आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद : बंदोबस्तासाठी हजारो पोलिस, शीघ्र कृती दल रस्त्यावर; विविध जिल्ह्यांतील शाळांना सुटी जाहीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. आरक्षण आंदोलनात या पूर्वी समाजकंटक घुसल्याने मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मालमत्तेसह खासगी मालमत्तांचेही नुकसान झाले. त्यामुळे गुरुवारी बंददरम्यान शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन सर्वच मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केले आहे. तथापि, आंदोलनादरम्यान समाजकंटकाने आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केलाच तर त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी राज्य राखीव पोलिस दलासह शीघ्र कृती दलाच्या अनेक तुकड्या बुधवारी रात्रीपासूनच मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. मराठवाड्यातील बहुतेक शिक्षण संस्थांनी आपल्या शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे. एसटी महामंडळानेही परिस्थिती बघून बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतेक आगार प्रमुखांनी गुरुवारी बसेस सोडणार नसल्याचे “दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.


बीड : पोलिसांनीच सांगितले, बस बंद ठेवा!
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या परवानगीनेच  जिल्ह्यात बस सुरू राहणार आहेत. जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांनी बीड विभागाला पत्र पाठवले असून  सुरक्षेच्या दृष्टीने गुरुवारी बंदच्या दरम्यान बाहेर बस सोडण्यात येऊ नये. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून एसटीनेही बुधवारी रात्री ग्रामीण भागात पाठवलेल्या मुक्कामी बस परत डेपोत बोलावल्या आहेत. जिल्ह्यातील आठ डेपोत ५२५ बसेस असून या बस पोलिसांच्या परवानगीनंतर परिस्थीतीनुसार रस्त्यावर सोडल्या जाणार आहेत.


उस्मानाबाद : पोलिसांचे ८ किलाेमीटर पथसंचलन
मागील बंद दरम्यान घडलेल्या दगडफेकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून या वेळी पोलिस दलाने मोठा बंदोबस्त मागवला असून बुधवारी जवळपास साडेतीनशे कर्मचारी व १२ अधिकाऱ्यांनी शहरातून सशस्त्र पथसंचलन केले.  आरक्षणाच्या मागणीवरून उस्मानाबादेत  २४ जुलै रोजी काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. या  पार्श्वभूमीवर ९ ऑगस्टच्या बंद निमित्त कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. या बंदच्या निमित्ताने सोमवारी रात्रीच राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या उस्मानाबादेत दाखल झाल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर हजर राहण्यास सांगितले आहे.  पोलिस प्रशासनासह  मराठा क्रांती मोर्चानेही  मराठा समाजाला शांततेचे आवाहन केले आहे.  बंदच्या पूर्वसंध्येला (बुधवार) पोलिस दलाने शहरात सशस्त्र पथसंचलन केले. 


जालना : दाेन हजारांवर शाळांना सुटी जाहीर
आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने केली जाणार आहे. शहरात संभाजी उद्यान परिसरात उपोषणास बसलेल्या समाज बांधवांनी शिवाजी पुतळ्यापर्यंत रॅली काढून काढली.  अनुचित प्रकार होऊ नये म्हणून १ हजार २१२ पोलिसांचा बंदोबस्त तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शाळा बंद ठेवण्याचे पत्र काढले आहे.   जिल्ह्यातील 
खासगी आणि शासकीय अशा २ हजार १६० शाळा बंद राहणार आहेत.  


लातूर : सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार
मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी बंदचे आवाहन केले असून हा बंद शांततेत पार पाडावा.  त्याला हिंसक वळण लागू देऊ नये, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी पत्रकार परिषदेत केले. बंदच्या काळात जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, दुकाने, सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बंद दरम्यान केवळ रुग्णालये, औषधी दुकाने सुरू राहतील.  रेल्वे परीक्षेसाठी जाणाऱ्या तरुणांना मुभा देण्यात आली आहे, असे सांगण्यात आले. खासगी वाहनेही रस्त्यावर येऊ देणार नाही. मराठा समाजातील नागरिक गुराढोरांसह रस्त्यावर ठिय्या देतील, असे सांगण्यात आले.


नांदेड  : संरक्षण मिळाले तरच बस सुरू करणार  
 बुधवारी नांदेड येथील विश्रामगृहात सकल मराठा समाजाची  बैठक झाली. या बैठकीला सकल मराठा समाज व इतर संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बंद शांततेत पाळावा, हिंसाचाराला प्रोत्साहन देऊ नये असेही आवाहन या वेळी करण्यात आले.  दरम्यान, परिवहन महामंडळाच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक अविनाश कचरे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन एसटी बस वाहतुकीबाबत चर्चा केली. बस वाहतुकीला संरक्षण मिळणार असेल तर बस वाहतूक सुरू ठेवली जाईल, असे स्पष्ट केले. 


परभणी :  समाजकंटकांना प्रतिबंध करा : समन्वयक
बंदचे आंदोलन हे संयम व शांततेच्या मार्गाने करण्यात येणार आहे. पोलिस यंत्रणेने आंदोलनाच्या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून काम करून हिंसक मार्गाचा अवलंब करणाऱ्या घटकांचा प्रतिबंध करावा, असे मत मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी पी.शिवशंकर, पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, अप्पर पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, तहसीलदार विद्याचरण कडवकर, पोलिस निरीक्षक रामराव गाडेकर आदींची उपस्थिती होती. मराठा समाजाच्या वतीने सुभाष जावळे, किशोर ढगे, अॅड.विष्णू नवले, नवनाथ जाधव, दिनकर गरुड, श्रीमती किरण काळे, श्रीमती नंदिनी जाधव, श्रीमती पूनम मोरे आदींसह प्रतिनिधी उपस्थित होते.


हिंगोलीत : अप्रिय घटना टाळण्यासाठी ९०० वर पाेलिस तैनात
मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या गुरुवारच्या राज्यस्तरीय बंद आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना होऊ नये यासाठी पोलिस दलाने चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात ४५ पोलिस अधिकारी, ४८०  कर्मचारी, ४०० गृहरक्षक दलाचे जवान आणि राज्य राखीव दलाची एक कंपनी असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर ठिकठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा कार्यान्वित करण्यात आले असून पोलिसांची व्हिडिओ रेकॉर्डिंग जीप शहरा-शहरांमध्ये फिरणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...