आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहीद परमेश्वर जाधवर यांचे पार्थिव गावात पोहोचताच ग्रामस्थांकडून तोफांची सलामी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

धारूर  - राजस्थानच्या जैसलमेर येथे युद्धसरावात शहीद झालेले धारूर तालुक्यातील घागरवाडा गावचे जवान परमेश्वर जाधवर यांचे पार्थिव राजस्थान येथून गुरुवारी दुपारी तीन वाजता गावी पोहोचले. दुपारी  साडेचार वाजता गावात शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. परमेश्वर यांचे पार्थिव गावात पोहाेचताच ग्रामस्थांनी त्यांना तोफांची सलामी दिली. तर तरुणांनी  ‘शहीद परमेश्वर जाधवर अमर रहे.. अमर रहे’ च्या घोषणा दिल्या. शहीद परमेश्वर जाधवर यांच्या चितेस त्यांचा लहान भाऊ विक्रम जाधवर यांनी अग्निडाग दिला. भूमिपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील जनसागर लोटला होता. 

राजस्थानच्या जैसलमेर येथील युद्धसरावात रणगाडा लोड करताना डोक्याला गंभीर मार लागून शहीद झालेले आर्टिलरी फोर्समधील धारूर तालुक्यातील घागरवाडा गावचे जवान परमेश्वर जाधवर यांचे पार्थिव गुरुवारी दुपारी तीन वाजता अरणवाडी फाट्यावर पोहाेचले. फाट्यापासून फुलांनी सजवलेल्या  तिरंगा फडकत असलेल्या टेम्पाेतून हे पार्थिव अरणवाडीमार्गे  घागरवाड्याकडे निघाले. वाटेत ‘परमेश्वर जाधवर अमर रहे.. अमर रहे’,  ‘वंदे मातरम’, अशा घोषणा देत सहभागी झाले होते.  दुपारी चार वाजता घागरवाडा गावात परमेश्वर यांचे पार्थिव पोहाेचले. तेव्हा ग्रामस्थांनी तोफांची सलामी दिली. गावातील हनुमान मंदिर परिसरात शहीद परमेश्वर जाधवर यांचे पार्थिव असलेली पेटी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आली. त्यानंतर ही पेटी सैन्य दलातील जवानांनी खांद्यावर घेऊन गावातून फेरी काढली. दुपारी साडेचार वाजता गावातील शेतकरी भीमराव केरबा नागरगोजे यांच्या शेतात पार्थिव पोहाेचल्यानंतर  नातेवाइकांनी परमेश्वर जाधवर यांचे अंत्यदर्शन घेतले. या वेळी नगर येथील सुभेदार जी.एस. शेखावत व सुभेदार सतनारायण यांनी सैन्य दलाच्या वतीने परमेश्वर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. माजी खासदार अानंद आडसूळ, उपविभागीय अधिकारी शोभा ठाकूर, तहसीलदार व्ही. एस. शेडोळकर, आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार केशव आंधळे, नायब तहसीलदार सुहास हजारे, रामेश्वर स्वामी, पोलिस निरीक्षक नाईकवाडे, नगराध्यक्ष डॉ.स्वरूपसिंह हजारी, रमेश आडसकर, मोहन जगताप यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. परमेश्वर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण गावासह पंचक्रोशीतील जनसमुदाय लोटला होता.शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 

घागरवाडा येथे शहिद जवान परमेश्वर जाधवर यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी साडेचार वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी नगरहून आलेल्या आर्मकोड अॅण्ड सेंटरच्या जवानांनी बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना दिली तेंव्हा वातावरण भावुक झाले होते. विक्रमने दिला अग्निडाग  

शहीद  जाधवर यांच्या चितेस त्यांचा लहान भाऊ विक्रम जाधवर यांनी अग्निडाग दिला. या वेळी परमेश्वर यांचे वडील बालासाहेब, आई सुमित्राबाई, परमेश्वरची पत्नी दमयंती, दीड वर्षाची मुलगी विद्या अन्य दोन भाऊ असा परिवार उपस्थित होता. गावातील प्रत्येक जण त्यांच्या कुटुंबाला सावरत होता
.