आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वसमावेशक स्त्रीवादी नेतृत्व

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनिश तोरे

एकीकडे जगात सामाजिक तेढ वाढत असताना जेसिंडा हिजाब घालून ख्राइस्टचर्चमधील मशिदीत जातात. देश जोडण्याचा प्रयत्न करतात. पाश्चिमात्य देशांत मुस्लिमांबद्दल दुजाभाव होत असताना त्या मात्र ‘आपल्या देशात आपण विरुद्ध ते असा भेद नाही. आपणच ते आहोत आणि ते पण आपल्यातलेच आहेत,’ अशी मांडणी करतात. केवळ भारतालाच नव्हे, तर जगालाही  अशा सर्वसमावेशक स्त्रीवादी नेतृत्वाची गरज आहे.


न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी २०१५ मध्ये ‘होय, मी स्त्रीवादी आहे’ या शीर्षकाचा लेख लिहिला. त्यात त्या म्हणतात, स्त्रियांच्या एका मेळाव्यामध्ये त्यांनी स्वतःची ओळख ‘स्त्रीवादी’ म्हणून करून दिली आणि आजूबाजूच्या स्त्रिया त्यांच्याकडे आश्चर्याने बघायला लागल्या. पण स्त्रीवादाची जेसिंडा यांची व्याख्या खूप सोपी आहे. त्या लिहितात, “तुम्ही जर स्त्री-पुरुष समानता मानत असाल तर तुम्हीसुद्धा स्त्रीवादीच आहात. याचाच अर्थ पुरुषही स्त्रीवादी असू शकतो.’ जेव्हा एखादी ‘स्त्रीवादी’ म्हणवणारी व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होते तेव्हा राजकारणावर आणि राजकीय नेतृत्वावर नेमका काय फरक पडतो हे जाणून घेण्यासाठी जेसिंडा अर्डर्न याचा राजकीय प्रवास दिशादर्शक ठरतो.

१५ मार्च २०१९ ला न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्चमधील मशिदीत एका माथेफिरूने गोळ्या झाडून पन्नासहून अधिक लोकांचे प्राण घेतले. अमेरिकेमध्ये ओसामा बिन लादेनने घडवून आणलेल्या ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर, अमेरिकेच्या शासनव्यवस्थेने ‘दहशतवादी म्हणजे मुसलमान’ असे समीकरण जगभर पसरवले आणि ‘दहशतवादाविरुद्ध युद्ध’ पुकारले. न्यूझीलंडमधील दहशतवादी हल्ल्यानंतर जेसिंडाही तशीच भूमिका घेतील अशी अपेक्षा सर्वांना होती. पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना विचारले, ‘ते काय मदत करू शकतात? तेव्हा त्यांचे उत्तर होते, “जगभरातल्या मुस्लिम समुदायाबद्दल प्रेम आणि सहानभूती व्यक्त करा... तेवढंच पुरेसं आहे.’ जेसिंडा यांच्या या उत्तरातून त्यांच्या राजकारणाची स्त्रीवादी धाटणी दिसून येते. मुळात स्त्रीवादाची अशी मांडणी आहे की, जगातील सर्व संघर्ष आणि हिंसेचे मूळ पुरुषसत्ताक विचारसरणीत आहे. या विचारसरणीनुसार, पुरुषांना त्यांचे पौरुषत्व सिद्ध करण्यासाठी आक्रमकतेचे प्रदर्शन करावे लागते. आक्रमकतेशी पुरुषत्वाची नाळ जोडली गेल्याने तंटे, युद्ध, संघर्ष, मारामाऱ्या होत राहतात. म्हणूनच स्त्रीवादी दृष्टिकोनातून कधीही प्रतिक्रियात्मक हिंसेचेही समर्थन केले जात नाही. म्हणूनच ख्राइस्टचर्च दहशतवादी हल्ल्यानंतर एका आठवड्याच्या आत जेसिंडा यांनी बंदुकीच्या खरेदी-विक्रीवर कायदेशीर बंधने आणत भविष्यातील हिंसक घटनांची शक्यता कमी केली. याउलट, डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेतील नागरिकांना पिस्तूल-बंदुका बाळगण्याचा अधिकार मिळावा, अशी मांडणी करीत आहेत. 

ख्राइस्टचर्च घटनेनंतर जेसिंडा यांनी आणखी एक जगावेगळी भूमिका घेतली. त्यांच्या लक्षात आले की, दहशतवादी कृत्य करणाऱ्यांचे मुख्य उद्दिष्ट स्वतःला, आपल्या संघटनेला आणि कट्टरवादी विचारसरणीला प्रसिद्धी मिळवून देणे हे असते. त्यामुळे दहशतवाद्याचा नामोल्लेख टाळत त्या म्हणाल्या, ‘आपल्या नावाच्या उच्चाराने लोकांच्या मनात भीती निर्माण व्हावी हीच गोष्ट त्याला हवी आहे. ती मात्र त्याला आम्ही कधीच देणार नाही. ती व्यक्ती आमच्या सर्वांसाठी अज्ञात आणि अनोळखीच राहील.’ जेसिंडा यांनी दहशतवाद्याच्या नावाचा उल्लेख टाळला. त्याच्या नावाचे भय निर्माणच झाले नाही, कारण तो दहशतवादी कोण, त्याचे उद्दिष्ट काय इत्यादी बाबींवर लोकांनी विचार करणे सोडून दिले. आणि पूर्ण देशाचे लक्ष जेसिंडा यांनी पीडितांच्या मदतीकडे वळवले. एका अर्थाने त्यांनी दहशतवादाला अनुल्लेखाने परास्त केले.

जेव्हा २०१८ मध्ये जेसिंडा यांना अपत्यप्राप्ती होणार असल्याचे जगाला कळाले तेव्हा त्यांना मीडियाने असा प्रश्न विचारला, जो फक्त स्त्रियांनाच विचारला जातो, पुरुषांना नाही. तो म्हणजे, “तुम्ही आई झाल्यावर तुमची कौटुंबिक जबाबदारी आणि सार्वजनिक जबाबदाऱ्यांत ताळमेळ कसा ठेवणार?’ त्याचं उत्तर देताना त्या म्हणाल्या, “या प्रकारच्या आव्हानांना स्त्रियांना नेहमीच तोंड द्यावे लागते. हे आमच्यासाठी काही नवीन नाही. आणि हे आव्हान पेलणारी मी काही पहिली स्त्री नाही.’ त्यांच्या या उत्तरातून दोन बाबी लक्षात येतात. एक म्हणजे त्यांनी ‘मातृत्वाचे गौरवीकरण’ टाळले. त्यांच्या दृष्टीने “आई’ ही ओळख त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंपैकी एक पैलू आहे हे त्यांनी ठसवले. आणि दुसरं म्हणजे, स्त्रियांचे प्रजनन प्रक्रियेमधील स्थान त्यांच्या सार्वजनिक आयुष्यातील भूमिकेच्या आड येत नाही, हे त्यांनी दाखवून दिले. 


स्त्री नेतृत्व पुरुषांपेक्षा पर्यावरणाच्या प्रश्नांकडे अधिक लक्ष देऊ शकते, अशी मांडणी काही स्त्रीवादी करतात. ही गोष्ट जेसिंडा यांच्याबाबतीत खरी ठरते. त्यांनी न्यूझीलंडच्या संसदेत सर्वसंमतीने असा कायदा मंजूर करून घेतला की, हवामान बदलाच्या संकटाशी झुंज देण्यासाठी २०५० पर्यंत आपला देश ‘शून्य कार्बन उत्सर्जन’ करेल.


मुळात जेसिंडा यांच्यासारखे स्त्रीवादी राजकीय नेतृत्व उदयास येते कसे हेही महत्त्वाचे आहे. १८९३ मध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क देणारा न्यूझीलंड हा जगातला पहिला देश ठरला. म्हणून स्त्रियांच्या राजकीय सहभागाचा वारसा या देशाला फार पूर्वी लाभला आहे. पण प्रत्येक वेळी स्त्री नेतृत्व म्हणजे स्त्रीवादी नेतृत्व नसते. इंदिरा गांधी जेव्हा पहिल्यांदा भारताच्या पंतप्रधान झाल्या तेव्हा त्यांची ‘गुंगी-गुडिया’ अशी खिल्ली उडवली जायची. पुढे त्यांनी बांगलादेश युद्ध, अणुचाचणी, आणीबाणी असे कठोर आणि ‘पुरुषी’ निर्णय घेतले. 

तेव्हा त्यांच्या नेतृत्वशैलीचे वर्णन एका वृत्तपत्राने “मंत्रिमंडळात असणारा एकमेव पुरुष म्हणजे इंदिरा गांधी’ या शब्दांत केले. स्त्री-पुरुष समानता हे नक्कीच स्त्रीवादाचे ध्येय आहे, पण या तत्त्वाचा चुकीचा अर्थ असा लावला जातो, की स्त्रीने पुरुषासारखे बनणे. म्हणूनच इंदिरा गांधी यांनी स्त्री नेतृत्व जरी दिले तरीही ते ‘स्त्रीवादी’ नेतृत्व म्हणता येणार नाही. जेसिंडा अर्डर्न यांचे नेतृत्व मात्र नक्कीच स्त्रीवादी वाटते. 

निष्कलंक वाटणाऱ्या जेसिंडा यांच्या नेतृत्वावर काही प्रश्नचिन्हेही उपस्थित केली गेली. उदा. ख्राइस्टचर्चमधील हल्ल्यानंतर दहशतवाद्यांची ओळख गुप्त ठेवण्याच्या त्यांच्या भूमिकेवर काही जणांनी आक्षेप नोंदवला. पोलिस तपासानंतर ही माहिती समोर आली की दहशतवादी कृत्य करणारी व्यक्ती मुस्लिम नसून स्थानिक श्वेतवर्णीय तरुण होता. त्यामुळे काहींनी प्रश्न उपस्थित केला की, जेसिंडा यांनी दहशतवाद्याची ओळख लपवण्यामागे उदात्त स्त्रीवादी दृष्टिकोन होता की श्वेतवर्णीय बहुसंख्याकांचे मनोबल वा आत्मसन्मानाला धक्का बसणार नाही याची काळजी त्या घेत होत्या? 

अशा चर्चा होत असल्या तरी एकीकडे जगात सामाजिक तेढ वाढत असताना हिजाब घालून जेसिंडा ख्राइस्टचर्चमधील मशिदीत जातात, देश जोडण्याचा प्रयत्न करतात. पाश्चिमात्य देशांतही मुस्लिमांबद्दल दुजाभाव केला जात असताना जेसिंडा मात्र देशाला संबोधताना “आपल्या देशात आपण विरुद्ध ते असा भेद नाही. आपणच ते आहोत, ते पण आपल्यातलेच आहेत,’ अशी मांडणी करतात. केवळ भारतालाच नव्हे, तर जगालाही अशा सर्वसमावेशक, स्त्रीवादी नेतृत्वाची गरज आहे.मातृत्त्वाचे गौरवीकरण कशाला?

२०१८ मध्ये जेसिंडा गर्भवती होत्या. तेव्हा त्यांना मीडियाने प्रश्न विचारला, जो फक्त स्त्रियांनाच विचारला जातो, तो म्हणजे, ‘आई झाल्यावर तुम्ही कौटुंबिक आणि सार्वजनिक जबाबदाऱ्यांत ताळमेळ कसा ठेवणार?’ त्या वेळी जेसिंडा म्हणाल्या, ‘या प्रकारच्या आव्हानांना स्त्रियांना नेहमीच तोंड द्यावे लागते. हे आमच्यासाठी नवीन नाही. आणि हे आव्हान पेलणारी मी काही पहिली स्त्री नाही.’ त्यांच्या या उत्तरातून दोन बाबी लक्षात येतात. एक म्हणजे त्यांनी ‘मातृत्वाचे गौरवीकरण’ टाळले. त्यांच्या दृष्टीने ‘आई’ ही ओळख त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंपैकी पैलू आहे हे त्यांनी ठसवले. आणि दुसरं म्हणजे, स्त्रियांचे प्रजनन प्रक्रियेमधील स्थान त्यांच्या सार्वजनिक आयुष्यातील भूमिकेच्या आड येत नाही हे त्यांनी दाखवून दिले.

लेखकाचा संपर्क : ९१४६८१९९२९
 

बातम्या आणखी आहेत...