चुकलेला हिशोब / चुकलेला हिशोब

अपर्णा नायगांवकर

Nov 06,2018 03:08:00 PM IST

सकाळी सकाळीच फोन वाजला. ‘सर, घर पाहायला येऊ का? दहा वाजता आलो तर चालेल? तुम्ही घरी असाल ना? भाडं किती आहे?’
‘आधी घर तर पाहून घ्या. बाकीचं नंतर बोलू.’
पहिला भाडेकरू सोडून गेला आणि घर रिकामं झालं. दुसऱ्याच आठवड्यात घराला थोडी रंगरंगोटी करून नवं दिसेल असं केलं आणि बोर्ड लावून टाकला. ‘घर भाड्याने देणे आहे.’
‘घर पाहायला केव्हा येऊ?’ असा फोन आला आणि आमची गडबड उडाली. येणाऱ्याची आतुरतेने वाट पाहू लागलो. येणारा कोण असेल? कोणत्या जातीचा? कोणत्या धर्माचा? नोकरी करणारा असेल की व्यवसाय असेल? की कारखान्यात काम करणारा एखादा वर्कर असेल? मनात प्रश्नांची गर्दी झाली होती. तरी म्हटलं, कशाला इतका विचार करायचा? आता येईल तेव्हा कळेलच.
मागे केव्हातरी, चेहरा पाहून ज्योतिष सांगणाऱ्या एकाने, ‘तुम्ही खूप विचार करता’ असं सांगितलं होतं. ‘मी?’ असं म्हणून मी हसलो होतो. ती गोष्ट अचानक आत्ता आठवली आणि कशाला उगाचच काळजी करत बसायचं, असं म्हणत सगळे विचार मनातून झटकून टाकत, शांत बसण्याचा प्रयत्न करू लागलो.


घर पाहायला आलेल्यांचं नातलगांचं करावं तसं स्वागत केलं, त्यांच्या जवळ विनयाने बोललो, त्यांना सन्मानाने वागवलं. त्यांच्या प्रश्नांना अतिशय सौजन्यानं उत्तरं दिली आणि त्यांच्या चर्येकडे पाहून हे नक्कीच राहायला येणार, असं वाटून आनंदित झालो. परंतु आपापसात काही कुजबुजत, ‘परत येतो’ असं सांगून ते गेले ते गेलेच. नंतर आलेच नाहीत. हातातली सगळी काम बाजूला सारून यांच्यासाठी वेळ काढला ते चुकलंच, असं वाटलं.


नंतर दुसरा एक आला. घराचा अगदी कोपरान कोपरा पाहून ‘घरच्यांनाही दाखवायला हवं, त्यांना घेऊन येतो’ असं म्हणून गेला तोही परत आलाच नाही.
नंतर आलेले काही जण घराचं इन्स्पेक्शन करून खोल्या छोट्या आहेत, पुढचा दरवाजा आणखी मजबूत हवा होता, हॉलला हिरवा रंग चांगला दिसला असता, ही स्विच बरोबर नाहीत असे शेरे मारून गेले.


‘हे पाहा, घर आहे हे असं आहे. तुम्ही घरं बांधणारे आहात का? असाल तर तुम्हाला हवं तसं बांधून घ्या ना. हे घर पसंत असेल तर तसं सांगा नाहीतर कृपया निघा. मी काही तुम्हाला घराची कुंडली मांडायला बोलवलेलं नाही,’ असं ओरडून त्यांना सांगावं असं वाटलं होतं. पण तसं बोलणं शक्य नव्हतं. शेवटी व्यवहार होता ना. ‘मला थोडं अर्जंट काम आहे, लगेच जायला हवं आहे,’ असं सांगून, राग गिळून, त्यावेळी हसत हसत त्यांना निरोप दिला.


असे अनुभव घेता घेता, घर भाड्याने देण्यातला आमचा सळसळता उत्साह कमी होऊ लागला. त्यानंतर घर पाहायला येतो असा फोन आला तर ‘आत्ता नको, संध्याकाळी पाच वाजता या,’ असं सांगत भेटायची वेळ मी ठरवू लागलो. वेळेवर तेथे जाऊन, येणाऱ्यांनी थोडा उशीर केला तरी त्यांची वाट पाहत न थांबता, व्हायचं ते होईल असं म्हणत तडक कामाला निघून जाऊ लागलो. आम्ही काही प्रमाणात हताश झालो होतो. सुरुवातीची उत्सुकता, धडधड हळू हळू कमी होऊ लागली. या बाबतीत थोडं सबुरीने घ्यायला हवं असंही वाटू लागलं.


भाडेकरू म्हणू कोणीही येऊ दे असं म्हटलं तरी एकटं राहणाऱ्याला भाडेकरू म्हणून ठेवणं हे काही शहाणपणाचं नव्हतं. एके दिवशी एक पंचविशीची पंजाबी मुलगी जागा पाहायला आली. दिसायला छान होती. बरोबर कोणाला तरी घेऊन आली होती. आम्ही शाकाहारी आहोत म्हणाली.
‘वीस हजार भाडं ठीक आहे, सध्या मी एकटीच येणार आहे. पुढच्या महिन्यात कलकत्त्याहून माझी मैत्रीण येईल,’ असं म्हणाली. तिच्या बरोबर आलेला उंचापुरा तरूण ‘कझिन’ आहे असं ती म्हणाली खरं, पण तो खरा कोण आहे काय माहीत? समजा तो उद्या इथेच राहिला, परवा आणखी कोणी दुसराच आला तर काय करणार? प्रीती प्रेम अशा प्रकरणात अडकून किती मुली जीव देतात. काही जास्त कमी झालं तर आपण काय करणार? आणि त्या पोलिसांच्या भानगडी, नको रे बाबा. नसता ताप डोक्याला.


‘एकजण येऊन घर पाहून गेला आहे. जवळ जवळ नक्कीच झालं आहे. काय होतंय ते तुम्हाला उद्या कळवतो,’ असं सांगून तिला कसंबसं कटवलं.


पूर्वी वरसंशोधन किंवा वधूसंशोधन करताना किती काळजीपूर्वक चौकशी केली जायची. आता भाडेकरू ठेवताना त्याहीपेक्षा सावधगिरी दाखवावी लागते. थोडाही ढिसाळपणा केला तर आपल्याच घराचा आपल्यालाच त्रास व्हायचा.


याआधीचा भाडेकरू चांगला नव्हता असं नाही, पण बोलणं अगदी वाईट आणि हजार तक्रारी. डोक्याला नुसता त्रास व्हायचा. ‘काल पाणी नीट आलं नव्हतं. झुरळं खूप झाली आहेत. परवा एकदा आमटीत झुरळ पडलं होतं. सुकी मिरची म्हणून हातात घेतली तर मिशा दिसल्या. दिसल्या नसत्या तर खाल्लं अस्तं ना हो. अहो, पोटात गेलं असतं की झुरळ.’ वगैरे वगैरे. भाडं वसूल करायला गेलं की तक्रारी सुरू. तोंड वाकडं करून आपल्या सांसारिक कथाव्यथा सांगायला सुरुवात. पहिल्या पहिल्यांदा ‘ठीक आहे, पुढच्या महिन्यात द्या,’ असं दया येऊन सांगितलं पण नंतर तो माझा मूर्खपणा होता हे लक्षात आलं.


त्या दिवशी असाच एक फोन आला. कोणाचा असेल असा विचार करत फोन उचलला. फारसा उत्साह नव्हताच.
‘सर, नमस्ते. मी गोपालस्वामी. नॅशनल कॉलेजमध्ये सायन्स लेक्चरर आहे.’
‘नमस्कार, या घर पहायचं आहे ना? या.’ असं म्हणून वेळ ठरवली.
माणूस सुमारे पस्तिशीचा, चांगल्या घरचा वाटला. मिशा मात्र पांढऱ्या दिसत होत्या. बायको थोडी नाजूकच वाटत होती. त्यांचं एकमेकांबरोबरचं बोलणं,एकमेकांकडे पाहून हसणं पाहून उगाचच मनात आलं, हे पती-पत्नीच आहेत ना? हो ते पतीपत्नीच होते. त्यांनी सगळं घर अगदी निरीक्षण करून पहिलं. स्वयंपाकघराच्या भिंतीना हात लावून तिने नवर्‍याला काही तरी सांगितलं. सोई - गैरसोईंचा ऊहापोह करून झाला. पत्नीने सगळी कपाटं, दरवाजे लावून उघडून पाहिले. नळ सोडून पाणी येते की नाही ते पाहिलं. नवऱ्यानेही पंखे लावून ते चालू आहेत की नाही ते पाहिले. अशा प्रकारे सुमारे अर्धा तास घराची तपासणी करून झाली. घराच्या भोवताली फुलझाडं, वेली होत्या. छान हिरवागार परिसर होता. ते पाहून ‘किती मोठी जागा आहे, भाज्या लावता येतील नाही?’ असं ती उत्साहाने नवऱ्याला म्हणाली. शंकाच नको. हे नक्कीच राहायला येणार, असं वाटावं अशा प्रकारे ते प्रेमाने, आपलेपणाने घराकडे पाहत होते. मी शांतपणे बघत करत होतो. रजाच घेतली होती त्यामुळे मला घाई नव्हती. त्या लोकांबद्दल माझंही मत चांगलं झालं होतं. त्यांना घर आवडलेलं दिसत होतं आणि ते नक्कीच राहायला येणार असं वाटल्याने, भाडं थोडं वाढवून सांगायला हरकत नाही असा विचार मनात आला.
आम्ही व्हरांड्यात बसून गप्पा मारू लागलो. ‘घर चांगलंच आहे,’ असं म्हणून रिक्षा घरापर्यंत येते का? बस सोयीची आहे का? सेल्समनचा त्रास कितपत? चोर्‍यामार्‍या होत नाहीत ना? अशा सगळ्या चौकशा करून झाल्या. शेवटी डासांबद्दलही विचारून झालं. अत्यंत सौजन्याने व शांतपणे मी सगळ्या प्रश्नांना उत्तरं देत होतो.


‘ठीक आहे. उद्या येतो.’
‘या, सगळ्या बाजूने विचार करून तुम्हाला घर योग्य वाटलं तर पुढची बोलणी करू.’
‘आमच्या शेजारी एक ज्योतिषी आहे. त्याचा सल्ला आम्ही मानतो. रोजच्या रोज काही तरी अडचणी उभ्या राहतात, व आपण गोंधळून जात असतो नाही का? माझा वास्तूशास्त्रावर अजिबात विश्वास नाही. माझी बायकोही याच मताची आहे. परंतु कधी कधी विश्वास ठेवायची वेळ येते. आमच्या शेजारच्या घरातली गोष्ट सांगतो. त्यांची स्टोअर रूम ईशान्य दिशेला होती. बाप रे, घरात नवराबायकोची सतत भांडणं. एका दिवस भांडणाशिवाय जात नव्हता. एके दिवशी एका ज्योतिषाने त्यांना सांगितलं की, या क्षणापासून या स्टोअर रूमचं देवघरात रूपांतर करा. पाहा कसा चमत्कार होतो. नंतर त्याने घरात होमहवन वगैरे केलं. त्या नंतर आता सगळे सुखात, शांततेत राहात आहेत. लग्नाला दहा वर्षं होऊन गेली, आता बायको गरोदर आहे. हे सगळं पाहिल्यावर असं वाटतं की, वास्तू त्यांना एकदा दाखवली तर काय बिघडणार आहे? म्हणून त्या दृष्टीने पाहतोय. उगाच घाई कशाला करायची? असं मलाच विचारलं. हे सगळं ऐकून उत्साह आणखीनच ओसरू लागला. एकमेकांवर प्रेम करणाऱ्या जोडीच्या लग्नाचा मुहूर्त ठरवायची वेळ आली असताना, ज्योतिषाने,’पत्रिका जुळत नाही. हे लग्न सुखाचं होणार नाही,’ असं सांगावं तसं घराच्या बाबतीतही वाटू लागलं होतं.


तसं बघायला गेलं तर त्याचं म्हणणं सामान्यपणे कोणालाही पटण्यासारखं होतं. देव आहे असं म्हणून सगळा मी भार देवावर टाकला. ते राहायला येणारच याची खात्री होती. याला काही तार्किक उत्तर नव्हतं परंतु आपलं मन सांगतं ना?
‘माणसं चांगली दिसताहेत. तो लेक्चरर आहे, भाडं ठरवताना उगाच कटकट करू नका,’ बायकोने त्यांची वकिली सुरू केली. ‘बघा, घराभोवती भाज्या लावायचं सुचलं तिला, किती हुशार आहे.’ बायको येणाऱ्या बाईची चक्क स्तुती करत होती. ‘ते जाऊ द्या, त्यांच्या घरात किती माणसं आहेत ते विचारायला हवं होतं ना?’ बायकोचं चालूच होतं.


अरे, मी तर विसरूनच गेलो होतो. विचारायचं राहून गेलं खरं परंतु घर सगळ्यांना पसंत पडलेलं दिसतंय, त्यातच समाधान आहे. असो, तो संध्याकाळी परत आला.
‘सगळं छान जमून आलं आहे. जणू आमच्या संसारासाठीच हे घर बांधलेलं आहे. ज्योतिष्यानेही सांगितलं आहे की वास्तू शुभ आहे.’ मी शांतपणे निःश्वास टाकला. ही आतून कॉफी घेऊन आली. इकडच्या तिकडच्या गप्पा चालूच होत्या.


‘आधीचा भाडेकरू चौदा हजार देत होता. परंतु या महिन्यापासून मी भाडं पंधरा हजार नक्की केलं आहे. घर लहान आहे, तुम्ही दुसरं मोठं घर पाहत आहात ना? तुम्हाला दुसरं घर मिळेपर्यंत तुम्ही पंधरा हजार द्या.’
त्याने लगेच ‘चालेल, मान्य,’ असं म्हटल्यावर सोळा हजार सांगायला हवे होते असं मनांत आलं. पण काळ हसत होता.
बायको उप्पिट बनवायला आत गेली.
‘घर सगळ्या बाबतीत आवडलं आहे ना?’ काही तरी बोलायला हवं म्हणून मी बोलू लागलो. ‘हो, घर छानच आहे. पण एखादी खोली अजून असती तर बरं झालं असतं. मुलाला अभ्यासासाठी उपयोगी पडली असती.’
‘त्याच्यासाठी एक खोली आहे की?’
‘माझी आईसुद्धा आहे ना?’
हे ऐकून मी चकितच झालो. म्हणजे हे चार लोक आहेत तर.
काही कारणाने काही दिवसांसाठी म्हणून ते लोक येथे येणार होते. त्यांचा दुसऱ्या घराचा शोध चालू होताच. बाप रे. म्हणजे पुन्हा नवा भाडेकरू शोधा, पुन्हा ते प्रश्न. माझा उत्साह मावळू लागला. माझा चेहरा पाहून त्याला काही जाणवलं असावं.
‘नाही, मोठं घर शोधण्याचा आत्ता लगेचच विचार नाही, आता काही महिन्यांचाच प्रश्न आहे. अम्माचं वय झालेलं आहे. मधून मधून आजारीही असते. आता तिचे कितीसे दिवस उरलेत. जास्तीत जास्त एखादं वर्ष.’
जणू मोठं सत्य त्याने बोलता बोलता सहजपणे सांगून टाकलं होतं. पण मी उत्साहात असल्याने त्या बोलण्याकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं.
बोलता बोलता त्याने चेक लिहायला घेतला.
‘अहो, इकडे या जरा,’ आतून हिची हाक आली. उप्पिट तयार झालं असावं. मी आत गेलो. ही घाईघाईने मला मागील दारी घेऊन गेली व ठणकावून मला म्हणाली, ‘त्यांना घर देणार नाही असं स्पष्ट सांगून टाका.’ हिचा आवाज निश्चयी होता व चेहरा कठोर.
‘आता हे काय मधेच? ते चांगलं भाडं द्यायला तयार आहेत. मग असं का म्हणते आहेस?’ मी.
‘त्याबद्दलची चर्चा आता नको. नंतर बोलू. त्यांना उप्पिट खायला घाला आणि जागेचं जमणार नाही असं सांगून टाका,’ ती वैतागून म्हणाली.
तिच्या चेहऱ्याकडे निरखून पहिलं असता तिथे चीड, तिरस्कार दिसला. असं का असावं? काही कळेना. ते आल्यावर किती खूश होती ती. आणि आता अचानक काही झालं तरी त्यांना जागा द्यायची नाही असं म्हणते आहे. तो नाही तर दुसरा कोणी येईलच ना. मला तर काहीच प्रॉब्लेम दिसत नव्हता. पण हिचं वागणं मात्र विचित्र वाटत होतं. उप्पिट करायला म्हणून आत गेली आणि डोक्यात कसलं भूत शिरलं म्हणावं? डॉक्टरकडे न्यावं लागणार की काय? मी घाबरून गेलो.
सगळं ठरून, अॅडव्हान्स घ्यायची वेळ आली असता आता नाही कसं म्हणायचं? प्रसंग मोठा बाका होता.


‘काळजी करू नका, तसं काही दुसरं कारण नाही. बायकोच्या भावाची इकडे बदली झाली आहे असा फोन आला आहे. आता त्यालाच घर द्यावं लागणार, असं सांगून टाका.’
‘तुझा भाऊ नेमका कुठे राहतो?’ मी आश्चर्याने विचारलं.
‘तो काही विचारणार नाही हो. घाबरू नका. जा बाहेर.’
अस्वस्थ होत बाहेर आलो. त्याचा चेक लिहून झाला होता. फक्त हातात घ्यायचा बाकी होता. पण त्याला बायकोच्या भावाची बदली वगैरे सांगून सध्या जागा देता येणार नाही असं सांगितलं.
’भाडं वाढवून हवं आहे का? चालेल.’
‘छे छे, तसं काही नाही,’ शेवटी निराश होऊन तो बाहेर पडला. मला मात्र कानकोंडं झाल्यासारखं वाटलं.
तसाच घरात गेलो. बायकोचा भयंकर राग आला होता. ‘काय चाललंय हे सगळं?’ संतापून विचारलं.
‘त्याचं बोलणं नीट ऐकत होतात ना? अहो, आई मुलाला जन्म देते, वाढवते, त्याच्यासाठी खस्ता खाते, मुलासाठी ती देवतेसमान असते ना? आणि हा काय म्हणाला? आई कुठे जास्त जगणार आहे? म्हणे जास्तीत जास्त वर्ष. हा तर तिच्या श्राद्धाचीच तयारी करतोय. किती सहज बोलत होता. तेही बायकोसमोर. तीही एका मुलाची आई आहे ना? तोंड पहिलं का तिचं? हसत हसत नवर्‍याच्या हो ला हो करत होती. त्यांचं हे आईबद्दलचं बोलणं मला अजिबात रुचलेलं नाही. हे असं ऐकलं तेव्हाच ठरवलं, अशा निर्दयी माणसाला आपलं घर राहायला द्यायचं नाही. त्याचं आणि त्याच्या आईचं काही ही होऊ दे. आणि ती मरायचीच असेल तर आपल्या घरात मुळीच नको. पाहू देत दुसरं घर.’
यावर काय बोलावं मला सुचत नव्हतं. त्याच्या बोलण्याचा अर्थ मला आता उलगडत होता. मुलाने असा विचार करणं शोभतं का? अशा लोकांना घर दिलं नाही ते बरंच झालं असंही मनात आलं.
एक वर्षांनंतर पुन्हा तो येताना दिसला. गाडीतून उतरून थेट आमच्याकडेच येत होता. मी त्याला लगेच ओळखलं खरं पण थोडा थकल्यासारखा वाटला. आजारी होता की काय? चेहरा उतरलेला दिसत होता. पण मी काहीच विचारलं नाही. नमस्काराचे सोपस्कार झाल्यावर म्हटलं, ‘एकटेच आलात? मिसेस नाही आल्या?’

तो खालच्या आवाजात म्हणाला, ’ती गेली.’
यावर काय बोलावं कळेना. मी गोंधळून गेलो.
‘आता अम्माच बघते घरातलं सगळं.’
त्याच्या डोळ्यात अश्रू होते.

- अपर्णा नायगांवकर

X
COMMENT