आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Anti CAA Protesters Block The Path Of Bengal Governor Dhankhar By Displaying Black Flags

'सीएए' विरोधी निदर्शकांनी काळे झेंडे दाखवून बंगालचे राज्यपाल धनखड यांचा मार्ग रोखला

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
राज्यपाल धनखड यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. - Divya Marathi
राज्यपाल धनखड यांना काळे झेंडे दाखवण्यात आले.

कोलकाता : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) विरोधात घोषणा देत निदर्शकांनी मंगळवारी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना काळे झेंडे दाखवले आणि त्यांचा मार्ग रोखला. त्यामुळे विद्यापीठाच्या वार्षिक पदवीदान समारंभाला हजर राहण्यासाठी आलेल्या राज्यपालांना आल्या पावली परत जावे लागले. राज्यपालांनी या प्रकाराचा निषेध करत 'राज्यातील कायदा-सुव्यवस्था स्थिती पूर्णपणे कोलमडली आहे,' अशी टीका केली.

राज्यपाल धनखड यांचे ममता बॅनर्जी यांच्या सरकारशी अनेक मुद्द्यांवर खटके उडत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यपाल धनखड हे विद्यापीठाच्या वार्षिक पदवीदान समारंभाला हजर राहण्यासाठी आले होते. राज्यपाल आपल्या वाहनातून खाली उतरून कार्यक्रमास्थळाच्या दिशेने निघताच शिक्षा बंधू समितीच्या जवळपास ५० सदस्यांनी 'गो बॅक, नो एनआरसी, नो सीएए,' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. राज्यपालांना काळे झेंडेही दाखवण्यात आले. शिक्षा बंधू समिती ही सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कामगार संघटनेशी संबंधित संघटना आहे. निदर्शकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवल्यामुळे राज्यपालांनी विद्यापीठाचे कुलगुरू सुरंजन दास यांना फोन केला आणि या संपूर्ण नाट्यात तुम्ही 'मूकदर्शका'ची भूमिका बजावत आहात, असा त्यांच्यावर आरोप केला.

सलग दुसऱ्या दिवशी राज्यपालांना दाखवले काळे झेंडे

जादवपूर विद्यापीठात सोमवारीही राज्यपालांना धक्काबुक्की झाली होती आणि त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते. निदर्शने होण्याची शक्यता लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशासनाने २४ डिसेंबरला विशेष पदवीदान समारंभ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रशासनाचा हा निर्णय 'बेकायदेशीर आणि अयोग्य' आहे अशी टिप्पणी करत राज्यपाल सोमवारी विद्यापीठात एका महत्त्वाच्या बैठकीसाठी आले होते. त्या वेळीही त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यामुळे त्यांना परत जावे लागले होते. विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्यपालांना बैठकीसाठी हजर राहता आले नव्हते. त्यामुळे त्यांनी कुलगुरूंना फोन करून ही बैठक राजभवनात आयोजित करण्याची विनंती केली होती. पण, सदस्यांनी विद्यापीठ परिसरात बैठक सुरू करून राज्यपालांची विनंती फेटाळून लावली होती.

अधिकारात कपात केल्यामुळे राज्यपाल-सरकारमध्ये संघर्ष 

राज्य सरकारने अलीकडेच विद्यापीठांचे कुलपती असलेल्या राज्यपालांच्या अधिकारात कपात केली होती. राज्यपाल आणि कुलगुरू यांच्यातील चर्चेबाबत नवीन नियम जारी करण्यात आले होते. त्यानुसार राज्यपालांना विद्यापीठाच्या दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप करता येणार नाही, तसेच ते विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना थेट सल्लाही देऊ शकणार नाहीत. कुलपती आणि विद्यापीठाचे अधिकारी यांच्यात होणारा संपर्क राज्याच्या उच्च शिक्षण विभागामार्फतच होईल.

कायदा-सुव्यवस्था कोलमडली : राज्यपाल

या गोंधळातच परिसरातून परत जाण्याआधी कारमध्ये बसूनच राज्यपाल धनखड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अत्यंत संतप्त स्वरात ते म्हणाले की, 'असे प्रकार करण्याची परवानगी देता येणार नाही. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था स्थिती पूर्णपणे कोलमडलेली आहे. लोकांचा एखादा लहान गट विद्यार्थ्यांच्या भविष्याशी अशा प्रकारे खेळू शकतो याचे आश्चर्य मला वाटत आहे. निदर्शकांपैकी कोणीही विद्यार्थी नव्हता. अशा घटना धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहेत. विद्यापीठ प्रशासन अशा घटना रोखण्यासाठी काहीही करत नाही. प्रशासनाचा आपल्या कर्मचाऱ्यांवर वचक असायला हवा. त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी.'
 

बातम्या आणखी आहेत...