Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Anna's Movement : last time lakhs of people are participated, this time only 5000 

अण्णांचे आंदोलन : गेल्या वेळी लाखो जमले, या वेळी फक्त पाच हजार; जुने सहकारी केजरीवाल यांचा चकार शब्दही नाही

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Feb 10, 2019, 07:54 AM IST

अण्णांच्या आंदोलनाचा प्रभाव आता पूर्वीसारखा नाही

 • Anna's Movement : last time lakhs of people are participated, this time only 5000 

  'सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे २०११ मध्ये उपोषणाच्या राजकारणाचे सुपरस्टार ठरले होते. त्यांचे आंदोलन पाहून गांधीजी आणि जेपींच्या आंदोलनांची आठवण आली. पण आठ वर्षांत सर्व बदलले आहे. अण्णा तेच आहेत, पण सोबतचे लोक आता गायब आहेत. अण्णांच्या आंदोलनाचा प्रभाव आता पूर्वीसारखा नाही. २०१४ मध्ये काँग्रेसविरोधी पक्ष एकवटले होते. या वेळी अनेक पक्षांनी अंतर राखले.'-अनिरुद्ध देवचक्के


  २०१९ : जुने सहकारी केजरीवाल यांचा चकार शब्दही नाही

  उपोषण : ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी

  स्थान : राळेगणसिद्धी (महाराष्ट्र)

  मागण्या : २०१३ मध्ये लोकपाल आणि लोकायुक्त कायदा होऊनही त्यांची अद्याप नियुक्ती नाही. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे अण्णांनी आंदोलनाची घोषणा केली होती.

  काय झाले? : या वेळी राष्ट्रीय माध्यमे आली नाहीत, त्यांना प्रसिद्धी मिळाली नाही. वातावरणही झाले नाही. गावातील चार-पाच हजार लोक अण्णांच्या सोबत होते. काँग्रेस-राष्ट्रवादीसह कोणत्याही विरोधी पक्षाची साथ मिळाली नाही. उद्धव ठाकरेंनी मात्र महाराष्ट्र सरकारला 'अण्णांच्या जिवाशी खेळू नका' ही धमकी दिली. अरविंद केजरीवाल यांच्यासह जुन्या सहकाऱ्यांनी एक शब्दही उच्चारला नाही.

  कोण होते? : कोणताही नेता-अभिनेता आला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ तास चर्चा करून त्यांना समजावले.

  डॉक्टर : फक्त डॉ. धनंजय होते. ते आधीही त्यांची तपासणी करत असत.

  परिणाम : ठोस काही नाही. उपोषण सुटले.

  २०११ चे आंदोलन : रामदेव, आमिरसारखे मान्यवर होते

  उपोषण : १६ ते २९ ऑगस्ट २०११

  मागणी : भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी लोकपाल, राज्यांत लोकायुक्त हवेत.

  काय झाले होते? : उपोषण सुरू होण्याआधीच अण्णांना तिहारमध्ये पाठवले. अण्णांनी तेथूनच उपोषण सुरू केले तेव्हा दिल्ली सरकारला रामलीला मैदान द्यावे लागले. 'मीही अण्णा' आंदोलन उभे राहिले. एक लाखावर लोक जमले. माध्यमांनी सतत प्रसिद्धी दिली. सरकारला संसदेत चर्चा करावी लागली. सभापतींच्या आश्वासनानंतर उपोषण सुटले.

  कोण होते? : अरविंद केजरीवाल, किरण बेदी, मनीष शिसोदिया सोबत होते. श्रीश्री रविशंकर, भय्यू महाराज, बाबा रामदेव, अनुपम खेर, मनोज तिवारी, तत्कालीन केंद्रीय गृह सचिव आर. के. सिंह भेटण्यास आले होते.

  डॉक्टर : मेदांता मेडिसिटीचे डॉ. नरेश त्रेहन आरोग्य तपासणीसाठी जात होते. डॉक्टरांचा चमू तैनात होता.

  परिणाम : लोकपाल आणि लोकायुक्त कायदा २०१३ ला तयार झाला, पण आतापर्यंत लोकपालाची नियुक्ती झालेली नाही.

Trending