आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. जोशी, पर्दाफाश कराच! (अग्रलेख)

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या राजीनाम्याने दुसऱ्या अंकावर पडदा पडला आहे. यवतमाळ मराठी साहित्य संमेलनाचा पहिला अंक ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल प्रकरणामुळे चांगलाच रंगला होता. आता तिसरा व शेवटचा अंक अत्यंत रहस्यमय व उत्कंठा वाढवणारा होणार यात शंकाच नाही. फक्त या तिसऱ्या अंकात अडचण अशी की, ज्यांनी या साहित्य संमेलनाच्या कथेचा हा सगळा 'प्लॉट' रचला त्या डॉ. जोशींनीच आपली लेखणी मोडून तिसरा अंक लिहिण्यास नकार दिला. त्यामुळे आता 'क्लायमॅक्स'मध्ये प्रचंड हाणामारी, खलनायकावर मात आणि सत्याचा विजय पाहायला मिळेल की शेवटपर्यंत 'हे सगळं केलं कुणी', यावर डोकं खाजवत बसावं लागेल? पहिल्या दोन्ही अंकांत पडद्यामागूनच खलनायकाच्या कुरापती सुरू असल्याने तिसऱ्या अंकातही हा अदृश्यरूपी खलनायक त्याचे मूळ रूप दाखवेल की नाही, याबद्दल शंकाच आहे. एकुणात या सगळ्यामागचा कर्ताकरविता कोण आहे, याचा शोध लागणे कठीणच जाणार असे दिसते. 

 

आपला राजीनामा देताना डॉ. जोशी म्हणतात, 'आयोजकांनी मला खलनायक आणि दहशतवादी ठरवले. साहित्य संमेलनातील गोंधळाचा हा प्लॉट' नेमका कुणी रचला याचा शोध घ्या.' म्हणजे डॉ. जोशींनी हा असा अर्ध्यावर डाव मोडून पळ काढला. जोशी हे फार अनुभवी, ज्येष्ठ साहित्यिक आहेत. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करण्यामागे त्यांचे मोठे श्रेय आहे. सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राला विवेकी, समंजस, पुरोगामी वळण लावण्याचा त्यांचा कसोशीने प्रयत्न असतो, हेही खरे आहे. परखड भूमिका, प्रामाणिकपणा, अभ्यासूवृत्ती आणि राज्याच्या सांस्कृतिक विकासाची तळमळ हे त्यांचे गुण खास आहेत. सरकारची सांस्कृतिक धोरण समिती, भाषा समिती यांच्या कामातील अनेक त्रुटी डॉ. जोशींनी शासनाच्या लक्षात आणून दिल्या आहेत. अ. भा. साहित्य महामंडळाने भाषा, साहित्य आणि संस्कृती अशा तिन्ही अंगांनी काम करावे, अशी डॉ. जोशींची भूमिका राहिली आहे. प्रश्न उपस्थित करून थांबायचे नाही तर उपायही सुचवायचे हा त्यांचा पिंड. परंतु यवतमाळ साहित्य संमेलनाबाबतीत मात्र त्यांच्यातील यापैकी एकाही गुणाचे दर्शन घडले नाही. एका चुकीमुळे या सर्व गोष्टींवर पाणी फेरले गेले. संवादशास्त्र आणि माध्यमशास्त्रांतील तज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे डॉ. जोशी त्यांच्याच संवादात अडकत गेले. वास्तविक सहगल यांना संमेलनाच्या उद्घाटक म्हणून आमंत्रित करण्याची सूचना डॉ. जोशींची होती त्यावरूनच त्यांची वैचारिक भूमिका स्पष्ट व्हावी. मात्र सहगल यांच्या भाषणाची प्रत आल्यानंतरच खरा राडा सुरू झाला. मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुढ्यातच सहगल यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीसंबंधीचे भाषण होऊ द्यायचे म्हणजे तौबा तौबा...सहगल यांच्या संभाव्य भाषणामुळे संयोजक दबावाखाली आले. तेथे डॉ. जोशी यांचा खरा कस लागला. पण डॉ. जोशींची या प्रकरणातील भूमिका वादाची राहिली. अगोदर ते म्हणाले की, संमेलनात कोणालाही महामंडळ निमंत्रित करत नाही. ते काम आयोजक करतात. त्यामुळे त्यांच्या अडचणींमुळे असेल किंवा अन्य काही दबावांमुळे त्यांनी हा मार्ग निवडला असेल तर तो स्थानिक आयोजकांचा निर्णय आहे. महामंडळाचा त्याच्याशी काहीएक संबंध नाही. आपल्या या वक्तव्याशीच २४ तासांत फारकत घेत डॉ. जोशींनी सहगल यांना पाठवण्यात आलेल्या नकारपत्राचा इंग्रजीतील मसुदा आपणच तयार करून दिल्याचे सांगितले. प्रसारमाध्यमांतून आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्यावर संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांनी या सगळ्या वादाला डॉ. जोशी हेच जबाबदार असून त्यांच्या सांगण्यावरूनच सहगल यांना बोलावण्याचा निर्णय रद्द करण्यात आल्याचा गौप्यस्फोट केला. त्यांची पाठराखण आयोजक संस्था डॉ. वि. भि. कोलते संशोधन केंद्र व वाचनालयाचे पद्माकर मलकापुरे यांनी केली. त्यांनीही महामंडळाचे अध्यक्ष डॉ. जोशी हे डिक्टेटर आहेत, हिटलर आहेत, त्यांनी संमेलनाच्या कार्याध्यक्षांना पापाचे धनी केले, अशी जहरी टीका केली. त्याला कुठलेही संयुक्तिक उत्तर न देता डॉ. जोशी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्याने हा प्रश्न सुटणार नसून, तो चिघळला आहे. कारण, राजीनामा देताना डॉ. जोशी यांनी या सगळ्या प्रकरणाचा शोध घ्या, असे आवाहन केले आहे. आता, या षड््यंत्रामागे इतरच कोणीतरी असल्याचा संशय म्हणा किंवा त्यासंबंधीची निश्चित माहिती जर डॉ. जोशींना ठाऊक असेल तर त्यांनीच ही माहिती उघड करायला हवी. खलनायक आणि दहशतवादी या बिरुदासह पुढचे काही दिवस जर डॉ. जोशींना घालवायचे नसतील तर त्यांनी त्यांच्या स्वभावाला साजेसे वर्तन करत परखडपणे या अदृश्य खलनायकाचा पर्दाफाश करावाच. 
 

बातम्या आणखी आहेत...