आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशादायी अवकाश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षातले "रसिक'मधले हे शेवटचे सदर. तळागाळातले, एरवी दुर्लक्षित असणारे विषय घेऊन वाचकांशी संवाद साधताना कुठेतरी, काहीतरी बदल व्हावा, अशी अपेक्षा मनात असायची. पण अनेकदा दूरवर बदलाची कोणतीच खूण दिसायची नाही. यावेळचे हे सदर लिहिताना मात्र समस्येच्या बरोबरीनेच बदलाची दिशा कोणती हेही समोर आहे. बदलाची दिशा, परिवर्तनाचा मार्ग समोर असणे हे आश्वासकच आहे. वाचकांचा निरोप घेताना याचे श्रेय रमेश हरळकर नावाच्या ‘वन मॅन आर्मी’ला मला द्यायचे आहे...

 

मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या मुलांच्या हातात पुन्हा झाडू येऊ नये, पिढ्यांपिढ्यांच्या घाणीच्या नरकाची साखळी कुठेतरी तोडली जावी, यासाठी रमेश हरळकर ‘झाडू विरुद्ध खडू’ हे अभियान ते राबवत आहेत. सफाई कामगारांच्या वस्तीत जिथे जागा मिळेल तिथे, मग कधी मैदानात ताडपत्री टाकून, तर कधी एखाद्या शाळेच्या वर्गात त्यांची ‘एकलव्य अभ्यासिका’ भरते. शिक्षणापासून दूर जाणारी सफाई कामगारांची मुलं पुन्हा शिक्षणाकडे वळावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात.

 

‘झाडू विरूद्ध खडू’ हे अभियान समजून घ्यायचं तर त्यासाठी मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या पिढ्या झाडूच्या गुंत्यात कशा अडकत चालल्या आहेत, हे समजून घ्यायला हवे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना ‘शहराकडे चला’ असा संदेश दिला आणि कोकण भागातील पूर्वाश्रमीचा महार समाज मुंबईकडे निघाला. शहरात मिळेल ते काम करून जगताना काहीजण मुंबई महानगरपालिकेत सफाई खात्यात रुजू झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबई शहराची वाढ आणि लोकसंख्या दोन्ही मर्यादित होती. ब्रिटिश काळात मुंबई शहराचे रस्ते रोज पाण्याने धुतले जात. भल्या सकाळीच हे काम करायचे, तर कामगार त्या भागातच राहायला हवे. त्यामुळे सफाई कामगारांना त्या त्या परिसरात घरे देण्यात आली. आज ही घरच सफाई कामगारांसाठी घाणीच्या नरकाचे प्रवेशद्वार बनली. नियमाप्रमाणे सफाई कामगाराच्या निवृत्तीनंतर त्याला त्याचे राहते घर सोडावे लागते. मात्र त्याचा मुलगा त्याच्या जागेवर सफाई कामगार म्हणून रुजू झाला, तर मात्र त्या कुटुंबाला ते राहते घर सोडावे लागत नाही. मुंबई शहरातील राहते घर सोडायचे नसेल, तर सफाई कामगाराच्या तरुण, शिकलेल्या, कधी पदवीधर असलेल्या मुलालाही घाणीत उतरायला हवे, असा अलिखित नियम तयार झाला. हा नियम फक्त सफाई खात्यासाठी आहे, हे इथे लक्षात घ्यायला हवे. इतर खात्यात कर्मचारी नोकरीवर असताना, त्यांचे अपघाती निधन झाले तरच अनुकंपा तत्वावर त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला पालिकेत नोकरीवर ठेवले जाते, शिवाय त्या व्यक्तीच्या शैक्षणिक योग्यतेनुसार त्याला विभाग दिला जातो. एरवी, इतर खात्यातील रीतसर नोकरी करून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या मुलाला वारसाहक्काने पालिकेत नोकरी दिली जात नाही. मात्र सफाई खात्यातील कामगाराच्या मुलासाठी पालिकेने वारसाहक्काचे हे आरक्षण स्वतःहून मान्य केलेले आहे आणि त्याला आजवर कोणी आक्षेप घेतलेला नाही. कारण आजही इतर कुठल्याच जातींच्या लोकांना शहराची घाण साफ करायचे काम करायचे नाही. महानगरपालिकेच्या सफाई खात्यात दलितांना शंभर टक्के आरक्षण आहे.

 

या आरक्षणाविरूद्ध तसंच सफाई कामगारांच्या नरक या संकल्पनेलाही लाजवेल, अशा जगण्याविषयीही कोणी काही बोलत नाही. गटारांमध्ये गळ्यापर्यंत येणाऱ्या घाणीत सफाई कामगाराला उतरावं लागते. सफाई कामगाराचा विषारी वायूमुळे गूदमरून मृत्यू झाल्याच्या बातम्या वेळोवेळी प्रसिद्ध होत असतात. पण या असल्या बातम्यांच्या बाबतीत आपले समाजमन बधिर झालेले आहे. सफाई कामगारांचे बळी जात राहतात. जे जिवंत असतात त्यांच्या आयुष्याची दुर्दशा करण्याचं काम हा घाणीचा नरक, या नरकात मेलेल्या मनाने उतरता यावं म्हणून जवळ केलेली दारू आणि टीबी हा आजार या  गोष्टी करत असतात. कामगार मरण पावला की, राहती जागा टिकवण्यासाठी त्याची जागा त्याचा मुलगा भरतो.


या सापळ्यातून नव्या पिढीची सुटका व्हावी यासाठीच ‘झाडू विरुद्ध खडू’ ही मोहीम सुरू आहे. अनेकदा वडिलांच्या आजारपणामुळे, व्यसनामुळे, महानगरपालिकेच्या शाळांमधील उदासीन वातावरणामुळे अशा विविध कारणांनी सफाई कामगारांच्या मुलांची शाळा अनेकदा मध्येच सुटते. फार कमी मुलं पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्यात यशस्वी होतात. जे मूल कमी शिकते त्याला पुढे नाइलाजाने राहते, घर टिकवण्यासाठी सफाई खात्यात भरती व्हावे लागते. वेगळ्या मार्गाने, फक्त एका खात्यासाठी एक वेगळा नियम करून या आधुनिक महानगरात जातव्यवस्था टिकवली जात आहे.


सफाई कामगारांना, त्यांच्या मुलांना समाजात कोणताच मान नसतो. उर्वरित जातवर्ग त्यांच्यापासून फटकून वागतात. स्वतः सफाई कामगाराचे आयुष्य जगलेले रमेश हरळकर ही एक वेगळीच अस्पृश्यता असल्याचे सांगतात. स्वतः सफाई कामगार म्हणून काम करत असतानाच हरळकर यांनी ‘सफाई कामगार परिवर्तन संघा’ची स्थापना केली होती. या संस्थेमार्फत सफाई कामगारांच्या मुलांसाठी संध्याकाळच्या वेळेत अभ्यासिका चालवण्यात येतात. सकाळच्या किंवा दुपारच्या सत्रात शिकणारी मुलं संध्याकाळी या अभ्यासिकेत येऊन आपला अभ्यास करतात. या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी समाजातील तरुण कार्यकर्त्यांची मदत घेतली जाते. अलीकडे सफाई कामगारांचीच पदवीधर झालेली मुलंही या अभ्यासिकेत येऊन इथल्या मुलांना शिकवतात.


आज मुंबईतल्या पंचशील नगर, रमाबाई नगर, गौतम नगर, कासारवाडी इथे भरणाऱ्या अभ्यासिकांमध्ये मिळून ६०० ते ७०० मुलं या सोयीचा लाभ घेत आहेत. इथे अभ्यास शिकवतानाच त्या मुलांचा आत्मसन्मानही जागा केला जातो. कुठेही रहा पण हातात झाडू घेऊ नका, हे  त्यांच्या मनावर बिंबवले जाते.

 

पूर्वीची खेड्यातील अस्पृश्यता आणि शहरातील ही झाडुमुळे वाट्याला येणारी अस्पृश्यता यात काही फरक नाही, याविरोधात लढायला हवे, असे हरळकर सांगतात. या लढ्यासाठी हातात खडू ठेऊन हरळकर उभे आहेत, सरत्या वर्षातला हा त्यांनी निर्माण केलेला आशादायी अवकाश जगण्यावरचा विश्वास दृढ करणारा आहे...
(समाप्त)

संपर्क-sandhyanarepawar@gmail.com

 

बातम्या आणखी आहेत...