आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाऊ, आता मागे हटायचं नाही...शिवसैनिकांचा खोतकरांच्या निवासस्थानी ठिय्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - भाऊ, तुम्ही कोणत्याही परिस्थितीत मागे हटू नका, निवडणूक लढवाच. जोवर तुम्ही असे जाहीर करत नाहीत तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, अशी घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी राज्यमंत्री व शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील निवासस्थानी ठिय्या दिला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २ दिवसांत निर्णय घेतील, त्यांचा आदेश अंतिम राहील, असे सांगत खोतकरांनी शिवसैनिकांची समजूत काढली. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या जालना मतदारसंघासाठी अर्जुन खोतकर यांनीही शड्डू ठोकला होता. मंगळवारी सकाळी भोकरदन,जाफराबाद, बदनापूरसह जालना तालुक्यातील शिवसैनिकांनी मंत्री खोतकर यांचे भाग्यनगर येथील निवासस्थान गाठले. त्यांच्या घरासमोर ठिय्या दिला. खोतकरांनी शिवसैनिकांची समजूत काढली. 


दानवेंविरोधात घोषणाबाजी : दानवे यांच्याविरोधातही घोषणाबाजी झाली. गेल्या ४ वर्षांत दानवेंनी शिवसैनिकांना त्रास दिला आहे. त्यांनी मित्रपक्षाचा धर्म निभावला नाही. त्यामुळे खोतकरांनी दानवेंना हरवण्यासाठी मैदानात उतरावे, अशी मागणी शिवसैनिकांनी केली. 


शिवसैनिक आक्रमक : पोलिसांना हाताशी धरून आमच्यावर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे ही जागा शिवसेनेसाठी सोडण्यात यावी व अर्जुन खोतकर यांना उमेदवारी देण्यात यावी. असे झाले नाही तर मी स्वत: शिवसेना भवनावरून उडी मारून आत्महत्या करेन, असा इशारा जिल्हा परिषद सदस्य कैलास पुंगळेंनी दिला. 

जालन्याची जागा मागणार 
तब्येत ठीक नसल्याने मी मुंबईला जाऊ शकलो नाही. बुधवारी मुंबईत पक्षप्रमुुख उद्धव ठाकरेंना भेटणार आहे. अनेक वर्षे ही जागा भाजपकडे आहे. ती शिवसेनेला सोडवा, अशी मागणी त्यांच्याकडे करणार आहे. अद्याप जागेचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळेल, अशी अपेक्षा आहे. - अर्जुन खोतकर, राज्यमंत्री, शिवसेना नेते 
 

प्रकरण काय : शिवसेना-भाजप युती होऊनही आपण लोकसभेच्या मैदानात असल्याचे सेना नेते अर्जुन खोतकर यांनी जाहीर केले. जागावाटपात जालना भाजपकडे असून रावसाहेब दानवे हे उमेदवार असतील. या वादात मुख्यमंत्र्यांसह सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मध्यस्थी केली. नंतर खोतकरांनी उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली होती. तरी खोतकर निवडणूक लढणार किंवा नाही, हा संभ्रम कायम आहे.

बातम्या आणखी आहेत...