आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेक्झिट : वृथाभिमान गळाला  (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षांहून अधिक काळ काथ्याकूट करत ब्रिटनच्या थेरेसा मे सरकारने युरोपियन महासंघासोबत केलेला ब्रेक्झिट करार ब्रिटिश संसदेने दोन दिवसांपूर्वी नामंजूर केला. परिणामी, ब्रिटनसमोर केवळ आर्थिकच नव्हे, तर राजकीय अस्थिरता उभी राहिली आहे. ही अस्थिरता इतक्या थराला पोहोचली आहे की, २०१६ मध्ये युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याचा जो निर्णय ब्रिटनच्या जनतेने घेतला त्या निर्णयाची दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा सार्वमत घेतले जावे, असे वारे आता वाहू लागले आहे. अर्थात पुन्हा सार्वमत लगेचच होईल याची शक्यता कमी आहे. कारण युरोपियन महासंघातून बाहेर जाण्याचा निर्णय ज्या हुजूर पक्षाने घेतला तोच पक्ष अजूनही सत्तेत आहे. (थेरेसा मे यांनी एक वर्षापूर्वी ब्रेक्झिटच्या मुद्द्यावरून संसद बरखास्त करून सार्वत्रिक निवडणूक घेतली होती. ही निवडणूक त्यांनी कशीबशी जिंकली.) सध्या त्यांचे सरकार त्यांच्याच ब्रेक्झिट भूमिकेला समर्थन देणाऱ्या घटक पक्षांच्या टेकूवर उभे असल्याने ते पडेल, अशी शक्यता फार कमी आहे. म्हणून विरोधकांनी सार्वमताची मागणी कितीही केली तरी त्यात बरेच राजकीय अडथळे आहेत. त्यात थेरेसा मे यांनी बुधवारी त्यांच्या सरकारविरोधात मजूर पक्षाने मांडलेला अविश्वासाचा ठरावही जिंकला, त्यामुळे त्यांची सत्ता शाबूत राहिली आहे. तरीही थेरेसा मे यांच्यापुढे स्वपक्षीय, विरोधक, युरोपियन महासंघ यांच्याशी कोणत्या मुद्द्यावर चर्चा करायची, त्यांच्याशी सहमती कशी करायची आणि ब्रिटनला युरोपियन महासंघातून कमी नुकसान देत कसे बाहेर काढायचे असे बरेच मोठे आव्हान आहे. बुधवारी संसदेत ब्रेक्झिट कराराला स्वपक्षातील बहुसंख्य खासदारांनी अनुमोदन न दिल्याने पक्षांतर्गत मोठी उभी फूट त्यांना अनुभवायला मिळाली. त्यामुळे कालच्या दिवसभरातल्या घडामोडींत मे यांनी ब्रेक्झिट कराराशिवाय युरोपियन महासंघातून कसे बाहेर पडावे यासाठी विरोधकांशी चर्चा करण्यास सुरुवात केली. विरोधी पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बिन यांनी सरकारशी सहकार्य करण्यास नकार दिल्याने परत पेच निर्माण झाला आहे. कॉर्बिन यांचा मजूर पक्ष ब्रेक्झिट कराराच्या विरोधात असल्याने त्यांना सार्वत्रिक निवडणुका हव्या आहेत, पण त्यांनीच आणलेला अविश्वासाचा ठराव फेटाळल्यामुळे त्यांच्या निवडणुकांच्या मागणीला सध्या राजकीय अर्थही उरलेला नाही. म्हणजे ब्रिटनमध्ये सरकार अस्तित्वात आहे, पण सरकारच्या महत्त्वाच्या धोरणाला संसदेचा बहुमताने विरोध आहे. त्यामुळे विरोधकांच्या बाजूने सत्ताधारी पक्षातील बहुसंख्य खासदार असूनही सरकार पडत नाही, असा विचित्र राजकीय पेच लोकशाहीची जननी म्हणून ओळखला जाणारा ब्रिटन अनुभवत आहे. 

 

२९ मार्च राेजी ब्रिटनला युरोपीय महासंघातून बाहेर पडायचे आहे, पण ब्रेक्झिट करार फेटाळल्याने मुदतवाढ करून घ्यायची हा एक पर्याय आहे. पण हा पर्याय खुद्द थेरेसा मे यांना मान्य नाही. त्यांच्यापुढे ब्रेक्झिट करार नव्याने मांडण्यासाठी जुन्या करारात दुरुस्त्या कराव्या लागतील. या दुरुस्त्यांना स्वपक्षीय व विरोधकांची संमती असल्याशिवाय पुढे जाता येत नाही. यात युरोपियन महासंघाने ब्रिटनबाबत थोडी मिळमिळीत भूमिका घेतली तर सकारात्मक हालचाली घडू शकतात. पण अनेक युरोपीय देश ब्रिटनला महासंघातून सहजासहजी जाऊ देण्यास राजी नाहीत. प्रत्येक देशाने ब्रिटनमधील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहून आपल्या व्यापारी हितसंबंधांशी तडजोड न करण्याचा निर्णय घेतला आहे. थेरेसा मे यांचे अडेलतट्टू धोरण व दोन वर्षांत त्यांनी ब्रेक्झिट कराराबाबत पाळलेली गुप्तता याने स्वपक्षासह अन्य पक्षांतील बहुतांश संसद सदस्य नाराज आहेत. मधल्या काळात काही सदस्यांनी ब्रेक्झिट करारातील काही तरतुदी मवाळ करण्याचे सल्ले थेरेसा मे यांना दिले, पण त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. मे जेवढ्या राजकीय गाळात रुतत जातील ते पाहण्याचाही काही सदस्य आनंद घेत आहेत. ब्रेक्झिट कराराबाबत दुसरे सार्वमत हा एक अंतिम पर्याय आहे, या पर्यायाने ब्रिटनच्या जनतेला आपण केलेल्या चुकांचे परिमार्जन करण्याची संधी आहे. पण समजा दुसऱ्या सार्वमताचा निर्णय घेतला तर ब्रिटनमध्ये वंशवाद प्रचंड प्रमाणात उफाळून येण्याची भीती आहे. त्याचे परिणाम संपूर्ण युरोपवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्रिटनने १८-१९ व्या शतकात वसाहतवादातून मिळवलेले वैभव परत मिळवण्यासाठी युरोपीय महासंघाशी काडीमोड घेण्याची चूक केली होती. आमच्या देशाच्या प्रगतीला आता स्थलांतरित, निर्वासितांची गरज नाही, युरोपशिवाय आमची अर्थव्यवस्था शक्तिशाली बनू शकते, असा एक दर्प या एकूण मागणीला होता. आता ब्रिटिश संसदेच्या भूमिकेमुळे हा करार अशा परिस्थितीत अडकला आहे की, त्यांना आपले अभिनिवेश, वृथाभिमान बाजूला ठेवून जगाशी जुळवून घ्यावे लागेल; तरच हे संकट टळेल. 

 

 

बातम्या आणखी आहेत...