आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंजली घंटेवार 

आपण तर मोदक-करंजीचा नियम मनापासून पाळला. मग भाऊ इतका रुष्ट का वागला? मी कुणीच नव्हते का त्या घराची? अचानक परकेपणा. हिस्सेदारी. वाटण्या. पैसा इतका मोलाचा? मानपान, आपुलकी सगळं धुळीस मिळालं. बस पैसा जिंकला? आई तर समोरच होती तिथे. ती काहीच का बोलली नाही?
 
देवघरातील धुपाच्या सुगंधाने घर प्रफुल्लित झालं होतं. आज चतुर्थी असल्यामुळे  सुमतीने स्वयंपाक आटोपला तशी मोदकाची तयारी केली. “ओल्या नारळाचा खव घालून मोदक केले की मुलं खुश असतात.’ या विचाराने तिच्या कामाला गती आली. कढईत किंचित तुपावर नारळाचा कीस घालून त्यात गूळ, वेलची पूड टाकून खमंग सारण तयार केले. मोदकाला सुंदर नाजूक कळ्या पाडून ते तुपातून तळून काढले. ताटात कोशिंबीर लोणचे, वरणभाताची मूद, त्यावर साजूक तूप, कढी, चपाती, कारल्याची भाजी, भरली वांगी, तळलेले पापड आणि मोदक असा नैवेद्य देवापुढे ठेवला.तेव्हा अचानक तिला आईची आठवण झाली. तीदेखील असंच सगळं साग्रसंगीत करायची. मदत करायला आईने हाक दिली की पार कंटाळा यायचा सुमतीला तेव्हा. आता मात्र सराईतपणे ती सगळं करत होती. सुमतीचं लक्ष अचानक मोदकाच्या तबकाकडे गेलं. अरेच्चा! मी तर मोदकांसोबतची एक करंजी करायची विसरलेच. फ्रिजमधून सारण काढून लगेच तिने करंजी तयार करून तुपात तळली. आई म्हणायची मोदक केले की करंजी करावी.म्हणजे भाऊ-बहिणीची जोडी अक्षय राहते.’  

खरंच मोदक करंजी आणि भाऊ-बहीण नाते यांचा संबंध असेल का? तिच्या मनात विचार आला. असेलही. तिने एक सुस्कारा सोडला. आपण तर मोदक-करंजीचा नियम मनापासून पाळला. मग भाऊ इतका रुष्ट का वागला? मी कुणीच नव्हते का त्या घराची? अचानक परकेपणा. हिस्सेदारी. वाटण्या. पैसा इतका मोलाचा? मानपान, आपुलकी सगळं धुळीस मिळालं. बस पैसा जिंकला? आई तर समोरच होती, ती तिथे असतानादेखील काहीच बोलली नाही? का? 

देवापुढे डोळे मिटून ती उभी होती. तेवढ्यात मुलांच्या भांडणाचा आवाज तिला आला. सायली आणि अथर्व मिनिटांत भांडायचे, परत खेळायचे. “बघ ना मम्मा कसा वागतो हा. सारखं सारखं हे तुझं घर नाही म्हणतो. मी आजपासून नाही याची बहीण. जा.’

“ सुरुवात हिनेच केली. हीच बोलली की, मम्मा-पप्पा माझे आहेत, तुझे नाही, असं म्हणाली.’ तिने दोघांनाही जवळ बोलावले. तिला बोचलेली सय मनात जागी झाली होती. ती मुलांना बिलगली. देवापुढे येऊन म्हणाली, “देवाची शपथ घेऊन सांगा, एकमेकांना कधीच सोडणार नाही, काहीही झाले तरी.’ मुले निरागसपणे तिच्यापाठोपाठ तिचेच शब्द वदत होती.

लेखिकेचा संपर्क : ८६६९६६४६३३

बातम्या आणखी आहेत...