आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंजुरी ७२ हजार लिटर पाण्याची, दिवसाआड मिळते २४ हजार लिटर, विहिरीवर तोबा गर्दी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - अंबड तालुक्यातील लोणार भायगावला दररोज ७२ हजार लिटर टँकरचे पाणी मंजूर करण्यात आलेले आहे. प्रत्यक्षात गावाला एक दिवसाअाड केवळ २४ हजार लिटर पाणी मिळते आहे. टँकर आल्यानंतर पाच फूट व्यासाच्या विहिरीवर एकाच वेळी दीडशे-दोनशे ग्रामस्थांची तोबा गर्दी होते आहे. त्यामुळे कठड्यावर उभे राहण्यासाठीही जागा राहत नाही. यातून अनेक वेळा वादविवादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. मात्र लोणार भायगावच्या या समस्येकडे प्रशासनाने अद्यापही लक्ष दिलेले नाही.


लोणार भायगाव हे जवळपास पाच हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी चार विहिरी आहेत. मात्र  यावर्षी या विहिरींनी मार्च महिन्यातच तळ गाठला. राष्ट्रीय पेयजल योजना, भारत निर्माण योजनाही राबविण्यात आली, परंतु प्रत्यक्षात गावाला काहीच फायदा झाला नाही. जवळपास कुठेच पाणी उपलब्ध नसल्याने येथून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या बदनापूर तालुक्यातील सोमठाणा धरणात अधिग्रहित केलेल्या एका विहिरीतून टॅँकरमध्ये पाणी भरुन गावाला पाणीपुरवठा केला जातो आहे. गावासाठी १२ हजार लिटरच्या टँकरच्या दररोज दोन तर २४ हजार लिटर टँकरच्या दोन अशा चार फेऱ्या मंजूर आहेत. प्रत्यक्षात २४ हजार लिटरचे एकच टँकर गावात येत आहे. या टँकरमधील पाणी गावातील पाच फूट रुंदीच्या विहिरीत सोडले जाते. त्यामुळे पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी होते आहे. एकाच वेळी दीडशे ते दोनशे ग्रामस्थ आडात पोहरे सोडून पाणी शेंदतात. त्यातून अनेकवेळा वाद उद्भवत आहेत, परंतु दुसरा कोणताच पर्याय नसल्याने ग्रामस्थांना दररोज अशीच कसरत करीत पाणी भरावे लागत आहे, तर एकाच वेळी मोठी गर्दी झाल्याने टॅँकरचे पाणी अर्धा तासातच संपते. त्यामुळे कुणाला मिळते तर कुणाला मिळतही नाही. अनेकदा रिकामे हंडे घेऊन घरी परतावे लागते. त्यानंतर महिला-पुरुषांना गावाबाहेर दोन तीन किलोमीटर असलेल्या शेतातील विहिरीतून पाणी आणण्यासाठी उन्हातान्हात पायपीट करावी लागते. तसेच लोणार भायगाव फाट्यावर १०० जणांची भिल्ल वस्ती आहे. त्यांना तर टँकरचे हंडाभरही पाणी मिळत नाही. या परिसरात अनेकांनी आपल्या घरासमोर रिकाम्या टाक्या ठेवल्या आहेत. टॅँकर आले तर या टाक्या भरल्या जातात, परंतु आठ आठ दिवस पाणी मिळत नाही.  विशेष म्हणजे वस्तीतील रहिवाशांकडे पाणी साठवणूक करण्यासाठी टाक्या, ड्रम, भांडेही नाही. पंचायत समितीकडून आलेल्या टाक्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत, असे कडुबा मोरे, किसन मोरे आदींनी सांगितले.

 

धनगर पिंपरीतून पाणी देण्याचा प्रस्ताव द्यावा
गावातील कायमस्वरुपी पाणीपुरवठा होण्यासाठी येथून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या धनगर पिंपरी तलावातून पाइपलाइन करुन गावाला पाणीपुरवठा होऊ शकतो. तसेच जायकवाडी प्रकल्पातूनही पाणी देता येऊ शकते, तसा प्रस्ताव देण्याची गरज असल्याचे ग्रामस्थ सुगनचंद संचेती यांनी सांगितले. 


नियमित टँकर नाही
ग्रामपंचायतचे पदाधिकारी आणि ग्रामसेवकाच्या दुर्लक्षित कारभारामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यांच्याकडे कसलेच नियोजन नाही. मंजूर असलेले टँकर नियमित आले तरी दिलासा मिळतो. परंतु सहा सहा दिवस टॅँकर येत नाही. विहिरीत पाणी सोडण्यापेक्षा प्रत्येकाच्या घरासमोर मांडलेल्या टाक्यात पाणी टाकावे. िनयोजनशून्य कारभाराबाबत आयुक्तांना निवेदन दिले असून समस्या न सुटल्यास ग्रामस्थ उपोषणास बसतील, असे ग्रामस्थ नारायण भोजने यांनी सांगितले. 


अंबडमधून पाणी 
सोमठाणा धरणातील जलसाठा संपल्यामुळे गावात दोन दिवसांपासून टॅँकर आले नाही. अंबडच्या जलशुध्दीकरण प्रकल्पावरुन टॅँकर भरुन गावात पाणीपुरवठा करण्याबाबत तहसीलदारांची भेट घेऊन मागणी केली. त्यास मान्यता मिळून पाणीपुरवठा केला जाईल.
गोरख बनसोडे, ग्रामसेवक

बातम्या आणखी आहेत...