आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्वाेदयींचा आधारवड!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विनोबांनी प्रायोपवेशन सुरू केल्यावर वर्ध्यातील एकाने नागपूर खंडात जनहित याचिका सादर केली की, विनोबा आत्महत्या करत आहेत. शासनाने हस्तक्षेप करून त्यांचा जीव वाचवावा. त्या वेळी धर्माधिकारी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. आपण विनोबांना भेटायला गेलो तर नागपूर खंडपीठावर त्याचा परिणाम होईल हे जाणून ते भेटीला गेले नाहीत. अशा कर्तव्यकठोर न्या. धर्माधिकारी यांच्यामुळेच न्यायव्यवस्थेची शान टिकून आहे. 

 

न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी एकदा म्हणाले, 'एखादा महापुरुष वा कर्तृत्ववान पुरुष गेला की बोलले जाते, ते गेल्याने एक पोकळी निर्माण झाली आहे! म्हणजे इतकी वर्षे काम करून ठेवून काय गेला तर पोकळी?' आज न्या. धर्माधिकारी यांच्या निधनानंतर 'एक पोकळी निर्माण झाली' असे निराशाजनक उद््गार काढण्याची वेळ आम्हा सर्वोदयी कार्यकर्त्यांवर आलेली नाही. कारण त्यांनी माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना उभे केले. अनेक संस्था उभ्या केल्या. त्या संस्थांना वैचारिक दिशा दिली. भक्कम आर्थिक आधारही मिळवून दिला, जेणेकरून त्या संस्था दीर्घकाळ सुव्यवस्थित पद्धतीने वाटचाल करू शकतील. 

 

१९७९ मध्ये सर्वोदय नेते लोकनायक जयप्रकाश नारायण अाणि त्यांच्यापाठाेपाठ १९८२ मध्ये आचार्य विनोबा भावे गेले आणि १९८५ मध्ये सर्वोदयाचे भाष्यकार आचार्य दादा धर्माधिकारी यांचे निधन झाले. एकापाठोपाठ एक सर्व सर्वोदयी नेते गेल्याने सर्वोदयवर मोठाच आघात झाला. कार्यकर्ते सैरभैर होते. ना कोणी वैचारिक मार्गदर्शन करणारा होता, ना कार्यक्रम देणारा होता. जेपी, विनोबा व दादांचे जाणे हा एका अर्थाने गांधी युगाचा अस्त होता. 

 

आम्ही सारे 'मुंबई सर्वोदय मंडळा'चे कार्यकर्ते अशा एका विपरीत परिस्थितीत होतो. न्यायमूर्ती धर्माधिकारी त्या वेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. कधी कधी ते वडील आचार्य धर्माधिकारींसह यायचे. नंतर त्यांचे येणे वाढत गेले. लवकरच ते त्या पदावरून निवृत्त झाले. आम्हा कार्यकर्त्यांना न्या. चंद्रशेखर धर्माधिकारींच्या रूपाने नेताच नव्हे, तर एक ज्येष्ठ कार्यकर्ताही मिळाला. विचार देणारा विचारवंतही मिळाला. आमचे आपापसातले प्रश्न सोडवणारा कुटुंबप्रमुख मिळाला. न बोलता संस्थेचेच नव्हे, तर आमचे व्यक्तिगत आर्थिक प्रश्न सोडवणारा 'चंदूभय्या' मिळाला! 


मी १९८५-८६ ला मुंबई सोडून विनोबांचे जन्मगाव गागोदे (ता. पेण, जिल्हा रायगड) येथे विनोबांच्या जन्मघरात राहू लागलो. मुंबईसारख्या महानगरातून आलो होतो. खेडेगावाचा अनुभव नव्हता व विचाराने अपरिपक्वही होतो. गावातील नेत्यांमुळे ताण वाढत होता. एकदा न्यायमूर्तींकडे गेलो असताना ही परिस्थिती त्यांच्या कानावर घातली. याच काळात विनोबांच्या पवनार (वर्धा) येथील आश्रम व गावकरी यांचा प्रश्न चिघळला होता. न्यायमूर्ती मला म्हणाले, 'याने विचलित होण्याचे कारण नाही. प्रश्नाचे स्वरूप समजून घेतले पाहिजे. प्रतिष्ठा विरुद्ध सत्ता असे हे स्वरूप आहे. न्यायमूर्तींनी प्रश्नांचे स्वरूप मला समजावून दिल्याने माझी वैचारिक स्पष्टता झाली. समोरच्याची मानसिकता लक्षात घेऊन मी प्रश्नांना सामोरे जायला शिकलो. विनोबा जन्मस्थानाने विचारपूर्वक काही आर्थिक मर्यादा स्वतःला घालून घेतल्या आहेत. सरकारी व विदेशी पैसा स्वीकारायचा नाही, संचित निधी ठेवायचा नाही, श्रमाधारित जीवन जगायचे. त्यामुळे आश्रमाच्या तिजोरीत खडखडाट कायमचाच. न्यायमूर्तींना याची कल्पना असावी. एकदा त्यांनी सहजच मला बोलावले व म्हणाले, 'एक अर्ज लिहून दे, थोडी आर्थिक व्यवस्था करतो.' मी म्हणालो, 'मी लेटरहेड आणलेले नाही.' ते म्हणाले, 'काही गरज नाही.' त्यांनी एक कोरा कागद दिला. मी अर्ज लिहिला. सहा महिने आश्रमाचे बरे गेले! न्यायमूर्तींनी न बोलता अशा किती संस्था व कार्यकर्त्यांना आर्थिक आधार देऊन उभे केले. 

 

गागोदे गाव विनोबांचे जन्मगाव आहे. तेथे काही विकास झाला पाहिजे याची त्यांना तळमळ होती व त्यासाठी आपली सारी प्रतिष्ठा खर्च करून त्यांनी सुधाकरराव नाईक, शरद पवार, मनोहर जोशी या तीन मुख्यमंत्र्यांना गावात आणले. तिघांनी तीन प्रकल्पांचे भूमिपूजन केले. पण पुढे काही झाले नाही. कारण विनोबांकडे 'व्होट बँक' नाही. परिणाम एकच विनोबांबरोबर त्यांचे जन्मगाव सरकारी दरबारी उपेक्षित राहिले. आज गावात तीन मुख्यमंत्र्यांच्या हातून उभे केलेल्या तीन संगमरवरी पाट्या आहेत. न्यायमूर्ती निराश न होता कालपर्यंत प्रयत्न करत होते. महिनाभरापूर्वीच आम्ही आश्रमाचे कार्यकर्ते या प्रश्नासाठी त्यांना भेटलो होतो. मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगतो असे ते म्हणाले. 

 

न्यायमूर्तींचे घर कार्यकर्त्यांना कधीही खुले असायचे. भेटीची वेळ घेऊन जायचे बंधन आम्हाला नव्हते. खादीधारी झोळीवाले दिसले की सिक्युरिटी गार्ड विचारायचा नाही व लिफ्टमन आठव्या मजल्यावर स्वतःच लिफ्ट थांबवायचा. न्यायमूर्तींचे आत्मचरित्र प्रकाशित झाले होते. सहज त्यांच्या घरी गेलो. पुस्तकावर बोलणे निघाले. न्यायमूर्तींनी अभ्यंकर खून खटल्यातील खुनी जक्कल व सुतार यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याचा काही भाग त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकात होता. मी त्यांना म्हणालो की, मी वर्तमानपत्रात खटल्याचा रिपोर्ट वाचत होतो व माफीचा साक्षीदार मुनव्वर शहाने लिहिलेले 'यस, आय अॅम गिल्टी' हे पुस्तकही वाचले आहे. पण तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, 'ज्या दिवशी जक्कल व सुतारला फाशी दिली गेली त्या रात्री तुम्हाला झोप आली का?' न्यायमूर्ती म्हणाले, 'झोप कशी येईल? या खटल्यामुळे मला डायबिटीस जडला.' मी विचारले, 'तुम्ही गांधीवादी आणि अहिंसा तत्त्व मानणारे... मग फाशीची शिक्षा सुनावली ती कशी काय?' न्यायमूर्ती म्हणाले, 'मी न्यायाधीश आहे. भारतीय घटना व कायद्याला बांधील आहे. त्या चौकटीत मला निर्णय घ्यावे लागतात. मी कर्तव्याला बांधील आहे.' 

 

न्यायमूर्ती किती कर्तव्यकठोर होते याचे एक उदाहरण देतो. विनोबा त्यांचे गुरू, मार्गदर्शक, नेते होते, पितासमान होते, विनोबा त्यांचे सर्वस्व होते! पण विनोबा गेले तेव्हा ते गेले नाही. विनोबांनी प्रायोपवेशन सुरू केल्यावर वर्ध्यातील एकाने नागपूर खंडाकडे जनहित याचिका सादर केली की, विनोबा आत्महत्या करत आहेत. शासनाने हस्तक्षेप करून त्यांचा जीव वाचवावा. त्या वेळी न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. आपण प्रायोपवेशन करून देहत्याग करणाऱ्या विनोबांना भेटायला गेलो तर नागपूर खंडपीठावर त्याचा परिणाम होईल. हे जाणून न्यायमूर्ती विनोबांच्या भेटीला गेले नाहीत. अशा कर्तव्यकठोर न्यायमूर्ती धर्माधिकारी यांच्यामुळेच न्यायव्यवस्थेची शान टिकून आहे. गांधी-विनोबांचे सहकारी, सर्वोदयचे भाष्यकार आचार्य दादा धर्माधिकारी हे न्यायमूर्तींचे वडील. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश या पदापेक्षाही त्यांना आपण दादा धर्माधिकारी यांचे चिरंजीव आहोत याचा सार्थ अभिमान होता. दादांच्या पुस्तकांचे खरे अभ्यासक स्वतः न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी होते. 

 

मी 'सर्वोदय साधना' पाक्षिकात संपादनाचे काम करत होतो. साने गुरुजींच्या जयंतीनिमित्त मी दादांना (धर्माधिकारी) म्हणालो, मला साने गुरुजींवर लेख लिहून द्या. दादांनी मला विशिष्ट दिवशी बोलावले. त्या वेळी न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. दादा मला तोंडी सांगत होते व मी लेख लिहून घेत होतो. न्यायमूर्ती ऐकत होते. लेख लिहून झाल्यावर दादा मला म्हणाले, लेख वाचून दाखवा. मी लेख वाचून दाखवला. मग न्यायमूर्ती दादांना म्हणाले, मी पुन्हा तो लेख नीट वाचून दाखवतो व त्यांनी मी लिहून घेतलेला लेख पुन्हा वाचला. न्यायमूर्ती लेखक व फर्डे वक्ते होते, स्वतंत्र विचारवंत- न्यायाधीश होते. पण साने गुरुजींचा तो लेख त्यांनी दादांच्या तोंडून ऐकला, मी वाचून दाखवला. तेव्हाही ऐकला आणि तिसऱ्यांदा स्वतः वाचला. कित्ता गिरवावा तसा एकच लेख त्यांनी तीन वेळा ऐकला व वाचला! वडिलांच्या पठडीत तयार होणे म्हणजे काय, रियाज करणे म्हणजे काय? याचा हा वस्तुपाठ होता. त्यांचा सहवास मिळाला, प्रेम मिळालं, त्यांच्याकडून घेण्यासारखं खूप होतं, पण माझी झोळी दुबळी होती. आता खूप रितं रितं वाटत आहे! त्यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम!