भारतात मोठ्या प्रमाणात आयफोन निर्मिती होणार

कंपनीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात आमंत्रित केले असल्याचे गोऊ यांनी सांगितले.  

दिव्य मराठी

Apr 16,2019 11:22:00 AM IST

ताइपै- या वर्षापासून भारतात मोठ्या प्रमाणात आयफोनचे उत्पादन सुरू होणार असल्याचा दावा फॉक्सकॉन तंत्रज्ञान समूहाचे अध्यक्ष टेरी गोऊ यांनी केला आहे. फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी अॅपलसाठी हँडसेट उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. ही कंपनी आतापर्यंत केवळ चीनमध्येच अॅपल उत्पादनांची निर्मिती करत होती. कंपनीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात आमंत्रित केले असल्याचे गोऊ यांनी सांगितले.


अॅपल मागील अनेक महिन्यांपासून आय फोनच्या जुन्या मॉडेलचे उत्पादन बंगळुरू येथील प्रकल्पात करत होती. आता या फाेनचे नवीन मॉडेलदेखील भारतातच उत्पादित केले जाणार आहे. फॉक्सकाॅन चेन्नईमध्ये पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू करण्याआधी भारतात नवीन आयफोनच्या उत्पादनाची चाचणी घेणार आहे. गोऊ यांनी सांगितले की, “आम्ही भारताच्या स्मार्टफोन उद्योगामध्ये भविष्यात मोठी भूमिका पार पाडणार आहोत.’


भारत सध्या जगातील सर्वाधिक तेजीने वाढणारा स्मार्टफोन बाजार आहे. चीनमध्ये स्मार्टफोन विक्रीची गती मंदावली आहे. त्याचबरोबर चीनमधील प्रतिस्पर्धी कंपन्या हुवावे आणि श्याओमीमुळे तेथील बाजारातील अॅपलची भागीदारी कमी होत आहे. आयफोनची जास्त किंमत असल्याने अॅपलची भारतात जास्त मागणी नाही. मात्र, भारतात उत्पादन सुरू झाल्यास कंपनीचे २० टक्के आयात शुल्क कमी होणार आहे. काउंटरपॉइंट रिसर्चचे अॅना लिस्ट कर्ण चौहान यांनी सांगितले की, “फॉक्सकॉनसाठी चीनमधील बाजारात आता जास्त संधी नाही. तसेच चीनमध्ये कामगारांवरही जास्त खर्च करावा लागतो. भारत हा वाढत असलेला स्मार्टफोन बाजार आहे. येथील देशांतर्गत क्षमताही खूपच जास्त असून या क्षेत्राला निर्यातीचे केंद्र म्हणूनही विकसित करता येते.’ वास्तविक, भारतात उत्पादनात वाढ झाल्यानंतर चीनमधील उत्पादनावर त्याचा किती परिणाम होईल हे अद्याप स्पष्ट नाही.

X