Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Annabhau sathe's grandson say's about RPI

अण्णा भाऊ साठेंचे नातू म्हणतात, रिपाइंमध्ये मूठभरांचीच मक्तेदारी

प्रतिनिधी | Update - Aug 06, 2018, 11:47 AM IST

रिपब्लिकन पक्षात मूठभरांची मक्तेदारी आहे. त्याच्या ऐक्यात इतरांना डावलले जाते.

 • Annabhau sathe's grandson say's about RPI

  सोलापूर- रिपब्लिकन पक्षात मूठभरांची मक्तेदारी आहे. त्याच्या ऐक्यात इतरांना डावलले जाते. त्यामुळे त्या पक्षासोबत जाण्याचा विचारच नाही. भाजप तर जातीयवादी पक्ष. अण्णा भाऊ साठेंनी जात-धर्म मानलेच नाही. त्याच तत्त्वांना अनुसरून धर्मनिरपेक्ष पक्षाच्या शोधात महाराष्ट्रात फिरत असल्याची माहिती अण्णा भाऊ साठेंचे नातू सचिन साठे यांनी येथे दिली. मातंग समाजात नेतृत्वच उभे होऊ दिले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.


  लोकशाहीर, लोककलावंत, साहित्यिक अण्णा भाऊ साठेंच्या जयंती सांगता मिरवणुकीसाठी ते रविवारी सोलापुरात होते. शासकीय विश्रामगृहात दुपारी पत्रकारांशी वार्तालाप केला. मातंग समाजाची एकूण स्थिती, त्यांची दिशा आणि दशा सांगत त्यांनी शासनाकडे बोट दाखवले. म्हणाले, "राज्यभरात मातंग समाज बांधवांवर हल्ले होताना शासन गप्प आहे. हल्ले थांबवण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अण्णा भाऊ साठे तर माझे दैवत...' एकीकडे दैवत म्हणायचे आणि दुसरीकडे हल्ले रोखायचे नाही. ही मुख्यमंत्र्यांची दुटप्पी भूमिका आहे. त्यांच्या निष्क्रियतेला २०१९ च्या निवडणुकीत चोख उत्तर देऊ."


  या वेळी अण्णा भाऊंच्या बहिणीचे नातू गणेश भगत, संदेश अडगळे, अमित साठे, राहुल धोंगडे, शेखर साठे, मनोहर साठे आदी उपस्थित होते.


  महामंडळ बंद, कदम अटकेत, मल्ल्या बाहेर
  शासनाच्या धोरणांवर तीव्र नापसंती व्यक्त करत श्री. साठे म्हणाले, "अण्णा भाऊ साठे महामंडळात भ्रष्टाचार झाल्याचे सांगून आमदार रमेश कदम यांना अटक केली. त्यानंतर महामंडळ बंद पाडले. त्यामुळे समाज हताश झालेला आहे. दुसरीकडे कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन नीरव मोदी, विजय मल्ल्या देश सोडून पळून जातात. त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नाही. निवडणुकांमध्ये केवळ समाजाचा वापर होतो. समाजाला काही देण्याचा विचारच होत नाही."


  ५८ लाख लोकसंख्या, पर्यायी पक्ष शोधतोय
  महाराष्ट्रात मातंग समाजाची लोकसंख्या ५८ लाखांच्या घरात आहे. तुलनेने राजकीय प्रतिनिधीत्वच नाही. त्यामुळे या समाजाचा विकास नाही. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन हा समाज आता पर्यायी पक्षाच्या शोधात आहे. या मोहिमेत अण्णा भाऊंच्या सूनबाई सावित्रा साठे याही आहेत. समाजाला न्याय देऊ शकणारा सक्षम पक्ष मिळाला तर त्यासोबत जाऊ.
  - सचिन साठे, अण्णा भाऊ साठेंचे नातू

Trending