आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनातिकिटामुळे अपमान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गमत्या स्वभावाचे मित्र असले म्हणजे काय होते, याचे अनेक किस्से आहेत. सोलापूरच्या मेकॅनिकी चौकात भागवत टॉकीज संकुलातील चित्रमंदिरला तेव्हा ‘दिल अपना प्रीत पराई’ हा चित्रपट लागला होता. मी आमच्या जोशी नावाच्या मित्रासमवेत त्यावेळी सोलापूरला सहज फिरायला आलो होतो. चित्रपटगृहासमोरून जाताना आम्ही सहज डोकावून पाहिले. मीनाकुमारीचा ‘दिल अपना प्रीत पराई’ हा चित्रपट हाऊसफुल्ल गर्दीत चालू होता. चित्रपटगृहाबाहेर तशी पाटीही लागली होती. माझ्या मित्राला तर तो चित्रपट बघण्याची जणू घाईच झाली होती. त्याने आयडिया केली. तो म्हणाला, आपण मध्यंतरात थिएटरात घुसू. माझे पापभीरू मन काही केल्या तयार होईना. पण चित्रपटाचा मध्यंतर झाला आणि माझ्या मित्राने मला ओढतच थिएटरमध्ये नेले आणि मध्यंतरात थोड्या वेळेसाठी बाहेर गेलेल्या प्रेक्षकांच्या रिकाम्या खुर्च्यावर जबरदस्तीने बसवले. पाच दहा मिनिटे गेली असतील, त्या खुर्च्यावरचे गेलेले पे्रक्षक तेथे आले आणि आम्हाला त्यांची तिकिटे दाखवत उठण्यास सांगू लागले. पण माझा मित्र जोशी वस्ताद निघाला. तो उलट त्या पे्रक्षकांशीच भांडायला लागला.

आमचा हा गोंधळ ऐकून डोअरकीपर तेथे आला आणि आमची तिकिटे दाखविण्यास सांगितले. आमच्याकडे कुठली आलीय तिकिटे? आमची लबाडी लक्षात येताच त्याने आम्हाला दोघांना जवळपास हाक लूनच दिले. जाहीर अपमानामुळे मला मेल्याहून मेल्यासारखे झाले. पण माझ्या मित्राला त्याचे काही सोयरसुतक नव्हते. तो चक्क दात काढून निर्लज्जपणे जणू काही झालेच नाही अशा अर्थाने माझ्याकडे पाहून माझ्या भित्रेपणाला हसत होता. अर्थातच मी त्याचा नाद सोडून लगेच तिथून जवळच असलेले बस स्टँड गाठले आणि पंढरपूरकडे निघालो. आजही मला सोलापुरात जाण्याचा प्रसंग अनेकदा येतो. तेव्हा भागवत टॉकीजसमोरच्या रस्त्यावरून जात असताना ती घटना आठवते. तो लाजिरवाणा प्रसंग अजूनही माझ्या आठवणीतून जात नाही.