आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला 'जलसंपदा'ची तत्त्वत: मंजुरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवर वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या प्रवाहातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी सिंचनाखाली येऊन परिसर सुजलाम्् सुफलाम्् व्हावा या उद्देशासाठी पूर्वीच्या आराखड्यात अनेक तरतुदी करून नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या सहस्रकुंड जलविद्युत (बहुउद्देशीय) प्रकल्प आराखड्याला जलसंपदा विभागाने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाचे काम मार्गी लागून उमरखेड, हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना व टंचाईने होरपळणाऱ्या गावच्या नळयोजनेला याचा मोठा फायदा होईल. त्यामुळे कायम पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे, अशी माहिती उमरखेडचे आमदार राजेंद्र नजरधने यांनी दिली आहे. 

या संदर्भात जलसंपदा विभाग मुंबई, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद यांना नोव्हेंबरमध्ये पत्राद्वारे मान्यता मिळाल्याचे कळवले अाहे, परंतु या प्रकल्पाचे काम कधी चालू होईल हे सांगणे सध्यातरी कठीण आहे. सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्प उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्रमांक ५ हदगाव अंतर्गत येणाऱ्या हिमायतनगर तालुक्यातील कोठा तांडा या ठिकाणी प्रकल्प निर्मितीला ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत मुदतवाढ दिली असल्याचे शासनाचे कक्ष अधिकारी पुरुषोत्तम गावंडे यांच्या स्वाक्षरीनुसार जारी करण्यात आलेल्या पत्रात नमूद केले आहे. या प्रकल्पाला मान्यता मिळावी, यासाठी हिमायतनगर पंचायत समितीने ठराव घेऊन सुधारित आराखड्याला मान्यता देण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी पंचायत समितीच्या सभापती माया राठोड व उपसभापती खोबाजी वाळके यांनी केली होती. त्यानुसार प्रकल्पाच्या सुधारित आराखडा प्रस्ताव सादर कारण्यासाठी तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. तरीसुद्धा यात काही अटी देण्यात आल्या आहेत. यामध्ये मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेकडून संकल्पना प्राप्त करून घ्यावी व त्यानुसार प्रकल्पाची यंत्रणा व आर्थिक व्यवहार्यता तपासण्यात याव्यात, प्रकल्पाच्या सुधारित आराखड्यानुसार आवश्यक पर्यावरणविषयक मान्यता घेण्याबाबत कार्यवाही करावी. त्यानंतर बदलाची राज्यस्तरीय व तांत्रिक सल्लागार समितीमार्फत तपासणी करण्यात यावी. प्रस्तावित बदलांना प्रकल्प १६ नोव्हेंबर २०१६ मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाची मान्यता प्राप्त करून घ्यावी. तसेच प्रकल्प व प्राधिकरणाकडून सुधारित प्रशासकीय मान्यता रुपात करून घ्यावी, असेही पत्रात म्हटले आहे. या अटींची पूर्तता करून घेण्यासाठी हिमायतनगर, हदगाव तालुक्यातील तसेच यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी सुद्धा यासाठी संयुक्त प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्प तत्काळ मार्गी लावा 
हिमायतनगर तालुक्यातील कोठा ज. येथील यू टर्नवर होणाऱ्या २५ मेगावॅटच्या सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला मागील आठ वर्षांच्या काळात विदर्भ - मराठवाड्यातील शेतकरी व बुडीत क्षेत्रात जाणाऱ्या गावातील नागरिकांनी कडाडून विरोध केला होता. यावर नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांनी खुद्द उपस्थित होऊन हिमायतनगर येथे शासन व जनता यांची जनसुनावणी घेऊन या प्रकल्पाबाबत जनतेची भूमिका जाणून घेतल्यानंतर प्रकल्पास स्थगिती मिळाली होती. त्यानंतर पैनगंगा नदीवर मंगरूळ - मुरली या भागात शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत पैनगंगा नदीवर १४ गेटच्या भव्य - दिव्य अशा एका स्वतंत्र बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. परंतु मागील काही वर्षांच्या काळात बंधाऱ्याचे पाणी उन्हाळ्याच्या शेवटी काम पडू लागल्याने पाण्यासाठी शेतकऱ्यांना आंदोलने करण्याची वेळ आली आहे. ही बाब लक्षात घेता आता हे धरण झालेच पाहिजे, यासाठी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. त्यामुळे प्रकल्पास सुधारित आराखड्यानुसार तत्त्वत: मान्यता मिळाली असली तरी तत्काळ विद्युत प्रकल्पाचे काम सुरु व्हावे, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून केली जात आहे. 
सहस्रकुंड येथील धबधबा. (संग्रहित छायाचित्र) 

बातम्या आणखी आहेत...