आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासनांवरच सोडले उपोषण! मुख्यमंत्र्यांशी 5 तासांच्या चर्चेनंतर अण्णांच्या मागण्या मान्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - निर्णय होईपर्यंत माघार घेणार नाही, असा गेले ६ दिवस निर्धार करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अखेर मंगळवारी आश्वासनांवरच उपोषण सोडले. लोकायुक्त, लोकपाल नेमणूक व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्याशी झालेली समाधानकारक चर्चा व लेखी अाश्वासनाचे कारण देत अण्णांनी सातव्या दिवशी हे आंदोलन मागे घेतले. तत्पूर्वी, मुख्यमंत्री व सिंह यांनी अण्णांशी सुमारे ५ तास बंदद्वार चर्चा केली. या सर्व मागण्यांवर टप्प्याटप्प्याने सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी अण्णांना दिले. तशी घोषणा नंतर संयुक्त पत्रकार परिषदेत केली. 

उपोषण सोडल्यानंतर अण्णांचा कंठ दाटून आला. 'शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मी जगाचा निरोप घेण्याचं ठरवले होते. मात्र ग्रामस्थांचे प्रेम व सरकारच्या पुढाकारामुळे मी उपोषण मागे घेण्याचे ठरवले आहे. देशासाठी अजून खूप काही करायचे आहे,' असे अण्णा म्हणाले. 

 

मार्चमध्ये याच मागण्यांसाठी उपोषण, तेव्हाही मुख्यमंत्र्यांकडूनच बोळवण 
 

अण्णांच्या या मागण्या सरकारने केल्या मान्य 


1. लोकपालच्या नियुक्तीबाबत दिरंगाई 
अण्णा :
२०१३ मध्ये लोकपाल विधेयक संमत होऊनही नियुक्ती झाली नाही. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. 
मुख्यमंत्री : लोकपालच्या मागणीसंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करू. १३ तारखेच्या बैठकीत निर्णय घेऊ. 


2. लोकायुक्त 
अण्णा :
संयुक्त मसुदा समिती स्थापन करून लोकायुक्ताची नेमणूक करण्यात यावी. 
मुख्यमंत्री : लवकरच अशी समिती स्थापण्यात येईल. येत्या अधिवेशनात मसुद्याचे कायद्यात रूपांतर करण्यात येईल. 


4. वयोवृद्ध शेतकऱ्यांना निवृत्तिवेतन 
अण्णा :
६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या शेतकऱ्यांना पेन्शन द्यावी. 
मुख्यमंत्री : बजेटमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना ६ हजारांच्या वार्षिक मदतीची घोषणा झाली आहे. त्यात वाढ केली जाईल. 


3. कृषिमूल्य आयोग 
अण्णा :
केंद्र आणि राज्यातील कृषिमूल्य आयोग सशक्त करा. 
मुख्यमंत्री : आयोगाच्या स्वायत्ततेबाबत कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमू. त्यावर अण्णांच्या सूचनेप्रमाणे सोमपाल शास्त्री यांना नेमू. 

 

रामलीला मैदान : ११ महिन्यांपूर्वी उपोषण 
२३ मार्च ते २९ मार्च २०१८ दरम्यान अण्णांनी लोकपालसह याच मागण्यांसाठी दिल्लीत रामलीला मैदानावर उपोषण केले होते. तेव्हाही सातव्या दिवशीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत व गिरीश महाजनांनी लेखी आश्वासन देऊन अण्णांचे उपोषण सोडवले होते. अण्णांना मुख्यमंत्र्यांनीच ज्यूस पाजला होता. मात्र त्याही आश्वासनांची पूर्तता झाली नाही. विशेष म्हणजे, या मागण्या मान्य झाल्या नाही तर ६ महिन्यांत उपोषण करण्याचा इशारा अण्णांनी दिला होता. 

 

राळेगण सिद्धी : ग्रामसभेमध्ये सोडले उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी आश्वासनाचे लेखी पत्र दिल्यानंतर अण्णा हजारे यांनी मंगळवारी राळेगणसिद्धी येथे आपले उपोषण सोडण्याची घोषणा केली. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. त्यात नारळपाणी घेऊन अण्णांनी उपोषण सोडले. नंतर पत्रकार परिषदेत निर्णयाची माहिती दिली. त्या वेळी अण्णा हजारे, मुख्यमंत्री, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी कृषिमंत्री सोमपाल शास्त्री, किसान महासंघाचे अध्यक्ष शिवकुमार शर्मा, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार अादी उपस्थित होते. 
29 मार्च 2018, नवी दिल्ली 
 

बातम्या आणखी आहेत...