आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील मराठा विद्यार्थ्यांची शासकीय अध्यापक महाविद्यालयातील वसतिगृहामध्ये व्यवस्था

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे वसतिगृह मराठा समाजाच्या विद्यार्थी, विद्यार्थ्यांच्या राहण्यासाठी उपलब्ध करुन देणार असून, वसतिगृहाचे १५ अाॅगस्टला उद्््घाटन हाेणार अाहे. त्या अनुषंगाने पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी अधिकाऱ्यांसह वसतिगृहाची पाहणी केली. ५ अाॅगस्टला सकल मराठा समाजातर्फे पालकमंत्र्यांच्या घरासमोर अांदाेलन झाले हाेते. या वेळी पालकमंत्र्यांनी १५ दिवसात वसतिगृहाचा मुद्दा मार्गी लागेल, असे अाश्वासन िदले हाेते. 


मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारण्याचा व्यापक कार्यक्रम शासनाने हाती घेतला. त्याअनुषंगाने १२ अाॅगस्टला पालकमंत्री डाॅ. पाटील यांनी काही ठिकाणांची पाहणी केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चौहान, तहसीलदार विजय लोखंडे, शासकीय अध्यापक महाविद्यायाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मानेकर, मराठा सेवा संघाचे अविनाश पाटील , डॉ. पुरुषोत्तम तायडे, अशोक पटोकार, यासह पंकज जायले डॉ. अभय पाटील उपस्थित हाेते. 


चौकशीअंती गुन्हे घेणार मागे
शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत पालकमंत्री डॉ. पाटील यांनी जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी जिल्हाधिकारी पाण्डेय, पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी व मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांनी सतर्क राहावे, अशी सूचना करताना पालकमंत्री म्हणाले की, मराठा आंदोलनादरम्यान दाखल गुन्ह्यांची चाैकशी करणार असून, चौकशीअंती गुन्हे मागे घेण्यात येतील. मात्र खऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. 


विविध योजनांच्या प्रचारासाठी कार्यशाळा
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून उद्याेगासाठी देण्यात येणाऱ्या १० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची शासनाने हमी दिली असल्याचे याप्रसंगी अायाेजित बैठकीत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा प्रचार होण्याकरिता १८ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. 


सुविधा हाेणार आता उपलब्ध 
शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या वसतिगृहात स्वतंत्र अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा केंद्र, वाचनालय तसेच जिमची व्यवस्था जिल्हा नियोजनाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून करुन देण्यात येणार आहेत. नवीन वसतिगृहाचे बांधकाम होईपर्यंत अध्यापक महाविद्यालयातील वसतिगृह मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार अाहे. 

 

मराठा सेवा संघ वसतिगृहाला भेट 
मराठा सेवा संघातर्फे मुलींसाठी चालवल्या जाणाऱ्या वसतिगृहालाही पालकमंत्री डॉ.. पाटील यांनी भेट दिली. या वसतिगृहाची पाहणी करुन तेथे राहणाऱ्या मुलींची त्यांनी चौकशी केली. या वेळी पूनम पारस्कर यांनी माहिती दिली. मराठा समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...