आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहिती अधिकार कायदा कमजाेर करण्याचा डाव, आंदाेलन छेडणार; अण्णा हजारेंचा इशारा 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - माहितीचा अधिकार कायदा कमजोर करण्यासाठी मोदी सरकारने संसदेत विधेयक मांडून कायद्यात बदल केला, असा आराेप करत त्याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारी राळेगणसिद्धी येथे बोलताना दिला. कायद्यातील बदलामुळे जनतेचे अधिकार कमी होण्याचा धोका असून त्यासंदर्भात पंतप्रधानांना पत्र पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


हजारे म्हणाले, 'सरकारी तिजोरीतील पैसा कोठे खर्च होतो, त्या पैशांतून काय कामे होतात याचा हिशेब घेण्याचा अधिकार जनतेला मिळावा यासाठी राज्यात माहितीचा अधिकार कायदा तयार करण्यासाठी १९९८ मध्ये मुंबईत आझाद मैदानावर आपण उपोषण केले. त्यानंतर १९९९, २००४, २००५ व २००६ मध्ये आंदोलने करण्यात आली. ९ ऑगस्ट २००३ ला 'करेंगे या मरेंगे'या इराद्याने आझाद मैदानावर उपोषण करण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्र्यांसोेबत चार वेळा बैठका घेतल्या, परंतु सरकार निर्णय घेण्यास टाळाटाळ करत होते. सरकारने जनता व सरकारचे सदस्य अशी मसुदा समिती तयार केली. त्या मसुद्यानुसार राज्यात २०९३ मध्ये माहिती अधिकार कायदा तयार झाला. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी २००५ मध्ये देशासाठी हा कायदा लागू केला. 


लोकांंमध्ये जागरूकता आल्याने माहिती मागणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. शासनामध्ये ज्यांना वाईट सवई होत्या अशांना त्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे मनमोहनसिंग सरकारने या कायद्यामध्ये बदल करण्यासाठी २००६ मध्ये कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेतला. ९ ऑगस्ट २००६ रोजी आळंदी येथे आंदोलन केले. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्यामार्फत कायद्यात बदल न करण्याचे पत्र पाठवून सिंग यांनी आपली भूमिका बदलली. कायद्यातील कलम ४ मध्ये सर्व संस्थांनी आपल्या कार्यालयाची सर्व माहिती इंटरनेटवर टाकावी, असे बंधन आहे, परंतु कायदा तयार होऊन १४ वर्षे झाली, तरी कलम ४ ची योग्य अंमलबजावणी होत नाही. 


समाजहितासाठी आंदोलनात उतरणार 
जनतेच्या हितासाठी आजवर आपण १९ वेळा उपोषण केले. आता वय ८२ झाले आहे. ३० वर्षांपासून हजारो किलोमीटरचा प्रवास केल्यामुळे शरीर कमजोर झाले आहे. २३ मार्च २०१८ ला दिल्लीत करण्यात आलेल्या आठ दिवसांच्या उपोषणानंतर अजून प्रकृतीत सुधारणा झालेली नाही, परंतु माहिती अधिकार कायद्याला वाचवण्यासाठी जनता रस्त्यावर उतरण्यासाठी तयार असेल तर मी ही समाज व देशाच्या हितासाठी आंदोलनात उतरण्यास तयार आहे. आंदोलनात सर्वांच्या पुढे असेन, असे हजारे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...