सांगली / Video / सांगलीतील विसंगती: एकीकडे महापूर, दुसरीकडे चारा छावण्या; दुष्काळग्रस्तांनी व्यक्त केल्या भावना

 पाणी सोडले असते तर पूर व दुष्काळातूनही सुटलो असतो - दुष्काळग्रस्तांच्या भावना 

दिप्ती राऊत

Aug 14,2019 11:56:44 AM IST

सांगली - महापुरात उद्ध्वस्त सांगलीच्या पलूस तालुक्यापासून अवघ्या ६० किमीवरील बाळेवाडी चारा छावणीतल्या ६० गुरांच्या तोंडाला कोरड पडली होती. टँकरने आलेल्या पाण्याचे टिपडे बैलापुढे सरकवत दत्ता हाके पुराच्या बातम्या वाचत बसले होते. सालाबादप्रमाणे यंदाही त्यांच्या शेतात पावसाचा थेंब पडला नाही. कायमस्वरूपी दुष्काळी म्हणून गणल्या गेलेल्या त्यांच्या खानापूर तालुक्यासाठी वर्षातून ४ आवर्तने सोडण्याचा निर्णय झाला होता. “प्रत्यक्षात फक्त एकच आ‌वर्तन सरकारनं सोडलं. आता बघा कसं सगळं पाणीच पाणी झालंय. आमच्या तोंडचं पाणी गेलं होतं, आता त्यांच्याही तोंडचं पाणी पळालं, छावणी चालक व सरपंच गणपत खरात सांगत होतेे. आटपाडी या दुष्काळी तालुक्यात त्यांनी सुरू केलेल्या गुरांच्या छावणीला अडीच महिने झालेत, पण पावसाचा एक थेंब पडला नसल्यानं शेती आणि तलावही कोरडेठाक पडले आहेत. चर्चेचा केंद्रबिंदू बनलेल्या पूरग्रस्त तालुक्यांपासून अवघ्या १०० किमी अंतरावरील खानापूर आणि आटपाडी तालुके मात्र आजही दुष्काळाने होरपळत आहेत.


आटपाडी व खानापुरातील तलाव कोरडे आहेत. धरणातून तलावांपर्यंत पाणी पोहोचण्याची बहुतेक कामे झालेली आहेत. त्यात थोडीशी वाढ केली असती तर पुरात वाहून गेलेल्या शेकडो टीएमसी पाण्यापैकी १५० ते १७० टीएमसी पाणी कोरड्या तालुक्यांमधील तलावांत वळवता आले असते, असे खानापूरचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर म्हणाले. दुष्काळी तालुक्यांसाठी आखण्यात आलेला टेंभू प्रकल्प कार्यान्वित व्हावा यासाठी गेेल्या २ दशकांपासून ते पाठपुरावा करीत आहेत. या भागासाठी टेंभूसह म्हैसाळ, ताकारी, उरमोडी अशा ४ योजना आखण्यात आल्या. पाणी उचलण्यासाठी लिफ्ट बसवलेे, ते गावांपर्यंत पोहोचवण्यासाठी कालवे खोदले. गावागावात साठवण, पाझर तलाव बांधूनही तयार आहेत. या भागासाठी कोयना धरणातून वर्षातून चार वेळा पाणी सोडण्याचा निर्णयही झाला आहे. परंतु, प्रत्यक्षात त्यापैकी फक्त एकच आ‌वर्तन सोडण्यात आल्याची तक्रार सुभाष पुजारी यांनी केली.

खड्डे खोदले, पाइपही आले, पण पाणीच नाही
धरणातून थेट पाइपद्वारे पाणी पोहोचवण्याची महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना टेंभू भागातच सुरू आहे. पाइप येऊन पडले आहेत, खड्डे खोदूून तयार आहेत. पण पाणी काही पोहोचलेले नाही. बाळेवाडीच्या गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून १८ लाख रुपये जमवले, सुभाष पुजारींनी त्यांची जमीन दिली आणि लोकांनी चारी खोदून टेंभूतील पाणी गावापर्यंत आणण्याची व्यवस्था केली. आजूबाजूच्या गावांनीही ३२ लाख रुपये वर्गणी जमवून पाणी आणण्याची व्यवस्था केली. बनपुरी साठवण तलाव, बाळेवाडी पिसार वस्ती पाझर तलाव, मेळामेळी तलाव असे १७ तलाव या परिसरात आहेत. दिवाळीनंतर ठरलेली चारही आवर्तने जलसंपदा विभागाने सोडली असती तर कोयनेच्या पाण्याचा दाब कमी झाला असता आणि आता पुरातून कर्नाटकात वाहून गेलेल्या शेकडो टीएमसी पाण्यापैकी आपल्या हक्काचे पाणी तरी आपल्या दुष्काळी गावांना मिळाले असते, असा त्यांचा दावा आहे.

नेमकी परिस्थिती काय?
> कृष्णा खोरे पाणी वाटप लवादानुसार ६६२ टीएमसी महाराष्ट्राच्या वाट्याला
> लवादाच्या मोजमाप सुत्रानुसार ५९४ टीएमसी पाण्याचा वापर

> प्रत्यक्षात त्यापैकी २५ ते ४० टीएमसी पाणी महाराष्ट्र उचलत नाही

> टेंभू, म्हैसाळ, उरमोडी आणि ताकारी प्रकल्पातून प्रत्येकी १५ टीएमसी पाणी उचलण्याची क्षमता

> यावरील सर्व तलाव भरून घेतल्यास १५० टीएमसी पाणी वळवणे शक्य

सत्ताधारी शिवसेना आमदाराचे ताशेरे
सध्या इथले पंप ३ हजार तास चालवले जातात. थोडी क्षमता वाढवून ते ५ हजार तास चालवले तर या दुष्काळी परिसरातील तलाव भरून घेता आले असते. पुराचे पाणी वाढू लागल्यावर हे करणे शक्य नाही, पण सध्या असलेल्या यंत्रणांमध्ये थोडीशी सुधारणा केली तर हेच पाणी सांगलीच्या दुष्काळी भागात वळवणे शक्य असल्याचे आम्ही शासनाकडे वारंवार मांडले आहे. या वेळीही ठरलेली आ‌वर्तने सोडली असती तर कोयनेतून १५ टीएमसी पाण्याचा उपसा झाला असता आणि पुराची पातळीही किमान ४ फुटांनी घटली असती. आमच्या वाट्याचे किमान १५० ते १७० टीएमसी पाणी या महापुरात वाहून गेले, अशा शब्दांत सत्ताधारी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी ताशेरे ओढले.

चारा छावण्यांचे ३० लाख रुपये थकले :

आजही पंचक्रोशीतील ४० गावं कोरडी आहेत. जिल्ह्यात ४१ चारा छावण्या सुरू आहेत. ठरल्याप्रमाणे कोयना धरणातून नोव्हेंबरपासून चारही आ‌वर्तनं सोडली असती तर तिथल्या पाण्याचा दाब कमी झाला असता. आमचा ताण मिटला असता आणि पूरग्रस्तांचे हालही कमी झाले असते. एकेका छावणीचे ३०-३० लाख रुपये येणे बाकी असून पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठीही कोट्यवधी खर्च करावे लागणार आहेत. दोन्हीकडच्या लोकांचे हाल सुरू आहेत ते वेगळेच. - गणपत खरात, सरपंच, बाळेवाडी.

X
COMMENT