आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Army Will Ready To Prevent The Deaths Of Soldiers

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सैनिकांचे युद्धभूमीवरील मृत्यू टाळण्यासाठी लष्कर सज्ज; जनरल विपिन रावत यांची माहिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- सुरक्षेच्या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सुरू झालेला वापर व देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सैनिकांचे युद्धभूमीवरील मृत्यू टाळणाऱ्या 'नॉन काँटॅक्ट वॉरफेअर'मध्ये भारतीय लष्कराने पारंगत होणे ही काळाची गरज असून त्या दृष्टीने भारतीय लष्कर या आधुनिक युद्धतंत्रासाठी सुसज्ज होत आहे, अशी माहिती लष्करप्रमुख जनरल विपिन रावत यांनी शनिवारी नागपुरात दिली. 

 

भोसला मिलिटरी स्कूलच्या २३ व्या वर्धापन दिनाचे पाहुणे म्हणून लष्करप्रमुख जनरल रावत नागपुरात होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना जनरल रावत यांनी देशाच्या भविष्यकालीन सुरक्षेच्या दृष्टीने भारतीय लष्कराने 'नॉन काँटॅक्ट वॉरफेअर' या आधुनिक युद्धतंत्राचे महत्त्व ओळखले असून त्या दृष्टीने लष्कराला सुसज्ज केले जात असल्याची' माहिती दिली. भारतीय संरक्षण दलांमध्ये 'नॉन काँटॅक्ट वॉरफेअर'ची संकल्पना राबवण्यात येत असल्याचे वृत्त येत होते. त्याला लष्करप्रमुख विपिन रावत यांनी नागपुरात यानिमित्ताने बोलताना दुजोरा दिला. याप्रसंगी भोसला मिलिटरी स्कूलच्या कार्यक्रमात छात्र सैनिकांना उद्देशून बोलताना जनरल रावत यांनी सोशल मीडियाचा वापर ज्ञान मिळवणे आणि लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी करण्याचा मोलाचा सल्ला दिला. भारतीय लष्कराने नेहमीच देशाला अभिमान वाटेल, असे कार्य केले आहे. युद्धप्रसंगासह देशावर येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमध्येही लष्कराने स्वत:चा आराम विसरून मोलाचे योगदान दिले आहे, असे नमूद करून जनरल रावत म्हणाले की, छात्र सैनिकांपैकी सर्वांनाच भारतीय लष्करात दाखल होऊन देशाच्या संरक्षणाची संधी मिळणार नाही.

 

मात्र, अशा छात्र सैनिकांनी आपण देशासाठी नेमके काय करू शकतो, याचा सातत्याने ध्यास ठेवायला हवा. देशाचे भवितव्य तुमच्याच खांद्यावर राहणार असल्याने चांगले नागरिक बना, देशाच्या कल्याणात कुठल्याही रूपाने आपले योगदान द्या, असे आवाहनही त्यांनी केले. देशासाठी पुढील १५ वर्षे अतिशय महत्त्वाची असल्याचा उल्लेख करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, युवकांचा देश म्हणून गणला जाणाऱ्या आपल्या देशात युवा पिढी किती अनुशासित आहे, यावरूनच देशाची प्रगती ठरणार आहे. मिलिटरी स्कूलचे छात्र सैनिक या नात्याने देशभक्तीचे रोपण होत असताना भविष्यात समाजासाठी चांगले योगदान देण्याचा संकल्प करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले. याप्रसंगी जनरल रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर, भोसला मिलिटरी स्कूल नागपूरचे प्रमुख शैलेश जोगळेकर मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी मिलिटरी स्कूलच्या छात्र सैनिकांनी आकर्षक प्रात्यक्षिके सादर केली. 

 

काय आहे 'नॉन काँटॅक्ट वॉरफेअर' 
आजवर लढली गेलेली युद्धे पारंपरिक स्वरूपात लढली जात होती. त्यात सैनिकांचा आमना- सामना होतो. अशा युद्धतंत्रात सैनिकांचे शहीद होण्याचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून शत्रू सैनिकांची होणारा प्रत्यक्ष आमना-सामना शक्य तेवढा टाळून सैनिकांच्या मृत्यूचे प्रमाण कमीत कमी राखणे आणि त्यासोबतच शत्रूचे जास्तीत जास्त नुकसान करून त्याला नामोहरम करण्याचे युद्धतंत्र विकसित होत आहे. त्यासाठी अपारंपरिक अशा सायबर तंत्रज्ञान, रिमोटद्वारे कार्यान्वित उपकरणांचा वापर वाढत आहे. अगदी बाह्य अवकाशातील युद्धाचादेखील 'नॉन काँटॅक्ट वॉरफेअर'मध्ये समावेश होतो. त्यासाठी अपारंपरिक युद्ध कौशल्य आत्मसात केलेले विभाग एकत्रित करून लष्करात एक कोअरदेखील तयार होणार असल्याची तज्ज्ञांची माहिती आहे.