आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान यंत्रांवरील उमेदवारांचे चिन्ह हटवा : अण्णा हजारे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - निवडणूक आयोगाने मतदान यंत्रांवर उमेदवाराचे छायाचित्र छापण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असला तरी मतदान यंत्रांवरील उमेदवारांचे चिन्ह हटवले तरच भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेली निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. मतदान प्रक्रियेतील उमेदवाराचे निवडणूक चिन्ह हटवावे, या मागणीबरोबरच निवडणूक प्रक्रियेत सुधारणा होण्यासाठी आपण जनजागृती करणार आहोत. प्रसंगी आंदोलन करू, असेही ते म्हणाले.  


निवडणूक प्रक्रियेत सुधारणा कराव्यात, उमेदवारांचे चिन्ह हटवून त्याऐवजी उमेदवाराचे छायाचित्र छापावे, मतदारांना उमेदवार नाकारण्याचा पर्याय (नोटा) मतदान यंत्रावर असावा, गुन्हेगारी स्वरूपाचे खटले दाखल असलेल्या व्यक्तींना निवडणूक लढवण्यास बंदी करावी या मागण्यांसाठी हजारे गेल्या काही वर्षांपासून निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करत आहेत. उमेदवार नाकारण्याचा पर्याय देण्याची मागणी यापूर्वी मान्य झाली आहे.   


हजारे म्हणाले, राजकीय पक्ष व चिन्हविरहित निवडणूक प्रक्रिया ही खऱ्या लोकशाहीसाठी आवश्यक आहे. राज्यघटनेत राजकीय पक्षांचा कोठेही उल्लेख नाही. भ्रष्ट व चारित्र्यहीन व्यक्ती संघटित होऊन  राजकीय पक्षांच्या माध्यमातून निवडणुका लढवत लोकशाहीच्या पवित्र मंदिरात जातात हा खऱ्या लोकशाहीला व पर्यायाने देशाला धोका असल्याचे हजारे यांनी या वेळी सांगितले. 


छायाचित्र छापण्याचा निर्णय मात्र स्वागतार्ह
पक्षविरहित निवडणुका झाल्यास स्वच्छ चारित्र्याचे, देशहिताला प्राधान्य देणारे उमेदवार निवडून येतील व देशात खऱ्या अर्थाने लोकशाही नांदेल, असा विश्वास व्यक्त करतानाच मतदान यंत्रावर उमेदवाराचे छायाचित्र छापणे हे निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी टाकलेले पहिले पाऊल आहे. लवकरच इतर सुधारणाही होतील, अशी अपेक्षाही हजारे यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...