अण्णांचे २ ऑक्टोबरपासून / अण्णांचे २ ऑक्टोबरपासून राळेगणसिद्धीत आंदोलन; लोकपालच्या अंमलबजावणीची मागणी

लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी २ अॉक्टोबरला महात्मा गांधी जयंतीपासून आंदोलन करण्यावर आपण ठाम अाहोत. हे आंदोलन दिल्लीत न करता राळेगणसिद्धी येथे करत असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी पत्रकाद्वारे स्पष्ट केले.

प्रतिनिधी

Sep 03,2018 11:02:00 AM IST

पारनेर- लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी २ अॉक्टोबरला महात्मा गांधी जयंतीपासून आंदोलन करण्यावर आपण ठाम अाहोत. हे आंदोलन दिल्लीत न करता राळेगणसिद्धी येथे करत असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी पत्रकाद्वारे स्पष्ट केले.


मे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने देशातील जनतेला आम्ही सत्तेत आल्यानंतर लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी करू, स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करू, असे आश्वासन दिले होते. त्यावेळी जनतेला माहिती नव्हते की, हे सरकार खोटे आश्वासन देत आहे. शेतीमालाला योग्य किंमत मिळावी याला सरकारने प्राथमिकता द्यायला हवी होती. दिलेल्या आश्वासनांचे पालन करणे आवश्यक होते. सरकारने कृतज्ञतेच्या भावनेतून कायद्याचे पालन केले नाहीच, उलट कायद्यात दुरूस्ती करून सरकार कृतघ्न बनले, अशी टीका हजारे यांनी केली.


भाजप सरकार सत्तेवर येऊन चार वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे, परंतु अजूनही आश्वासनांची अंमलबजावणी होत नाही. हे सरकार कृतघ्न आहे, हे जनतेच्या लक्षात आले आहे. देशातील भ्रष्टाचार कमी होण्यासाठी लोकपाल, लोकायुक्तांची नियुक्ती करणे आवश्यक होते. परंतु सरकारने लोकपाल, लोकायुक्तची नियक्ती तर केलीच नाही, उलट लोकपाल, लोकायुक्त कायद्याच्या कलम ४४ मध्ये दुरूस्ती केली. कलम ४४ मध्ये सर्व लोकसभा सदस्य, सर्व अधिकारी व त्यांचे मुले व पत्नीच्या नावावर असलेल्या संपत्तीची माहिती प्रत्येक वर्षी देणे अनिवार्य होते. परंतु या सरकारने कलम ४४ मध्ये दुरूस्तीच्या नावाखाली नवीन बिल संसदेमध्ये ठेवले.


खासदार, सर्व अधिकारी व त्यांचे मुले व पत्नीच्या नावावर असलेल्या संपत्तीची माहिती देण्याचे कलम काढून टाकले. सर्व अधिकारी आणि खासदारांना भ्रष्टाचार करण्याचा रस्ता मोकळा करून दिला. आमचे सरकार भ्रष्टाचारमुक्त भारत निर्मितीसाठी कटिबद्ध असल्याचे ते सांगतात, पण त्यात किती तथ्य आहे हे जनतेला माहिती आहे, असे हजारे यांनी पत्रकात नमूद केले आहे.

X
COMMENT