Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Archana Bhandari got the gold medal in 35 kg category

'दंगल चित्रपटामुळेच कुस्तीकडे वळले अन् सुवर्णही जिंकले'

श्रीनिवास दासरी | Update - Aug 06, 2018, 11:41 AM IST

पंजाब येथे नुकत्याच झालेल्या पाचव्या राष्ट्रीय स्टुडंट्स असोसिएशनच्या कुस्ती स्पर्धेत येथील अर्चना भंडारी हिने ३५ किलो

  • Archana Bhandari got the gold medal in 35 kg category

    सोलापूर- पंजाब येथे नुकत्याच झालेल्या पाचव्या राष्ट्रीय स्टुडंट्स असोसिएशनच्या कुस्ती स्पर्धेत येथील अर्चना भंडारी हिने ३५ किलो वजन गटात सुवर्णपदक मिळवले. ती पहिलीत असतानाच वडलांचे छत्र हरपले. आईच्या कष्टावर शिकत असतानाच 'दंगल' चित्रपटाने भुरळ घातली अन् कुस्तीकडे वळली. तिच्या या यशाची कहाणी, तिच्याच शब्दांत.


    "आम्ही तिघी बहिणी, शेवटचा एक भाऊ. जुन्या विडी घरकुलच्या एका छोट्याशा खोलीत राहतो. मी पहिलीत असताना वडिलांचे निधन झाले. त्यांचा चेहरा पुसटसा आठवतो. धाकटा भाऊ तर एकच वर्षाचा होता. अशा स्थितीला धैर्याने तोंड देत आईने आम्हाला कुठलीच उणीव भासू दिली नाही. सर्वांचे शिक्षण सुरू ठेवले. आईला मदत म्हणून अाम्ही छोटी-मोठी कामे करू लागलो. दरम्यान, दंगल चित्रपट पाहिला. मुलीही कुस्तीत बाजी मारू शकतात, हेही पाहिले. त्यानंतर मोबाइलवर हा चित्रपट मी सातत्याने पाहतच होते. अन् माझ्या डोक्यात 'कुस्ती'ची दंगल सुरू झाली. आईला बोलून दाखवल्यानंतर ती हसली. कारण मी ३५ किलो वजनाची. तिच्या नजरेत छोटीच. याच वेळी सुरेश गोरंदेवाले हे प्रशिक्षक भेटले. त्यांच्या भाचीसोबत चटईवरील कुस्तीचा श्रीगणेशा केला. माझी चपळाई पाहून पंजाबच्या राष्ट्रीय स्पर्धेत उतरवण्याचे ठरले. झाले, कधीही न पाहिलेले पंजाब गाठले. ३५ किलो वजन गटातील स्पर्धेत उतरले. एका झटक्यात प्रतिस्पर्ध्याला लोळवले. त्या वेळी माझ्या डोळ्यासमोर 'दंगल'मधील गीताच उभी राहिली. गळ्यात सुवर्णपदक पडताच आई आठवली. डोळे डबडबले..."


    नगरसेवक कोठेंनी दिले ११ हजार
    सोलापूरच्या या 'दंगलगर्ल'ची कहाणी एेकून काही दानशूर मंडळी पुढे आली. अर्चनाने आणखी मोठ्या स्पर्धेत उतरून कामगिरी बजावावी. सोलापूरचे नाव उज्ज्वल करावे म्हणून नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी ११ हजार रुपये रोख दिले. त्यानंतर पद्मशाली युवक संघटनेचे सहसचिव शेखर इगे यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून अर्चनाला ट्रॅकसूट, पँट, टी-शर्ट आणि बॅग दिले. शरीरसंपदेसाठी तिला आणखी मदत हवी आहे. दानशूरांनी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

Trending