Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Another one leopard in aria

आणखी एका बिबट्याचा पिलांसह वावर? शोधासाठी लावण्यात आला खास ट्रप कॅमेरा, दोन पिंजरे

प्रतिनिधी | Update - Aug 30, 2018, 09:27 AM IST

करमाळा तालुक्यातील नदीकाठच्या परिसरात आणखी एक बिबट्याचा पिलासह वावर असल्याची चर्चा पुन्हा सुरू आहे.

 • Another one leopard in aria

  कंदर, सोलापूर- करमाळा तालुक्यातील नदीकाठच्या परिसरात आणखी एक बिबट्याचा पिलासह वावर असल्याची चर्चा पुन्हा सुरू आहे. वाशिंबे, केत्तुर परिसरात वनविभागाने दोन स्वतंत्र पिंजरे लावले असून, बिबट्यांच्या हालचाली टिपण्यासाठी खास 'ट्रॅप कॅमेरा' बसवला आहे. त्यामुळे परिसरात बिबट्याचा वावर आहे की, सदृश इतर प्राणी आहे? हे कॅमेऱ्यात चित्रित होईल.


  गेल्या दोन महिन्यांपासून करमाळा तालुक्यात बिबट्यांचा वावर आहे. उसाला पाणी देताना काही गावकऱ्यांना तो बिबट्या दिसला होता. घाबरलेल्या नागरिकांनी त्यासंदर्भात तक्रारी केल्या. पण, सुरुवातीला वनविभागाने त्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले. तरस असल्याची शक्यता व्यक्त करीत वनविभागाची यंत्रणा गाफील राहिली. दीड महिन्यापूर्वी काही वस्त्यांवरील शेळी, म्हशींच्या रेडकावर बिबट्याने हल्ला केला. त्यावेळी वनविभागाने पायाच्या ठशांच्या नमुन्यांच्या तपासणीत ते बिबट्याचे असल्याचे स्पष्ट होताच पिंजरे लावण्यात आले. गेल्या आठवड्यात उंदरगाव शिवारातील चंद्रकांत कुंभार यांच्या वस्तीवरील पिंजऱ्यात एक तगडा नरबिबट्या अडकला. बिबट्या पिंजऱ्यात अडकण्याची जिल्ह्यातील पहिलीच घटना असून त्यानिमित्ताने परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.


  एक बिबट्या जेरबंद झालेला आहे. तर गावातील काही नागरिकांना अजून एक बिबट्या व पिले पाहिलेली आहेत. तरी नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाकडे जास्तीचे पिंजरे बसवण्याची मागणी केली आहे.
  - हनुमंत नाळे, सरपंच, उंदरगाव


  असा असतो 'ट्रॅप कॅमेरा'
  घनदाट जंगलांमध्ये वाघांची मोजणी, जंगलातील अवैध शिकारी, वृक्षतोड यासह इतर वन्यजीवांचा वावर, अधिवास यांच्या अभ्यासासाठी वापर होतो. दीडशे फूट अंतरापर्यंत सर्व गोष्टी चित्रीत होतात. अंधारातही चित्रीकरण हाेते. वाशिंबे परिसरात पिंजऱ्याजवळ चार दिवसांपासून ट्रॅप कॅमेरा बसवला आहे.


  बिबट्या नेमका आला कोठून?
  या भागात प्रथमतःच बिबट्याचा वावर आढळलेला आहे. या भागात बिबट्या आला कोठून हा एक संशोधनाचा विषय आहे. कंदरपासून कोंढारचिंचोलीपर्यंत उजनी जलाशयाचा भाग आहे. त्यामुळे त्या भागाकडून येण्याची शक्यता कमी. शेजारील नगर जिल्ह्यात बिबट्यांचा वावर आहे. त्या भागातून नदीकाठच्या ऊस क्षेत्रातून बिबट्या जिल्ह्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Trending