आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वर्गीय आनंदाचा 'नगरी नाताळ'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे यरुशलेम म्हटलं जाणाऱ्या अहमदनगरच्या, किंवा बोलीभाषेत नगरच्या, नाताळचं ख्रिसमस रॅली आणि कँडल रॅली हे वैशिष्ट्य! नगरचा नाताळ हा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, यात सर्व धर्मांचे नागरिक आनंद लुटतात.

 

दिवाळीच्या सणाप्रमाणेच नाताळात ख्रिस्ती बांधव घरोघरी करंजी, लाडू, शंकरपाळे, चिवडा हे पदार्थ करतात. त्यात विशेष म्हणजे नगरमध्ये घरोघरी केक व डोनट तयार केले जातात व ते एकमेकांना भेट म्हणून दिले जातात. हेही नगरच्या नाताळाचे एक वेगळेपण म्हणावे लागेल.

 

अहमदनगर वा नगरला महाराष्ट्राचं यरुशलेम मानलं जातं. या भागात ख्रिस्ती धर्माचा प्रचार व प्रसार अनेक वर्षांपासूनचा. अशा नगरचा नाताळ ख्रिस्ती बांधवांबरोबरच सर्वधर्मियांसाठी स्वर्गीय आनंद देणारा सण आहे. नाताळ हा मुख्यत: प्रीतीचा, प्रीतिभाव वृद्धिंगत करणारा, मना-मनात प्रेमाची भावना फुलवणारा व सामाजिक एकोपा निर्माण करणारा सण. नगरच्या नाताळाला डिसेंबर महिना लागला की सुरुवात होते. डिसेंबर महिन्यातील चार रविवार हा प्रभू येशू यांचा आगमन समय म्हणून आेळखला जातो. या चार रविवारी आशा, प्रीती, शांती, व आनंद या विषयांवर आधारित चर्चमध्ये संदेश देत नाताळाची सुरुवात होते. २५ डिसेंबरला मुख्य धार्मिक सोहळा असतो. चर्चमधील धार्मिक उपासना हा नाताळचा प्रमुख केंद्रबिंदू अाहे. ख्रिस्ती समाज संस्थांच्या शाळा, महाविद्यालयांमध्ये नाताळावर आधारित धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात. त्यामुळे तेथून लहान मुलांच्या नातळाला सुरुवात होते. शाळांना सुट्या लागतात. त्या वेळेपासून घरोघरी व चर्चमध्ये ख्रिस्त गव्हाणी देखावे तयार केले जातात. चर्चमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. तसेच चर्चमध्ये व विविध ख्रिस्ती वसाहतींमध्ये मोठ्या आकारांचे तारे, चांदण्या लावल्या जातात. त्याचबरोबर चर्चची अंतर्गत सजावट केली जाते.

 

स्वातंत्र्यपूर्व काळात नगर शहरात विविध मिशनरी संस्था कार्य करीत होत्या. त्यातील प्रामुख्याने रोमन कॅथोलिक, मराठी मिशन, एसपीजी मिशन, साल्वेशन आर्मी या पंथियांची चर्च आहेत. त्यामुळे रोम, इंग्लड, अमेरिका या देशातील मिशनरींचा धार्मिक, शैक्षणिक आरोग्य व समाज सुधारण्याचा प्रभाव नगरवर होता. नगर शहरात तारकपूर येथील सेंट सेव्हिअर्स कॅथेड्रल, ख्रिस्त गल्ली येथील ह्यूम मेमोरिअल चर्च, हातमपुरा येथील सीएनआय फर्स्ट चर्च, नेता सुभाष चौकातील कोकराची मंडळी, भिंगार येथील ख्राईस्ट चर्च तसेच सेंट जॉन चर्च व कलेक्टर कचेरीजवळ सेंट अॅन्स चर्च या प्रमुख चर्चचा समावेश आहे. याच्या व्यतिरिक्त उपनगरांसह जिल्ह्यात अनेक चर्च आहेत. मिशनरींची आत्ताची पिढी नगरच्या चर्चमधील ख्रिस्त बांधवांना नाताळाच्या शुभेच्छा पाठवित असतात. नगरमध्ये नाताळात सर्व चर्चमध्ये लहान मुलांचे, युवक व महिलांचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात. नाताळाच्या निमित्ताने शहरात ख्रिसमस रॅली, कँडल लाइट रॅलीचे आयोजन करून ख्रिस्त प्रीतीचा संदेश शहरवासीयांना दिला जातो. २४ डिसेंबरला मध्यरात्री नाताळाची पूर्व उपासना होते. २५ डिसेंबरला येशू ख्रिस्त जन्मदिनी नाताळाची मुख्य उपासना चर्चमध्ये होते. त्याचबरोबर नाताळचा संदेश दिला जातो. नाताळ गीते गायली जातात व नाताळच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. नाताळनिमित्त भारतातील सर्व नागरिकांसाठी तसेच राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व अधिकाऱ्यांसाठी प्रार्थना केली जाते. विविध चर्चच्या माध्यमातून नाताळनिमित्त गरीब व वंचित लोकांना तसेच वस्तीगृहातील गरीब विद्यार्थांना भेटवस्तू व भोजन दिले जाते. विशेष म्हणजे नगर शहरात इतर धर्मिय सामाजिक संस्था व वैयक्तिक पातळीवर नाताळ निमित्ताने भेटवस्तू देतात. नगर शहरातून नोकरीव्यवसायानिमित्त देशासह अन्य देशात गेलेले ख्रिस्ती बांधवही या सणासाठी आवर्जून घरी येतात. नाताळच्या दुसऱ्या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र चर्चमार्फत नाताळ सहलीसाठी जातात. या सहलीच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधतात. तसेच विविध सामाजिक संस्थांच्या ठिकाणी सहलीचे आयोजन करून तेथील वंचितांना भेटवस्तू व भोजन दिले जाते. 

बातम्या आणखी आहेत...