित्त होतं. सकाळीच नगरमध्ये आल्यानंतर त्यांनी आधी सर्व स्वयंसेवकांचा एक मेळावा घेतला. त्या मेळाव्यामध्ये स्वयंसेवक नेमका कसा असावा? यावर त्यांनी भाष्य केलं. काही प्रश्नोत्तरे घेतली आणि मार्गदर्शनही केलं. याचा सविस्तर तपशील हाती आलेला नसला, तरी या मेळाव्यातून संघ स्वयंसेवकांना योग्य तो संदेश नक्कीच दिला गेला असणार, याबाबत कुठलीही शंका बाळगायचे काहीच कारण नाही. नेमकं निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे तीनही नेते नगर जिल्ह्यामध्ये येतात, मेळावे घेतात आणि गोपनीय असे मेसेज आपल्या कार्यकर्त्यांना देऊन जातात. त्यातच निवडणुकीच्या राजकारणाची परिवर्तनवादी बीजे रोवली गेली आहेत हे लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. अयोध्येत राम मंदिर बांधणे भाजपला शक्य नसेल; तर आम्ही बांधू! असं जेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात, तेव्हा त्याचा अर्थ शिवसेना खरच राम मंदिर बांधायला जाणार आहे, असा नसून आपण दोघं मिळून बांधू, असा स्पष्ट अर्थ आहे. हा अर्थ आणि त्या अर्थामागचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नगरचा मेळाव्यामध्ये व्यासपीठावर पहिल्यांदाच प्रभू रामचंद्रांची मूर्ती ठेवण्यात आली होती. या मूर्तीचे पूजनही उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं होतं. 

 

शिवसेना आणि भाजपमधील वाढता तणाव संपुष्टात आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुन्हा एकदा मध्यस्थाची भूमिका घेतल्याचे दिसून येऊ लागले आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी हा दौरा झाल्यानंतरच काही सूचना भाजपला दिला असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळेच स्वबळाचा नारा देणाऱ्या भाजपवर देखील शिवसेनेशी युती करण्यावाचून तरणोपाय नाही, अशी भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे. त्याचेच प्रत्यंतर देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातून स्पष्टपणे दिसून आलेलं आहे. राज्यात अशी युती होणार असेल, तर नगर जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांचे भवितव्य काय असेल? असा नवा प्रश्न आता उपस्थित होणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवायची आहे, असे गृहीत धरून आपापल्या इच्छुक उमेदवारांमध्ये निवडणुकीची 'हवा' भरण्याचे काम सुरू केलेलं होतं. त्याला आता खीळ बसणार आहे. पूर्वीच्या युतीच्या जागावाटपात विधानसभा मतदारसंघ भाजपकडे होते ते आता निश्चितच भाजपकडे राहतील आणि उर्वरित मतदारसंघ शिवसेनेकडे राहतील. 

 

मागच्या निवडणुकीमध्ये युती तुटण्याच्या कारण होतं 'मोठा' भाऊ कोण? ते आता राहिलेलं दिसत नाही. गोपीनाथ मुंडे यांनी प्रमोद महाजन असताना भाजपने शिवसेनेला मोठा भाऊ मानलं होतं पण नरेंद्र मोदींच्या झंझावातानं, तर भाजपची भाषा बदलली आणि ते शिवसेनेला 'छोटा' भाऊ म्हणू लागले. या छोट्या भावाला जागावाटपात किती जागा द्यायच्या हा प्रश्न निर्माण झाला आणि त्यामुळे युती फिस्कटली.आता छोटा भाऊ किंवा मोठा भाऊ असे राजकीय समीकरण अस्तित्वात राहणार नाही. 

 

युतीतले दोन्ही पक्ष जुळ्या भावाप्रमाणे राहतील आणि त्याच अनुषंगाने बिहारमधील जदयु बरोबर झालेला फिफ्टी-फिफ्टी जागावाटपाचा फॉर्म्युला महाराष्ट्रात देखील लागू होईल, असा एक अंदाज आहे. हा फॉर्म्युला मान्य झाला तर विधानसभेसाठी भाजपकडे असलेल्या जागांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. आता हे मतदारसंघ नेमके कोणते आणि कोणत्या मतदारसंघांमध्ये उमेदवारीसाठी आपण प्रयत्न करायचा, याचा अभ्यास भाजप आणि शिवसेनेकडून तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या भावी आमदारांनी केलेला बरा..! 

 

- अनिरुध्द देवचक्के 
aniruddha.devchakke@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...