आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अारक्षणासाठी अांदाेलन; अात्मघात, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करू नका!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे गुरुवारी गिरणा नदी पुलावर रास्ता रोको करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय व प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी तगडा पोलिस बंदोबस्त राहणार आहे. दरम्यान, अांदाेलनात अात्मघात, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करू नका, असा सल्ला मराठा क्रांती माेर्चाने अांदाेलकांना दिला अाहे. 


सकल मराठा समाजाने आपल्या मागण्यांसाठी ५८ मूक मोर्चे काढले. मराठा समाजाला आरक्षण, शेतीमालाला हमीभाव व संपूर्ण कर्जमाफी, या मुद्यांना घेऊन वर्षभरापासून आंदोलने करण्यात येत आहेत. यानंतरही महाराष्ट्र सरकारने सकारात्मक पाऊल उचललेले नाही. त्यामुळे सकल मराठा समाजाने मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून ऑगस्ट क्रांतिदिनी ९ ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक दिलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी दुपारी २ वाजता गिरणा पुलावर रास्ता रोको करण्यात येणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चातर्फे कळवण्यात आले आहे. त्यावर छावा संघटनेचे भीमराव मराठे, प्रतिभा शिंदे, अॅड.सचिन पाटील, संजय पवार, प्रमोद पाटील, चंदन पाटील, खुशाल चव्हाण, नाना महाले यांच्या सह्या आहेत. त्याचप्रमाणे मराठा क्रांती मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. तालुकास्तरावर तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या वेळी मराठा क्रांती मोर्चातर्फे जिल्हाधिकारी व तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात येईल. जिल्हा पोलिस दलाचा चाेख बंदाेबस्त तैनात असणार अाहे. 


ग्रुप कॉलने सूचना 
संपूर्ण जिल्ह्यात देखील मराठा समाजाचे अांदोलन होणार असून त्या अनुषंगाने पोलिस दलाने आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी केल्या आहेत. बुधवारी दुपारी १२ वाजता शिंदे यांनी नियंत्रण कक्षातून ग्रुप कॉलवरुन जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त पुरवण्यात येणार आहे. वेळाेवेळी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला जाणार अाहे. 


पाल्यांना शाळेत साेडा अन‌् घेऊनही जा 
मराठा क्रांती मोर्चातर्फे ९ ऑगस्ट रोजी आंदोलन होणार असल्याने शहरातील बहुतांश इंग्रजी शाळांनी सुटी जाहीर केली आहे. काही शाळा अर्धा दिवस सुरू राहणार आहेत. त्याबाबत शाळांनी पालकांना मोबाईलव्दारे संदेश पाठवून कळवले आहे. यात सकाळच्या सत्रातील शाळांमध्ये पालकांनी स्वत:मुलांना आणून सोडावे. शाळा सुटल्यानंतर घेऊन जावे, असे संदेशात म्हटले अाहे. अमरावती, पुणे, जालना जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र काढून शाळा, महाविद्यालयांना गुरुवारी सुटी जाहीर केलेली आहे. जळगाव जिल्ह्यात मात्र,तसे जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाने स्वत:हून हा निर्णय घेतला आहे. 


कायदा-सुव्यवस्थेला गालबाेट लावू नका 
मराठा क्रांती मोर्चातर्फे शांततेच्या मार्गाने जळगावात आंदोलन करण्यात येणार आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे. कोणत्याही शासकीय संपत्तीचे नुकसान होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावयाची आहे. कुणीही कायदा हातात घेणार नाही. तसेच आंदोलनादरम्यान तरुणांनी आत्मघातकी मार्गाचा अवलंब करू नये, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे प्रा. डी. डी. बच्छाव यांनी केले आहे. 


परिस्थितीनुसार बसफेऱ्यांचा निर्णय 
मराठा क्रांती माेर्चाने राज्यभरात केलेल्या आंदोलनात झालेल्या हिंसात्मक कारवाया व त्यात एसटी बसेसची झालेली तोडफोड लक्षात घेता गुरुवारी जळगाव आगारातून परिस्थितीनुसार बसफेऱ्या थाबंवल्या जाणार असल्याची माहिती आगारप्रमुख पी. एस. बोरसे यांनी दिली. पोलिस प्रशासनाकडून सुचना प्राप्त झाल्या नाहीत. दुपारनंतर आंदोलनाची परिस्थिती लक्षात घेता, पोलिसांच्या सुचनेनुसार बसफेऱ्या थांबवणे अथवा बंदबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचेही बोरसे यांनी बुधवारी 'दिव्य मराठी'शी वार्तालाप करताना सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...