आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Art Of Living Swami Dinesh Kashikar Interview, Divya Marathi.com

कधी योगा, कधी मेडिटेशन.. आता संगीत! वाचा, आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वामीसोबतचा संवाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगीताच्या माध्यमातून अध्यात्म आणि अध्यात्मातून संगीत ही चेतना युवापिढीत जागवण्याचा आर्ट ऑफ लिव्हिंगचा प्रयास आहे. सोमवारी (दि. १२) नाशिक येथे ६००० बासरीवादक वेणुनाद कार्यक्रमातून विश्वविक्रम करणार आहेत. यानिमित्त आर्ट ऑफ लिव्हिंगचे पूर्णवेळ साधक स्वामी दिनेश काशीकर यांच्याशी संवाद...
प्रश्न : स्वामीजी मुळात वेणुनाद किंवा तुमचे असे कार्यक्रम होतात याचा उद्देश काय?
स्वामीजी : आजची पिढी ही फॉरवर्ड आहे, फास्ट आहे. त्यांना शास्त्रीय संगीत किंवा योगा, मेडिटेशन या गोष्टी आवडत नाहीत असं नाही; पण त्या त्यांना वेळखाऊ वाटतात. तसेच, या बाबी अवघड आहेत. ये अपने बस की बात नही... असं म्हणून ते इच्छा असूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांच्यात असलेले हेच गैरसमज काढण्याचा आमचा प्रथम प्रयत्न अशा कार्यक्रमांमधून असतो. तसेच, गुरुजींचा (श्री श्री रविशंकरजी) उद्देश असा आहे की, भारतीय अभिजात संगीत पुढच्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे. म्हणूनही असे कार्यक्रम आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून घेतो. मग त्यात कधी योगा असतो, कधी मेडिटेशन असतं, आता नाशकिमध्ये संगीत आहे.

प्रश्न : पण मग हे कार्यक्रम आपण गटागटानेही घेऊ शकतो...
स्वामीजी : बरोबर आहे. ते फारसं प्रभावी होतंच असं नाही. म्हणून आम्ही जागतिक विक्रम करण्याच्या प्रयत्नात असतो. यामुळे एक होतं, तरुणांचंच नव्हे तर सगळ्यांचंच त्या कार्यक्रमाकडे लक्ष जातं. त्यात हजारोंनी व्यक्ती सहभागी होतात. मुळात आपल्याला एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर, दिग्गजांबरोबर काहीतरी सादर करण्याची संधी मिळते, ही भावना अनेकांच्या मनात असते. जागतिक विक्रम होणार याचा उत्साहही वेगळाच असतो आणि संगीतात लोकांना एकत्र आणण्याचा प्रभाव आहे.

प्रश्न : तेच तर... संगीत आणि अध्यात्म हा मेळ सर्वसामान्याने कसा बसवावा?
स्वामीजी : जगात कुठेही जा. अध्यात्म हा जगण्याचा पाया आहे, हे जाणवते. ब्रह्ममुहूर्तावर रियाज चालायचे.. म्हणजे मुहूर्त आला तो अध्यात्माशी जोडलेला आहेच. भक्तीमार्गात डोकावलं तर अध्यात्म व संगीताची परिकल्पना अधिक व्यापक झालेली दसिते. गुरुजी म्हणतात, संगीतामुळे व्यक्ती वैश्विक चेतनेशी जोडली जाते. संगीतविश्वातून व्यक्तीपर्यंत, ब्रह्मांडाकडून सीमिततेकडे प्रवाहित होणारी लय व सुरेलपणा आहे. अभंगाचं उदाहरण घ्या. त्यात एक लय असते. अभंग अध्यात्म व लय संगीत आहे. आपण त्यात एकरूप होत जातो तसतसा त्याचा मेळ आपोआप होतो. आपल्याला वेगळे काही करण्याची गरजच पडत नाही.

प्रश्न : या दोन्ही गोष्टी खरंच हातात हात घालून चालू शकतात?
स्वामीजी : अध्यात्मामुळे माणसाच्या आत परिवर्तन होत असते आणि संगीत किंवा इतर माध्यमांद्वारे तो बाह्य परिवर्तित होत असतो. अशा एकोप्यानेच जगण्याची कला ज्ञात होते. माणूस जिवंत असेपर्यंत तो कधीच थांबत नाही. अध्यात्माचेही तसेच आहे. हे एकदा अवगत झाले की, माणसाला आपली सामाजिक जबाबदारी कळायला लागते, हा बदल आम्ही नेहमीच अनुभवतो.

प्रश्न : सामान्य माणसाला ही अनुभूती कशी मिळते?
स्वामीजी : शास्त्रीय संगीत आपल्या देशात चांगलेच रुजलेले आहे. धर्म, परंपरा तर आपण पाळतोच; त्यामुळे ही अनुभूती प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून घेतच असतो. दुसऱ्यापेक्षा स्वत:चा अनुभव जवळचा वाटतो. जग अनुकरणनीय झालं आहे. मग चांगल्याचे अनुकरण का नाही, असाही अनुभव येतो. म्हणजे लोक सांगतात, ‘हे आले होते ना, मग आम्हीही आलो’ युवा सहभागींना याचा युनिक अनुभव येतो. कारण अशा कार्यक्रमांचा विक्रम होतो. त्याची प्रसिद्धीही होते आणि आपला उद्देशही सफल होतो. असे आपण आतापर्यंत दहा जागतिक विक्रम केलेले आहेत.