आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी संपाचा वर्धापन दिन : भाजप सरकारविरोधात सर्वाधिक मोर्चे, आंदोलने झालेल्या जिल्ह्यातच भाजपच्या बाजूने मतदान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - येत्या १ जून रोजी राज्यातील शेतकऱ्यांच्या संपास दोन वर्षे होत असूून अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. परंतु, गेल्या चार वर्षांत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजप सरकारच्या विरोधात सर्वाधिक मोर्चे, आंदोलने झालेल्या जिल्ह्यातच भाजपच्या बाजूने मतदान झाल्याने शेतकरी नेते बुचकळ्यात पडले आहेत. महामुक्काम मोर्चा, कर्जमाफीचा मोर्चा, मुंबईतील पायी महामोर्चे अशी मोठी आंदोलने झालेल्या नाशिक-नगरच्या पट्ट्यात सर्वच जागांवर भाजपला कौल मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनांबद्दल आणि चळवळींबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 


२०१५ च्या जानेवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालणारा किसान सभेचा महामुक्काम मोर्चा गाजला. २०१६ मध्ये शेतीच्या हमीभावासाठी अनेक आंदोलने झाली. याच नाशिकमधून स्वाभीमानी शेतकरी संघटनेने संपूर्ण कर्जमाफीची मागणी करीत मोर्चा काढला. १ मे २०१७ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा ग्रामसभेने ठराव केला आणि शेतकरी आंदोलनाचे केंद्र नाशिकहून नगरला सरकले. १ जून २०१७ रोजी याच पट््ट्यात शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप झाला. मुंबईचे दूध, भाजी बंद करण्यात आले. १२ मार्च २०१८ ला नाशिकहून निघालेला लाल बावट्याचा पायी महामोर्चा मुंबईत पोहोचला आणि पुन्हा शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आले. त्याची ताकद दिसल्यावर देशभरातील शेतकरी संघटना आणि नेते एकत्र आले आणि नोव्हेंबरमध्ये दिल्लीत किसान मुक्ती मोर्चा निघाला. यावर्षी फेब्रुवारीत पुन्हा माकपचे आमदार जिवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमधून मुंबईकडे भव्य मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, नाशिक, दिंडोरी, नगर, शिर्डी आणि पालघर या शेतकरी आंदोलनाचे केंद्र ठरलेल्या पाच पैकी एकाही जागेवर शेतकऱ्यांचा कौल आंदोलकांना मिळालेला नसल्याने राज्यातील शेतकरी चळवळींपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. महामोर्चांचे यशस्वी संयोजन करणारे माकपचे जीवा पांडू गावित यांना दिंडोरी लोकसभा मतदार संघात तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राजू शेट्टी यांचाही त्यांच्या मतदार संघात पराभव झाला आहे. परिणामी येत्या १ जून रोजीच्या शेतकरी संपाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनांचा आवाजही क्षीण झाला आहे. 
 

 

यंदाच्या निवडणुकीत ‘शेतकरी’ म्हणून एकसंघ मतदान झाले नाही

निकषांची उतरंड बदलण्याचे आव्हान 
या निवडणुकीत आर्थिक नाही तर अस्मितेच्या मुद्द्यावर मतदान झाले. त्यामुळे प्रथम राष्ट्राभिमान, नंतर धर्म, जात, नेेता आणि अखेरीस शेतीचे प्रश्न या क्रमाने मतदारांनी विचार केलेला दिसतो. हा कौल मोदींच्या शेतीबाबतच्या आर्थिक धोरणांना नसून सर्जिकल स्ट्राईकसारख्या कारवाईला आहे. त्यामुळे विद्यमान सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी आमची आंदोलने सुरूच राहतील.  
- डॉ अजित नवले, सरचिटणीस, किसान सभा

 

विरोधकांची निष्क्रियता
शेतकऱ्यांमधील असंतोषाची कल्पना येताच सत्ताधारी पक्षाने तत्काळ विविध योजनांची घोषणा केली, पीक विमा, अनुदाने यांची थकित रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर तातडीने जमा केली. त्यामुळे शेेतकऱ्यांनी भाजपला कौल दिला असल्याची शक्यता आहे. विरोधकांकडे तसा सक्षम चेहरा नव्हता की पर्याय नव्हता. ‘शेतकरी’ म्हणून एकसंघ मतदान झाले नाही. औरंगाबादेत शेतकऱ्यांची मते मराठा म्हणून हर्षवर्धन जाधवांच्या पारड्यात पडली तर शिर्डी-नगरमध्ये विखेंच्या मागे गेली. 
- धनंजय दोरडे, निमंत्रक शेतकरी संप, पुणतांबा

 

जिथे संघटन होते, तिथे ताकद वाढली 
दिंडोरीत आमचे संघटन होते. इथे आम्हाला ३८ हजार मते अधिक मिळाली आहेत. गेल्यावेळी या मतदार संघात माकपला ७२ हजार मते होती, यंदा ती १ लाख ९ हजार ५७० मते पडली आहेत. पालघरच्या डहाणू आणि विक्रमगड विधानसभा मतदार संघात गेल्या वेळीपेक्षा ८-९ हजारांची आघाडी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला दिंडोरी दिले असते तर निश्चित आमचा उमेदवार जिंकला असता.
- अशोक ढवळे, सचिव, माकप

 

इतर मुद्द्यापेक्षा राष्ट्रीय भावना सरस 
नाशिक जिल्ह्यातील एकही तालुका नाही जिथे आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन उभारले नाही की मोर्चा काढला नाही. मात्र, या निवडणुकीचे निकाल पहाता शेतीच्या हमी भावाचे प्रश्न, लोकांच्या पोटापाण्याचे प्रश्न यापेक्षा राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रीय भावना यामुळे शेतकऱ्यांची मते आपल्याकडे वळवण्यात मोदी यशस्वी झाले हे दिसते. राजू शेट्टींसारख्या शेतकरी नेत्याचा जातीच्या मुद्द्यावर पराभव व्हावा यातच सारे आले. त्यामुळे राजकारणात काय होईल  हे सांगता येत नाही. 
हंसराज वडघुले, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रदेशाध्यक्ष, युवा आघाडी