आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे ८ नगरसेवक अपात्र झाल्यास प्रशासकाची नियुक्ती; नामुष्की पत्करावी लागणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले- राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ नगरसेवक अपात्र ठरवले गेल्यास अकोले नगरपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसे झाल्यास राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांसाठी ही मोठी नामुष्कीची बाब ठरेल. 


विद्यमान उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांचे पद वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. प्रभाग ९ मधून ते निवडून आले आहेत. याच प्रभागातील महालक्ष्मी मंदिर परिसरात सर्व्हे नंबर ७३ वर त्यांचे वडील काशिनाथ महादू वडजे यांच्या नावे तीन मजली इमारतीचे बांधकाम विनापरवाना केले, म्हणून त्यांना अपात्र ठरवले जाऊ शकते. या संदर्भात नगरपंचायतीने त्यांना नोटीस बजावली होती. त्यांनी या नोटिशीला उत्तर दिलेले नाही. त्यामुळे त्यांचे पद धोक्यात आले आहे. 
प्रभाग ६ मधून निवडून आलेले प्रकाश नाईकवाडी हे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक आहेत. ग्रामपंचायत असताना त्यांनी अनेक वर्षे सदस्य व सरपंच म्हणून काम केले आहे. त्यांची पत्नी सरला यांनी काही काळ अमृतसागर सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळावर काम केले आहे. त्यांच्याही नावाने सर्व्हे नंबर ७२-१ मध्ये विनापरवाना बांधकाम केल्याचे समोर आले आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे प्रकाश नाईकवाडी हे नगरसेवकपदास अपात्र ठरवले जाऊ शकतात. 


प्रभाग १३ मधून निवडून आलेल्या कीर्ती भारत गायकवाड यांच्यावर अपात्रतेबरोबरच खोटे दस्तावेज सादर केले म्हणून फौजदारी गुन्हाही दाखल होऊ शकतो. त्यांनी नगरसेवकपदासाठी अर्ज दाखल केला तेव्हा त्यांनी सादर केलेल्या दाखल्यावर ५ जून १९९६ अशी जन्मतारीख आहे. त्यानुसार निवडणूक लढवण्यास पात्र वय म्हणजे २२ वर्षे होत होते. मात्र, सादर करण्यात आलेला हा जन्मदाखला पुरावा खरा नसल्याचे स्पष्ट झाले. या कागदपत्रात फेरबदल केले आहेत. झेरॉक्स प्रती साक्षांकित नाहीत, ही बाब माहिती अधिकारात स्पष्ट झाली आहे. अधिकृत जन्म दाखल्यावर जन्मतारीख ५ जून १९९३ आहे. निवडणूक लढवताना त्यांचे वय २१ पूर्ण होत नाही. हे पुरावे तत्कालीन उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संदीप निचित यांनी नजरेआड करून योगेश नाईकवाडी यांनी घेतलेला आक्षेप चुकीचा ठरवून अन्यायकारक निर्णय दिला असल्याचे समोर आले आहे. 


प्रभाग १२ शाहूनगरमधून निवडून आलेले नगरसेवक सुरेश ताया लोखंडे यांच्यावरही अपात्रतेची टांगती कुऱ्हाड आहे. शासनाच्या जागेत अतिक्रमण करत त्यांनी दोन मजली आरसीसी इमारत बांधली आहे. अनधिकृत बांधकाम केल्याने २३ जानेवारी २०१७ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. प्रवीण निकम यांनी त्यांना नोटीस बजावली होती. अद्याप हे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलेले नाही. 


अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक जिंकलेल्या नगरसेविका विमल दत्तात्रेय भोईर यांच्यावरही शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप आहे. सिटी सर्व्हे क्रमांक ५२ मधील जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. ही मिळकत नगरसेविका भोईर यांचे पती दत्तात्रेय भोईर त्यांच्या मालकीच्या जागेशेजारीच पाठीमागील बाजूला आहे. ते अडचणीचे ठरू शकते. 
स्वीकृत नगरसेवक विजय सारडा व सचिन शेटे हेही अपात्र ठरू शकतात. या पदावर नियुक्तीसाठी जे निकष आहेत ते त्यांना पूर्ण करता आले नसतानाही केवळ पक्षश्रेष्ठींच्या आग्रहाखातर या नियुक्त्या करण्यात आल्या. स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत हद्दीतील न्यासाकडे नोंदणी केलेल्या एखाद्या सेवाभावी संस्थेत पदाधिकारी म्हणून काम केल्याचा पाच वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. यासाठी त्यांनी जी कागदपत्रे सादर केली आहेत, ती संशयास्पद आहेत. 


विनापरवाना बांधकाम केल्याचे कारणावरून नगरसेविका म्हणून अपात्र ठरवण्यात आलेल्या सुभद्रा संपत नाईकवाडी यांच्या नगरसेवकपदावरून जे राजकारण खेळले गेले, त्याच पद्धतीने इतर नगरसेवकांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास निवडणूक लढवून आलेले सहा व स्वीकृत दोन अशा आठ नगरसेवकांना पद गमवावे लागेल. तसे झाल्यास नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष ही दोन्ही पदे धोक्यात येतील. नगरपंचायतीवर प्रशासक नियुक्त करावा लागेल. 


आपल्या नगरसेवकांची पदे धोक्यात येऊ नयेत, म्हणून वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केले जात आहेत. तालुक्यातील राष्ट्रवादीचे श्रेष्ठी यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात कोणी चौकशी अर्ज दाखल करू नये व आक्षेप घेऊ नयेत म्हणून घेता येईल तेवढी काळजी घेत आहेत. पण नुकत्याच झालेल्या नगराध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून सुभद्रा नाईकवाडी यांच्याकडे संपूर्ण अकोलेकर अपेक्षा ठेवून होते, तेव्हा नगरपंचायत वाचवायला डोळ्यात तेल घालून लक्ष देत असलेल्या राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींनी आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली होती काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 


आरोपांत तथ्य नाही... 
राष्ट्रवादीचे एवढ्या संख्येने नगरसेवक अपात्र ठरवले जाणार असतील, तर त्यावर पक्षाचे नेते निश्चित उपाय शोधतील. पण अद्याप मला यासंदर्भात काहीच माहिती नाही. यापूर्वी राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाला अपात्र ठरवण्यात आले आहे. परंतु त्यावेळी आमच्याकडे तक्रार करण्यात आली नव्हती. थेट वृत्तपत्रांतूनच आम्हाला ते समजले. आता त्याची पुनरावृत्ती होऊ देणार नाही. एकदम ८ नगरसेवक अपात्र ठरवण्यात येणार असल्याच्या आरोपात काहीही तथ्य नाही. त्यामुळे नगरपंचायतीवर प्रशासक नियुक्तीची शक्यता नाही.
-गिरजाजी जाधव, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी. 


मुख्यमंत्र्यांकडे तक्रार 
अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे व अन्य कारणांमुळे राष्ट्रवादीच्या ८ नगरसेवकांना अपात्र ठरवण्यासाठी भाजपच्या वतीने मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. या संदर्भात आमचा पाठपुरावा सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांंसमोर प्रोसिडिंग चालवून निकाल लागेल व येत्या काही दिवसांत हे नगरसेवक अपात्र ठरवण्याची कारवाई पूर्ण होईल. त्यामुळे नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांना नामुष्की पत्करावी लागेल व नगरपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येईल.
- सीताराम भांगरे, तालुकाध्यक्ष, भाजप. 


असे आहे संख्याबळ 
एकूण १७ व २ स्वीकृत नगरसेवक संख्या असलेल्या नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. गेल्या अडीच वर्षांत नगराध्यक्ष म्हणून अॅड. के. डी. धुमाळ यांनी काम पाहिले. आता संगीता शेटे नगराध्यक्ष आहेत. काँग्रेसचे ३ नगरसेवक असून शिवसेना व भाजपचा प्रत्येकी १ आणि अपक्ष १ असे संख्याबळ आहे. काँग्रेसच्या ३ व अपक्ष २ नगरसेवकांची गणना राष्ट्रवादीने स्वतःकडे गृहित धरली आहे. स्वीकृत नगरसेवकांना निवडणुकीत मतदान करता येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण ८ नगरसेवक अपात्र ठरवण्यात आले, तर या पक्षाला व नेत्यांना मोठी नामुष्की पत्करावी लागेल. 

बातम्या आणखी आहेत...