आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इस ‘सहर’ को हुआ क्या है...?

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अनिश तोरे   

एकाच देशातल्या दोन वेगवेगळ्या घटना... अगदी लागोपाठ घडलेल्या...कमालीचे साधर्म्य म्हणजे म्हणजे दोन्ही घटनांतील दुर्दैवी नायिकांचे नावही एकसारखेच... ‘सहर’ हे ते नाव... आणि इराण हा त्या दोघींचाही देश...  एक आहे ‘सहर खोदायरी’ जी आता भविष्यात  ‘द ब्ल्यू गर्ल’ नावाने ओळखली जाणार आहे, तर दुसरी आहे  ‘सहर तबार’ जिची ‘इन्स्टाग्राम स्टार’ म्हणून असलेली ओळख आता इतिहासजमा होणार आहे... सबंध जगभरात चर्चेचा विषय ठरलेल्या या ‘सहर’चं नेमकं काय झालं?
 
एकाच देशातल्या दोन वेगवेगळ्या घटना... अगदी लागोपाठ घडलेल्या... दोन्ही घटना धर्मसत्ता, राजसत्ता आणि सामाजिक पुरुषसत्ता यांचे वर्चस्व असलेल्या आणि दोन्ही घटना स्त्रियांच्या अधिकारांची गळचेपी आणि व्यक्तिस्वातंत्र्याचे अधिकार हिरावून घेणाऱ्या... कमालीचे साधर्म्य म्हणजे म्हणजे दोन्ही घटनांतील दुर्दैवी नायिकांचे नावही एकसारखेच... "सहर' हे ते नाव... आणि इराण हा त्या दोघींचाही देश...  एक आहे "सहर खोदायरी' जी आता भविष्यात "द ब्ल्यू गर्ल' नावाने ओळखली जाणार आहे, तर दुसरी आहे "सहर तबार' जिची "इन्स्टाग्राम स्टार' म्हणून असलेली ओळख आता इतिहासजमा होणार आहे...

पहिली घटना : 
"सहर खोदायरी'ला फुटबॉलचे अतोनात वेड आणि तिचे हेच वेड जिवावर बेतले. इराणच्या धर्माधिष्ठित राजकीय प्रणालीने महिलांच्या स्वातंत्र्यावर अनेक प्रकारची बंधने लादली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे इराणी महिलांच्या फुटबॉल स्टेडियम प्रवेशावर बंदी. सहरला काहीही करून फुटबॉल मॅच बघायची आहे. कारण तिचा सर्वाधिक आवडता संघ "इस्टेघ्लाल क्लब' मैदानात उतरणार असतो. या बंदीला न जुमानता सहर पुरुषी वेष परिधान करते. शरीरावर लांब ओव्हरकोट चढवते आणि केसांवर निळ्या रंगाचा (जो तिच्या फेव्हरेट क्लबचा रंग आहे) विग लावते. तेहरानच्या आझाद स्टेडियमच्या दिशेने ती पुढे जात असतानाच सुरक्षा रक्षक तिला पकडतात, तिला कोर्टात हजर करतात, कोर्ट सहरला सहा महिन्यांची शिक्षा ठोठावते. सहरला ते सहन होत नाही आणि ती कोर्टाच्या आवारातच आत्मदहन करते. सहरला तातडीने रुग्णालयात घेऊन जातात आणि दोन आठवड्यांनी अभागी सहरचा मृत्यू होतो...

दुसरी घटना : 
सहर तबारला अँजेलिना जोलीसारखं दिसायचंय. त्यासाठी वाटेल ते करण्याची सहरची तयारी आहे. अँजेलिना जोलीसारखं दिसण्यासाठी सहरने आपल्या चेहऱ्यावर तब्बल पन्नासएक कॉस्मेटिक सर्जरी केल्या. या अट्टहासामुळे व्हायचे ते झालेच अन् सहरचा चेहरा विद्रूप झाला. खप्पड गाल, गाल फुगवून आणलेलं हसू, एखाद्या कार्टूनसारखं वरच्या दिशेला वळलेलं नाक अशा चेहऱ्याचे फोटो सहरने ‘इन्स्टा’वर शेअर केले. २२ वर्षांच्या सहर तबारने जगाचं लक्ष वेधलं तेव्हा अनेकांनी तिला अँजेलिना जोलीची ‘झाँबी' आवृत्ती किंवा ‘गरिबांची अँजेलिना जोली' म्हटलं. आपला भुतासारखा हा अवतार मेकअप आणि डिजिटल एडिटिंगच्या मदतीने साध्य करत असल्याचंही तिने सूचित केलं होतं. तिने स्वतःला अगदी एखाद्या ‘आर्ट इन्स्टॉलेशन'सारखं जगापुढे सादर केलं होतं. मात्र सहार तबारला ‘सांस्कृतिक गुन्हा, सामाजिक आणि नैतिक भ्रष्टाचार' च्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले आहे. तिच्यावर निंदनीय कृत्य करणे, हिंसा करण्यास प्रवृत्त करणे, चुकीच्या पद्धतीने पैसे कमावणे आणि तरुणांना भ्रष्टाचारासाठी प्रोत्साहित केल्याचा आरोप ठेवण्यात आला .

सहरची गोष्ट ही इराणी स्त्रीजीवन समजून घेण्यात उपयुक्त ठरते. १९५०-६० च्या दशकांत इराण हा मध्य-आशियातील सर्वात पुरोगामी समाजांपैकी एक समजला जायचा. इराणच्या ‘शाह', मोहम्मद पहलवी रजा, यांनी इराणच्या स्त्रियांसाठी शिक्षणाच्या आणि प्रशासकीय सेवेत रुजू होण्याला मान्यता दिल्या आणि  सामाजिक रूढींवर प्रखर हल्ला चढवला. अमेरिकेसारख्या पाश्चात्त्य शक्तींचा वरदहस्त असणाऱ्या इराणी ‘शाह' नी पाश्चात्त्यकरणाची मोहीमच हाती घेतली आणि सार्वजनिक ठिकाणी ‘हिजाब' वर बंदी आणली. या सामाजिक बदलांच्या मोहिमेलाच इराणची ‘श्वेत क्रांती' म्हणून ओळखले जाते. परंतु शाह यांच्या सामाजिक नीती मुळे रूढिवादी शक्तींची प्रतिक्रिया, चुकीची आर्थिक नीती आणि शाह यांच्या राजवटीत असणारा लोकशाहीचा अभाव ह्या सर्व घटकांचे रूपांतर १९७८-७९ च्या ‘इस्लामिक इराणी क्रांतीत' झाले. मात्र ही ‘क्रांती' महिलांसाठी प्रति-क्रांती ठरली. त्याचे एक प्रतीक म्हणजे नव्या शासन व्यवस्थेने पुन्हा इराणी स्त्रीवर लादलेली हिजाबची सक्ती. १९७९ पासून सुरू झालेल्या इराणी स्त्रियांच्या अधोगतीच्या प्रक्रियेमध्ये ‘ब्ल्यू गर्ल सहर'चा आत्मत्याग एक महत्त्वाचा टप्पा ठरतो.

इराणी स्त्रियांवर असलेली स्टेडियम प्रवेशाची बंदी ही कायदेशीर नसून सामाजिक रूढींच्या आधारे लादली गेली आहे. इराणमध्ये असे बंधन लादणारा कुठलाच कायदा नसल्यामुळे शेवटी सहरने पुरुषी वेष धारण केल्याने तिने ‘हिजाब-सक्ती'च्या कायद्याचे उल्लंघन केल्याचे कायदेशीर कलम ठोठावण्यात आले. स्त्रियांच्या अधिकारांची गळचेपी करण्यात धर्म-सत्ता, राजसत्ता व सामाजिक पुरुषसत्ता कशी एकवटते, ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे.

वेशभूषा बदलाच्या माध्यमातून दमनाचा विरोध करण्याची परंपरा इराणी स्त्रियांसाठी नवीन नाही. २०१७-१८ मध्ये इराणमध्ये ‘व्हाइट स्कार्फ चळवळ' सुरू झाली. या चळवळीमार्फत इराणी स्त्रियांनी पांढरे पदर घालून किंवा हिजाबचा त्याग करून, स्वतःचे फोटो सोशल मीडियावर टाकले. हा इराणी स्त्रियांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधनं आणणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध उघड उघड बंड पुकारण्याचा प्रकार होता.

सहरच्या आत्मत्यागानंतर इराणमध्ये आता ‘ओपन स्टेडियम चळवळ' सुरू झाली आहे. या चळवळीची प्रमुख मागणी म्हणजे स्त्रियांना फुटबॉल स्टेडियममध्ये बिनदिक्कत प्रवेश मिळावा. परंतु सहरचं फुटबॉलप्रेम हा इराणी-स्त्रीमुक्तीचा विषय आहे की तिच्या वैयक्तिक आवडीनिवडीचा? फुटबॉल स्टेडियम प्रवेशाच्या हक्कापेक्षा अधिक महत्त्वाचे मुद्दे इराणी स्त्रियांना भेडसावत नाहीत का, असा प्रश्न इराणच्याच काही स्त्री-संघटनांनी उपस्थित केला आहे. या चळवळीचं महत्त्व समजण्यासाठी १९३० साली काळाराम मंदिर सत्याग्रहावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भाऊराव गायकवाड यांना लिहिलेलं पत्र उपयुक्त आहे. त्यात डॉ. आंबेडकर म्हणतात की, "मंदिरात प्रवेश मिळवून दलितांनी मूर्तिपूजक व्हावे अशी माझी कदापि इच्छा नाही. परंतु मूळ प्रश्न आहे हा सर्वांसाठी सार्वजनिक स्थळांना भेट देण्याच्या समान अधिकाराचा." जी गोष्ट मंदिरांबाबत लागू होते तीच गोष्ट फुटबॉल स्टेडियम संदर्भातही खरी ठरते. त्यापलीकडे जाऊन सहर धर्म-पुरुषसत्तेच्या जोडीला छेद देत होती. रूढींच्या आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांच्या दबावाखाली स्त्रियांची मनोरंजनाची गरज आणि क्षमता दोन्हीही दाबल्या जातात. सामाजिक, धार्मिक आणि राजकीय दबावांची पार्श्वभूमी लक्षात घेता, सहरचा फुटबॉल स्टेडियममध्ये घुसण्याचा निर्धार म्हणजे तिने स्त्रियांचा ‘राइट टूू एन्जॉय' अधोरेखित करण्याचा प्रयत्न होय.

शेवटी कुठल्याही चळवळीचे उद्दिष्ट हे शासनव्यवस्थेमार्फत आपल्या मागण्या पूर्ण करून घेणे हेच असते. इराणची राजकीय शासनव्यवस्था ही इराणी महिलांच्या मागण्यांबद्दल एवढी उदासीन का राहिलेली दिसते? हा प्रश्न फक्त तात्त्विक नसून प्रासंगिकही आहे कारण सध्या मवाळ आणि सुधारणावादी छबी असणारे ‘हसन रोहानी' राष्ट्रपती असूनही इराणी स्त्री चळवळीचे मुख्य मुद्दे आणि प्रश्न मार्गी लागताना दिसत नाहीत. या प्रश्नाचे उत्तर आपल्या इराणच्या राजकीय ढाच्यामध्ये सापडतं. इराणमध्ये जरी निवडणुकांमार्फत राष्ट्रपती व संसदेचे सदस्य निवडून येत असले तरीही, इराणचे सर्वेसर्वा आहेत ‘अयोतल्लह अली खोमेनी' ज्यांना ‘सर्वोच्च नेता' हे पद आयुष्यभरासाठी बहाल केलेले आहे. धार्मिक, राजकीय, संसदीय, लष्करी सर्व बाबींबद्दल अखेरचा निर्णय हा खोमेनी ह्यांच्या सहीशिवाय शक्य नाही. खोमेनी हे शिया-इस्लाम पंथाचे जागतिक धर्मगुरू असल्याचे ठासवतात आणि त्यांची धर्म-निष्ठा ते इस्लामचे अधिकाधिक कट्टरवादी मांडणी करून सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. ज्या शासनव्यवस्थेच्या सर्वोच्चपदी अशा व्यक्तीच्या नेमणुकीची तरतूद इराणच्या संविधानाने केली आहे, त्यावरून आपण अंदाज लावू शकतो की शासनामार्फत इराणी स्त्री मुद्द्यांची सोडवणूक केवढी अशक्यप्राय गोष्ट बनली आहे. ‘मी-टूू' चळवळीत सोशल मीडियाच्या केलेल्या प्रभावी वापराबद्दल बरंच लिहिलं-बोललं गेलं. परंतु इराणमधील स्त्री-चळवळ ही अनेक वर्षांपासून मीडियाचा उपयोग कल्पकतेने करत आहे. २०१७-१८ मध्ये उदयाला आलेली ‘व्हाइट स्कार्फ चळवळ' ही बऱ्याच प्रमाणात सोशल मीडियाद्वारे चालवली गेली होती. मूळ इराणी वंशाची असलेली आणि सध्या अमेरिकेत स्थायिक झालेली ‘मासिह अलेनिजाद' हीने सोशल मीडियाद्वारे ‘व्हाइट स्कार्फ' चळवळीला प्रेरणा आणि चालना दिली. तसेच, सहरच्या दुःखद निधनानंतर सोशल मीडियाचा बहुअंगी वापर बघण्यात आला. मासिह अलेनिजादने "फिफा' या आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या सर्वोच्च संघटनेवर सोशल मीडियाद्वारे दबावतंत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि फिफाद्वारे इराण शासनव्यवस्थेवर लिंग-भेद धोरणात बदल करण्याची मागणी पुढे रेटली. सहरच्या आत्मदहनाची खबर ही शासनामार्फत दाबली जाऊ नये आणि ती जगभरच्या फुटबॉलप्रेमींपर्यंत पोहोचावी, ह्या हेतूने असंख्य इराणी नागरिक शासनव्यवस्थेची भीती न बाळगता, सहरच्या विषयी सोशल मीडियावर व्यक्त झाले. सहरच्या बलिदानाची गोष्ट इराणच्या हद्दीपार पोहोचवण्यात आणि त्याचा आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवण्यात सोशल मीडियाने महत्त्वाची कामगिरी बजावली. सहरचे हे बलिदान व्यर्थ गेले नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर हा मुद्दा चांगलाच तापल्यामुळे अखेर इराणला झुकावेच लागले. इराणमध्ये यापुढे होणाऱ्या पुरुषांच्या फुटबॉल सामन्यांना इराणी महिलांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाईल, असे वचन इराण सरकारने फिफाला दिले आहे. हा लेख वाचत असताना दोनच दिवसांपूर्वी कंबोडियाविरुद्ध झालेल्या सामन्यात स्टेडियममध्ये तब्बल चार हजार इराणी महिलांनी या सामन्याचा आनंद लुटल्याचे वृत्त आहे. 

इराणमधील स्त्री चळवळीचे दोन मुख्य प्रवाह बनले आहेत. एक प्रवाह आहे तो धर्मनिरपेक्षतावादी-उदारमतवादी स्त्री चळवळीचा... धर्म हाच स्त्री शोषणाच्या मुळाशी आहे, असे या गटाचे म्हणणे आहे. धर्माच्या चौकटीलाच पहिल्या गटाचा विरोध असल्यामुळे पहिल्या गटात मोडणाऱ्या संघटनांवर इराणी शासन हे कायम बंदी आणत असते. त्यामुळे पहिल्या गटात मोडणाऱ्या स्त्रीमुक्ती चळवळी आणि संस्थांचे प्रमाण इराणमध्ये तुरळक राहिले आहेत. दुसरा गट आहे तो म्हणजे "इस्लामिक स्त्रीवाद" मानणारा. या गटाच्या अनुसार, इस्लाम धर्माचा गाभा हा ‘समानता' संकल्पनेच्या अवतीभवती फिरतो आणि स्त्री-पुरुष लिंगभेद हाच मुळात गैरइस्लामी आहे. दुसरा गटही हे मान्य करतो की, धर्म हा स्त्री-शोषणासाठी जबाबदार आहे, पण त्याचे खापर धर्मावर न फोडता धर्माच्या चुकीच्या मांडणी-व्याख्येला ते जबाबदार धरतात. दुसऱ्या गटाची अशी धारणा आहे की, धर्माची स्त्रीवादी पुनर्मांडणी गरजेची आणि शक्य आहे, आणि त्यातूनच स्त्रीमुक्ती प्राप्त करता येईल. धर्माचे अधिष्ठान आणि चौकट न सोडल्यामुळे, इराणच्या धर्मवादी शासनव्यवस्थेला दुसऱ्या स्त्रीवादी गटाविरुद्ध तडकाफडकी कारवाई करता येत नाही. दुसऱ्या बाजूला, धार्मिक प्रतीकांचा आणि भाषेचा वापर केल्यामुळे  दुसऱ्या गटातील स्त्रीवादी संघटनांना सामान्य स्त्रियांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळतोय. 

मध्य-आशियातील स्त्रियांचे प्रश्न हे तसे जुनेच आहेत. मग अचानक ‘सहर’चा मुद्दा पाश्चिमात्य मीडियाने उचलून का धरला? सध्या इराण व अमेरिका यांच्यात युद्धसदृश परिस्थिती उद्भवत आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘संयुक्त राष्ट्रा'च्या आमसभेत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प ह्यांनी इराणचे वर्णन "मानावाधिकारांचे हनन करणारा देश’ ह्या शब्दात केले. तज्ज्ञांच्या मते अमेरिकेच्या परराष्ट्रधोरणाचे उद्दिष्ट इराणमध्ये सत्तापालट करणे हे आहे. ते घडवून आणण्यासाठी अमेरिकी शासन कारणांच्या शोधात आहे. ‘सहर’च्या गोष्टीवर प्रकाश टाकून आणि इराणच्या शासनव्यवस्थेचा दमनकारी चेहरा पुढे आणून कदाचित पाश्चिमात्य मीडिया अमेरिकेच्या इराणविरुद्ध होऊ शकणाऱ्या लष्करी-कार्यवाहीची पार्श्वभूमी तयार करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही... असे इतिहासात आधीही घडले आहे. इराणच्या स्त्री-मुक्ती चळवळींचा आढावा घेतल्यावर हे लक्षात येते की, पोशाख-स्वातंत्र्यासाठी किंवा फुटबॉल स्टेडियमसारख्या सार्वजनिक स्थळी प्रवेशाचा अधिकार, हे मुद्दे वरकरणी जरी कुणाला भावनात्मक आणि  प्रतीकात्मक वाटत असतील तरीही ते फार महत्त्वाचे आहेत. ह्याचे कारण म्हणजे इराणमधील प्रस्थापित व्यवस्था त्यांची ताकद व हुकूमत गाजवण्यासाठी स्त्रियांच्या पोशाख स्वातंत्र्यावर आणि त्यांच्या सार्वजनिक ठिकाणच्या वर्तवणुकीवर नियंत्रण ठेवत असते आणि त्यामार्फत सत्ता गाजवत असते. म्हणून जर  इराणी स्त्रीमुक्ती चळवळींच्या या दोन प्रमुख मुद्द्यांचे स्थळ-काळसापेक्ष मूल्यमापन केले तर  हे लक्षात येईल की, ह्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून स्त्रीमुक्ती चळवळ ही फक्त स्त्री-हक्कांची लढाई न लढता, प्रस्थापित धर्म-राज्य-सामाजिक व्यवस्थेच्या पायावरच हल्ला करत आहे. फुटबॉलच्या निमित्ताने इराण सरकार जरी झुकले असले तरी इराणमधील महिलांना ठाऊक आहे की हा विजय अंतिम नाही. मिळवलेले अधिकार क्षणात नाहीसे होऊ शकतात हा त्यांचा १९७९ चा अनुभव सांगतो. पण तोच इतिहास आपल्याला हेही सांगतो की, १९७९ मध्येच  इराणी स्त्रियांनी आपल्या हक्कांसाठी सर्वात मोठा लढा उभारला होता. इराणी महिलांचा लढा अद्याप संपलेला नाही. त्यांची अपेक्षा इतकीच आहे की, पुढच्या लढाईत समाजाच्या आणि शासनाच्या बोथट संवेदना जाग्या होण्याची किंमत आणखी एका ‘ब्ल्यू-गर्ल' च्या बलिदानाने नसावी. 

लेखकाचा संपर्क - ९१४६८१९९२९

बातम्या आणखी आहेत...