आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडूच्या खुनाचा प्रयत्न; आरोपी गजाआड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- घराशेजारी राहत असलेले साडू व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करत कोयत्याने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केला. ही घटना १९ ऑगस्टला २०१८ रोजी सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणी संदीप जयवंत मुळे (२९, रा. देवीभोयरे, ता. पारनेर) यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


संतोष ज्ञानदेव वाजे (४०, रा. वडनेर बुद्रूक, पारनेर) असे आरोपीचे नाव आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी स्थानिक गुन्हे शाखा व पारनेर पोलिसांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आरोपीचा शोध सुरू होता. आरोपी हा पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरमधील राक्षेवाडी येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्यांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. फिर्यादीमुळे व वाजे हे एकमेकांचे साडू आहेत. आरोपीने १९ ऑगस्टला सकाळी ११ च्या सुमारास मुळे यांना तळ्याजवळ शिवीगाळ केली होती. त्यानंतर मुळे हे त्यांच्या घराजवळ उभे होते. आरोपीने दारूच्या नशेत पुन्हा शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारला असता आरोपीने दमदाटी केली. दुचाकीला लावलेला काेयता काढून मुळे यांच्या हातावर, बोटांवर व मनगटावर वार केले. मुळे यांच्या पत्नी अरुणा यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपीने अरुणा यांच्यावरही कोयत्याने वार केले. दोघांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी संतोष फरार झाला होता. पोलिस त्याच्या शोधात होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. उपनिरीक्षक फडतरे, हेड कॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर, फकीर शेख, विष्णू घोडेचोर, दिनेश मोरे, रवींद्र कर्डिले, विजय ठोंबरे, रविकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, विनोद मासाळकर, मेघराज कोल्हे, देवेंद्र शेलार, बबन बेरड आदींनी ही कामगिरी केली.  

बातम्या आणखी आहेत...