आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावॉशिंग्टन - अमेरिकेतील डर्बी शहरात गेल्या आठवड्यात थँक्स गिविंग डे निमित्त एका सुपरमार्केटमधून खरेदी करणाऱ्यांना एक सुखद धक्का मिळाला. एका व्यक्तीने आपल्या गरजेच्या सर्वच वस्तू आपल्या ट्रॉलीमध्ये भरल्या आणि काउंटरवर बिल भरण्यासाठी गेला. परंतु, दुकानदाराने त्या व्यक्तीकडून पैसे घेण्यास स्पष्ट नकार दिला. यामागचे कारण विचारले तेव्हा आपले बिल आधीच भरण्यात आले आहेत असे हसतमुखाने दुकानदाराने उत्तर दिले. यानंतर त्या व्यक्तीच्या मागे रांगेत उभे असलेले लोक एक-एक करून काउंटरवर गेले. परंतु, त्या सर्वांना असाच सुखद धक्का मिळाला. यानंतर लोकांना यामागचे खरे कारण कळाले.
नाव सांगण्यास दिला नकार...
डर्बी शहरातील वॉलमार्ट सुपरमार्केटमध्ये सगळेच गोंधळात सापडले असताना माइकवर एक घोषणा झाली. त्यामध्ये एका व्यक्तीने तुम्हा सर्वांचे बिल मी भरले असे जाहीर केले. एवढेच नव्हे, तर ज्या लोकांचे आधीच्या खरेदीतून पैसे येणे बाकी होते ते सुद्धा आपण देत आहोत असे तो म्हणाला. परंतु, त्याने आपले नाव जाहीर केले नाही. मी तुमचा सॅन्टा क्लॉज आहे फक्त एवढेच त्याने माइकमध्ये जाहीर केले. सोबतच, ती व्यक्ती पॅट्रियट्स या फुटबॉल संघाची फॅन आहे हेच लोकांना कळू शकले.
अनेकांनी सोशल मीडियावर केले व्यक्त...
सुपरमार्केटमध्ये भाग्यवान ठरलेल्या ग्राहकांपैकी एक जुली गेट्स होती. तिने सांगितल्याप्रमाणे, ती आपल्या वस्तू खरेदी करून सुपरमार्केटच्या कॅश काउंटरवर गेली. त्या ठिकाणी एक उंच जेंटलमन थांबला होता. त्याने जुलीला विचारले आणखी काही खरेदी करायचे आहे का? त्यावर जुलीने लक्ष दिले नाही आणि पुन्हा काही विकत घेण्यासाठी गेली. नंतर ती पुन्हा काउंटरवर परतली तेव्हा तिला कळाले की तो माणूस काही थट्टा मस्करी करत नव्हता. प्रत्यक्षात, तो तिची खरेदी पूर्ण होत नाही तोपर्यंत वाट पाहत बसला होता. एकदा जुलीची खरेदी संपल्याचे कळताच त्याने जुलीचे 199 डॉलर अर्थात 14 हजार रुपयांचे बिल स्वतः भरले. तिने नाव विचारले तेव्हा फक्त सॅन्टा एवढेच तो बोलून निघाला.
एकाचे 56 हजारांचे बिल भरले...
जुलीने सोशल मीडियावर आपले मनोगत व्यक्त केले तेव्हा तिच्या परिसरातील अनेक लोकांनी आपल्याला देखील असाच अनुभव आल्याची कबुली दिली. त्यापैकीच एकाने त्याच मॉलमध्ये शॉपिंग करत होतो. यानंतर काउंटरवर थांबलेल्या व्यक्तीने त्याचे 56 हजार रुपयांचे बिल पे केले असे सांगितले आहे. जुलीची सोशल मीडिया पोस्ट प्रचंड व्हायरल झाली. परंतु, तो माणूस कोण होता हे अद्याप समोर आले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.