आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या भाषणाचे धाडस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिव्यक्ती प्रकटीकरणासाठी माणसाकडे प्रभावी वक्तृत्वशैली असणे आवश्यक आहे, पण पहिले भाषण देताना काय चुका होतात, कशी तारांबळ उडते याचा अनुभव सर्वांना येतो. तशी वेळ माझ्यावरही आली होती, पण त्या पहिल्या भाषणाच्या भीतीवर मी मात कशी केली हा अनुभव कायम लक्षात राहिला. पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेत मी शिक्षण घेत होतो.
दरवर्षी 22 सप्टेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती शाळेत मोठ्या उत्साहाने साजरी व्हायची. या जयंती कार्यक्रमाच्या अनुषंगाने निबंध, भाषण, चित्रकला अशा स्पर्धाही घेतल्या जात असत. मी पाचवीत असताना वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता. वक्तृत्व स्पर्धेत मार्गदर्शन करण्यासाठी त्या वेळी ग्रामीण भागात कोणतीच व्यवस्था नव्हती. तरीही मी जिद्दीने वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला. गावाच्या वेशीतील सार्वजनिक कट्ट्यावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ते माझे आयुष्यातील पहिले भाषण होते. सर्वात प्रथम समोर ग्रामस्थ आणि विद्यार्थी पाहून थोडा वेळ काही सुचेना. तरीदेखील न घाबरता बोलत राहिलो. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर माझे हे पाच मिनिटांचेच भाषण त्या वेळचे गावातील आदरणीय व्यक्ती भागवत बागल यांना फार आवडले. त्यांनी मला त्या भाषणाबद्दल पाच रुपये बक्षीस दिले. या एकाच भाषणाला मिळालेल्या प्रतिसादामुळे पुढील काळातील सभाधीटपणाचा पाया घातला गेला. पुढे सातत्याने वक्तृत्व स्पर्धा जिंकत गेलो. भाषण करणे ही कला असली तरी ती प्रयत्नाने अधिक समृद्ध करता येते. यासाठी चांगला आवाज, श्रोत्यांवर प्रभाव पाडणारी देहबोली, चांगले वाचन, भाषणावेळी सांगण्यासाठी अर्थपूर्ण उतारे, म्हणी यांचा साठा असावा. श्रोत्यांच्या नजरेला नजर देऊन बोलावे. पहिल्या भाषणाच्या वेळी सर्वांनाच भीती वाटत असते. माझेही तसेच झाले. तरीही मी त्यावर मात केली, हे पुन्हा सांगावेसे वाटते.