आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी कुटुंबातील लेकीने कायद्याच्या परीक्षेत मिळवले घवघवीत यश, राज्यात आली पहिली

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • अनिताच्या कुटुंबाची शेती अन् दुग्ध व्यवसायावरच मदार

संंदीप शिंदे

माढा (सोलापूर)- इच्छाशक्ती अन् जिद्द उराशी बाळगत प्रयत्नांची पराकाष्ठा केली की काहीच अशक्य नसतं. याचा प्रत्यय माढा तालुक्यातील उपळाई(खुर्द) ची कन्या अनिता दादा हवालदार हिने कृतीतुन दाखवुन दिलंय. अनिताने दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेत राज्यात  प्रथम क्रमांक पटकावून गावाचे नाव रोशन केले.दादा हवालदार व सुनिता हवालदार या शेतकरी दामपत्यांची ही लेक असुन कायद्याच्या परीक्षेत वयाच्या 26 व्या वर्षी  यशस्वी ठरली आहे. लोकसेवा आयोगामार्फत  सप्टेंबर 2019 मध्ये न्यायाधिश पदाकरिता मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल आयोगाने शनिवारी रात्री सायंकाळी सहा वाजता जाहिर केला. यात राज्यातील 190 विद्यार्थी पदासाठी पात्र ठरले. त्यात  अनिताने पहिल्या नंबर वर आपली वर्णी लावली आहे.
उपळाई  सारख्या खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अनिता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून निवड झाल्याने आता अनिताच्या रुपाने  गावातील पहिली महिला क्लास वन अधिकारी ठरली आहे. अनिता यांनी पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण  खलठाण जि.प.प्राथमिक शाळा, माध्यमिक शिक्षण उपळाई खुर्द, तर अकरावी  बारावी विज्ञान शाखा के.बी.पी काॅलेज पंढरपूर, त्यानंतर सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयातुन एल.एल.बी व एल.एल.एम पदवी घेतले.

अनिता च्या कुटुंबाची शेती अन् दुग्ध व्यवसायावरच मदार


अनिता ही शेतकरी कुटुंबातील मुलगी असुन आई  व वडिल शेतातुन पिकांची लागवड करुन उत्पन्न घेतात. त्याबरोबर वडील व अनिताचा भाऊ अमोल हा दुग्ध व्यवसाय करुन  कुटुंबाला उभारी देत अनिताचा खर्च अभ्यास व परीक्षेचा खर्च  भागवत आले होते.
आपल्या कुटुंबीयांचे कष्ट अनिताने पाहिले होते. त्यामुळे हे यश मिळवण्यासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली. अनिताने सोलापूर व पुणे येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि दुसऱ्याच प्रयत्नात स्पर्धा परीक्षेत  हे उत्तुंग यश मिळवले. अनिताच्या निवडीमुळे गावचे नाव रोषण तर झालेच आहे. शिवाय कुटुंबालाही प्रतिष्ठा मिळवून दिली. अनिताच्या निवडीने उपळाई कराची मान अभिमानाने उंचावली आहे.
आपल्या यशाबद्दल सांगताना अनिता म्हणाले की, "प्रत्येकाने आई वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवायला हवी. अभ्यास करताना सातत्य तर हवेच. मला अॅड सागर सगट यांचे  मोलाचे  मार्गदर्शन लाभले. मात्र मोबाईलपासून व सोशल माध्यमांपासून अभ्यास करताना गुरफुटे नये. स्वप्न मोठं बघुनच ते सत्यात उतरवण्यासाठी अभ्यासात सातत्य, सकारात्मक विचार सोबतीला हवेत."
"आजचा दिवस माझ्यासाठी सर्वोच्च आनंद देणारा ठरला आहे. प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते तेच स्वप्न माझ्या मुलीने अथक परिश्रमातुन पुर्ण केले. आमच्या कष्टांच चीज झालं," अशी आनंद अश्रुना मोकळी वाट करुन  देत वडिल दादा व आई सुनिता यानी प्रतिक्रिया दिली.