आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह : अजिंठ्यातील शिल्पांना \'जिवाणूं\'द्वारे देणार गतवैभव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या अजिंठ्यातील लेण्या, शिल्प व चित्रांवर काळानुरूप झालेला प्रदूषणाचा थर काढून टाकण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या जिवाणूंचा वापर केला जाणार आहे. जिवाणूंचा वापर करून होणाऱ्या 'बायो क्लिनिंग'मुळे प्राचीन शिल्पांना धोका न पोहोचवता या कलाकृतींचे गतवैभव बऱ्याच प्रमाणात प्राप्त करता येईल, असा विश्वास नागपुरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (नीरी) वैज्ञानिकांना वाटत आहे. 


केंद्र सरकारने देशातील सर्व महत्त्वाच्या वारसास्थळांचे संवर्धन व जीर्णोद्धाराचा ४८ कोटींचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पात केंद्र सरकारच्या 'कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च'अंतर्गत असलेल्या 'नीरी'सह सेंट्रल ग्लास अँड सिरॅमिक इन्स्टिट्यूट (सीजीआरआय), नॅशनल एरोस्पेस लेबोरेटरी (एनएएल), सेंट्रल रोड रिसर्स इन्स्टिट्यूट (सीआरआरआय), सेंट्रल सायंटिफिक इन्स्टूमेंट अॉर्गनायझेशन (सीएसआयअो, चेन्नई) यासह एकूण ८ संस्था सहभागी आहेत. त्यात 'नीरी'कडे अजिंठा लेण्या व ताजमहाल या वारसास्थळांच्या संवर्धनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

 

अजिंठा येथील लेण्यांच्या संवर्धनासाठी नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार यांच्या मार्गदर्शनात 'एन्व्हायरमेंटल व्हायरॉलॉजी' विभागाचे प्रमुख असलेले वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. कृष्णा खैरनार यांची चमू कामाला लागला आहे. त्यात आसिफा कुरेशी यांचाही प्रामुख्याने सहभाग आहे. या प्रकल्पात केंद्र सरकारच्या सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूटलाही विशिष्ट जबाबदारी राहणार आहे. वारसास्थळांचे संवर्धन अथवा जीर्णोद्धार करण्यासाठी सर्वप्रथम युरोपात इटली येथे बायो क्लिनिंग पद्धतीचा वापर सुरू झाला. मात्र, तेथे अतिशय मर्यादित स्वरूपात ही पद्धत वापरली गेली. भारतात यासाठी सध्या शोध लागलेल्या जिवाणूंंपेक्षा अधिक परिणामकारक जिवाणूंचा शोध सुरूच आहे, असेही त्यांनी सांगितले. 


नीरीच्या प्रयोगशाळेत जिवाणंूद्वारे प्रक्रिया, मगच वापर 
काळानुरूप अजिंठा येथील शिल्प आणि चित्रांवर प्रदूषणाचे थर जमा झाले आहेत. यात वातावरणातून येणाऱ्या सल्फेट आणि नायट्रेटचे थर प्रमुख आहेत. ते जवळपास दगडांचेच स्वरूप धारण करतात. ते काढण्यासाठी रसायनांचा वापर केल्यास 'रिअॅक्शन'मुळे शिल्प आणि चित्रे खराब होण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे नीरीने त्यासाठी बायो क्लिनिंग पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या वातावरणात सल्फेट आणि नायट्रेटचा थर खाणारे जिवाणू आढळून येतात. या जिवाणूंचाच वापर 'बायो क्लिनिंग' पद्धतीचा वापर होणार आहे. नीरी ने भारतात आढळून येणारे असे जिवाणू शोधून काढत ते प्रयोगशाळेत साठवले आहेत, अशी माहिती डॉ. खैरनार यांनी दिली. मात्र, या पद्धतीत ते थेट शिल्प व चित्रांच्या सफाईसाठी वापरले जाणार नाहीत. सुरुवातीला सल्फेट व नायट्रेटचा थर असलेले दगड उपलब्ध करून त्यावर नीरीच्या नागपुरातील प्रयोगशाळेत जिवाणूंद्वारे प्रक्रिया केली जाणार आहे. त्यानंतरच त्याचा थेट वापर होणार असल्याचे डॉ. खैरनार यांनी स्पष्ट केले. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अौरंगाबाद सर्कलने त्यासाठी नीरीला परवानगी प्रदान केली आहे. 


ताजमहालसाठी 'एलईडी लाइट' तंत्रज्ञानाचा वापर 
जगप्रसिद्ध ताजमहालाची झळाळी विशिष्ट किड्यांच्या थरामुळे नष्ट होत असल्याचे भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले होते. ताजमहालावरील हा थर काढण्यासाठी नीरीकडून एलईडी प्रकाश तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. त्यावर सध्या वैज्ञानिक पीयूष कोकाटे आणि शालिनी ध्यानी या वैज्ञानिकाकडून नीरीतच प्राथमिक काम सुरू आहे. एलईडी दिव्यांच्या विशिष्ट प्रकाशझोतामुळे ताजमहालाच्या मूळ सौंदर्याला कुठलाही धोका न पोहोचवता थर नष्ट करण्यात मदत होईल, असा नीरीच्या वैज्ञानिकांना विश्वास आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...