आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आपलं सरकार' सेवा केंद्र वाटपातील नवी यादी गुणांकासह जाहीर, एकाच घरातील दोन लाभार्थी वगळले, फेरतपासणीत अनागोंदी उघड...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबवण्यात आलेल्या 'आपलं सरकार' सेवा केंद्र वाटपात एकाच घरातील दोन लाभार्थींची नावे वगळण्यात आली असून गुणांकासह लाभार्थींची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. 


यात सुमारे ३५ नावे बदलण्यात आली आहेत. दरम्यान, गुणांकासह यादी बदलली असली तरीही सदोष प्रक्रिया राबवणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. 


आपलं सरकार सेवा केंद्र वाटपातील गैरप्रकार 'दिव्य मराठी'ने १२ सप्टेंबर रोजी सर्वप्रथम चव्हाट्यावर आणला होता. त्यानंतर दि. २ ऑक्टोबर रोजी पुन्हा पाठपुरावा वृत्त प्रकाशित केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने निवड समितीचे प्रमुख उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांना समितीवरून हटवण्यात आले होते. त्यांच्या जागी निवासी जिल्हाधिकारी संजीव जाधवर यांच्याकडे समितीचा कारभार सोपवण्यात आला होता. समितीतील इतर कर्मचारी तेच ठेवण्यात आले. या समितीने केलेल्या फेरतपासणीमध्ये सेवा केंद्र वाटपात अनागोंदी केल्याचे उघड झाले. त्यामुळे आता एकाच घरातील दोन लाभार्थी वगळून नवी यादी गुणांकासह जाहीर करण्यात आली आहे. 


शहर ७२ व ग्रामीण १५९ अशा एकूण जिल्ह्यातील २३१ ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी प्रशासनामार्फत ऑनलाइन सेवा सुरू करण्यासाठी ऑफलाइन अर्ज मागवले. २९ एप्रिलपर्यंत जिल्हा नियंत्रण कक्षाकडे अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत होती. त्यानुसार ग्रामीण भाग व शहरातून ३८३ इच्छुकांनी ऑफलाइन अर्ज सादर केले होते. अर्जांची छाननी करणे व कागदपत्रांची तपासणी करून गुणांकानुसार खरे लाभार्थी निवडण्यासाठी समिती गठीत करण्यात आली होती. 


या समितीमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एकाच घरातील दोघांची निवड करून गरजूंना वंचित ठेवण्याचे काम केले होते. या सदोष प्रक्रियेबद्दल ४० जणांनी आक्षेप घेतले होते. त्यावर सुनावणी होऊन आता नव्याने यादी गुणांकासह जाहीर करण्यात आली आहे. त्यात एकाच घरातील लाभार्थी वगळण्यात आले आहेत. 


दिव्य मराठी इम्पॅक्ट 
समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अर्जदारांच्या अर्जांची छाननी योग्य पद्धतीने केली नव्हती. गुणांक चुकीचे दिले होते. एकाच कुटुंबातील दोघांची निवड करण्याची हातचलाखी केली होती. याबाबत 'दिव्य मराठी'ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर अर्जदारांनी आक्षेप घेतले. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी अधिकारी शिंदे यांची समितीवरून हकालपट्टी करून जाधवर यांच्याकडे कारभार सोपवला. फेरतपासणीत अनागोंदी उघड झाली. गुणांक बदलले व लाभार्थीदेखील बदलले. मात्र, अनागोंदी करणाऱ्यांवर नियमाप्रमाणे कारवाई करणे जिल्हाधिकाऱ्यांनी टाळल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. 


यादी बदलली, मात्र दोषींवर कारवाई नाही 
दिव्य मराठीने १२ सप्टेंबर २०१८ रोजी प्रकाशित केलेले वृत्त. 
संतोष सातदिवे वॉर्डात राहत नाहीत : वॉर्ड क्रमांक ५५ मधील नागरिकाला आपलं सेवा सरकार केंद्र देण्यास प्राधान्य का देण्यात आले नाही. संतोष सातदिवे वॉर्ड क्रमांक ५५ मध्ये राहत नाहीत. त्यांचे केंद्र नाही. असे असताना निवड कशी केली, अशा प्रकारचा जाब विशेष कार्यकारी अधिकारी मनोज बल्लाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे विचारला आहे. 


गुणांक अशा प्रकारे दिले जातात 
सीएससी प्रमाणपत्र असल्यास १० गुण, नसल्यास २ गुण, पदव्युत्तर पदवी ५ गुण, पदवीधर ३ गुण, दहावी व बारावी २ गुण, संगणक ज्ञान २ गुण, केंद्र ठिकाणी सीएससी सेंटर सुरू असल्यास ५ गुण, सीएससी सेंटरमधून ५०० पेक्षा अधिक जणांना सेवा दिलेली असल्यास ५ गुण, १०० पेक्षा अधिक व्यक्तींना सेवा दिली असल्यास ३ गुण, त्यापेक्षा कमी असेल तर १ गुण, अर्जदाराने केंद्राचे फोटो जोडलेले असल्यास १ गुण, अक्षांश रेखांश नमूद केला तर १ गुण असे गुण देऊन योग्य लाभार्थी निवडणे समितीचे काम आहे. पण समितीतील कर्मचाऱ्यांनी हे काहीच न बघता मनमानी पद्धतीने अर्जदार निवडले होते. 


आक्षेप आले तर उत्तर देऊ 
शहर ७२ व ग्रामीण १५९ अशी एकूण २३१ आपलं सेवा केंद्रे सुरू करण्यासाठी अर्ज मागवले होते. एकूण २८३ अर्ज प्राप्त झाले होते. फेरतपासणीत चुकीचे लाभार्थी वगळून यादी जाहीर केली आहे. यावर काही आक्षेप असेल तर त्याबाबत अर्ज स्वीकारून त्यांना उत्तर दिले जाईल. संजीव जाधवर, निवासी उपजिल्हाधिकारी, औरंगाबाद. 


दुसऱ्या यादीतून का वगळले 
आपलं सेवा सरकार केंद्र मिळावे म्हणून रीतसर अर्ज केला होता. पहिल्या यादीत नाव होते. दुसऱ्या यादीतून नाव का वगळण्यात आले? तसेच वॉर्डात न राहणाऱ्या संतोष सातदिवे यांनी भवानीनगर, संजय नगर वॉर्डातून दोन अर्ज केले होते. त्यांची निवड करण्यात आली. म्हणजेच दुसऱ्या निवड यादीत देखील पुन्हा अनागोंदी करण्यात आली आहे. 
ऋता दिनेश काळे, तक्रारदार. 

बातम्या आणखी आहेत...