आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...अन् त्यांनी व्हायोलिन बद्दलचे सर्व साहित्य मागवले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल घटना, राष्ट्रनिर्मिती, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, कायदा अशा गंभीर विषयांवर लिहिले जाते. बाबासाहेब फार शिस्तप्रिय, गंभीर, रागीट होते असा काहीसा समज अशा लिखाणावरून होणे स्वाभाविक आहे. परंतु बाबासाहेब फार मिश्किल आणि जिंदादिल व्यक्ती होते; मनमिळाऊ, रसिक आणि बोलके होते हे फार कमी लोकांना माहीत आहे, शिवाय ते संगीत प्रेमीही होते. बाबासाहेबांना संगीताची खूप आवड होती पण तारुण्य अभ्यासात आणि तरुणपण आंदोलन, लढे राजकारणात गेल्याने त्यांना आपले छंद दाबून ठेवावे लागले पण आपल्या उतार वयातही असलेल्या वादळी आयुष्यात ते आपल्या आवडीचे संगीत ऐकायला वेळ काढत असत. प्रत्येक व्यक्तीने संगीतामधील मधुरता आणि कलेतील सौंदर्य यावर प्रेम करावे असे त्यांचे मत होते. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी व्हायोलिन शिकण्याचा निर्णय घेतला. सिद्धार्थ विद्यालयातील ग्रंथालय अधिकारी रेगे यांनी बळवंत साठे यांना बाबासाहेबांना व्हायोलिन शिकवण्यासाठी पाठवले. रेगे आणि त्यांचे मोठे बंधू दोघेही बाबासाहेबांना व्हायोलिन शिकवायचे. बाबासाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला शिकवणे कसे जमणार म्हणून अनिच्छेने आम्ही शिकवण्यास गेलो पण बाबासाहेबांच्या मनमिळाऊ आणि खेळकर स्वभावामुळे आमचे दडपण दूर झाले असे साठे अभिमानाने सांगतात. साठे बाबासाहेबांना त्यांच्या वेळेनुसार राजगृहवर व्हायोलिन शिकवत असे, बाबासाहेबांनी २ वर्षे हे तंतू वाद्य शिकून घेतले आणि आपल्या फावल्या वेळेत ते हे वाजवायचे. १९५१ ते १९५३ या कालावधीत साठे यांना बाबासाहेबांना व्हायोलिन शिकवण्याचा सन्मान मिळाला पहिल्या दिवशी त्यांनी बाबासाहेबांना सांगितले की, व्हायोलिन हे तंतू वाद्य प्रकारातला सर्वात कठीण प्रकार आहे,बाबासाहेबांनी लागलीच व्हायोलिन बद्दलचे सर्व साहित्य मागवले आणि रीतसर अभ्यास सुरू केला, "व्हायोलिन : हाऊ टू मास्टर इट" हे पुस्तक स्वतःसाठे यांनी बाबासाहेबांना दिले होते संगीताबद्दलचे त्यांचे प्रेम आणि शिकण्याची प्रबळ इच्छा मी पहिल्यांदा कुणामध्ये पाहत होतो असे साठे सांगत असे पण त्यांचे शरीर त्यांच्या मेहनतीला साथ देत नव्हते, व्हायोलिनचा बो खूप वेळ ते धरू शकत नव्हते, त्यांचा हात दुखून येई मग ते थोडी विश्रांती घेत आणि पुन्हा सराव करत,थोड्याच कालावधीत बाबासाहेब फार उत्तम व्हायोलिन वाजवू लागले असे साठे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.