आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थेंबभर निरोपाचा समुद्र!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जवळजवळ वर्ष होत आलं, आपल्या एकमेकांशी सुरू केलेल्या संवादाला. दर पंधरा दिवसांनी आपण एकमेकांशी बोलायचो. कुणी फोन करून प्रतिसाद द्यायचं, तर कुणी एसएमएस पाठवून, कुणी इमेल करून. यात मोटार ड्रायव्हर होते, पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणारे होते. गृहिणी होत्या, व्यवसायाने वैद्यकीय डॉक्टर होते, अगदी परदेशातीलसुद्धा. इंजिनियर, व्यावसायिक होते, नाटक-साहित्यात पी.एच.डी केलेले-करू इच्छिणारे, ज्यांच्यावर लिहिलं ते काही लेखक, काही दिग्दर्शक. आवर्जून वाचतो-मालिकेचं पुस्तक करा, असं सांगणारे कलावंतही...

 

निरोपाच्या या क्षणी, मी मालिकेतल्या पहिल्या लेखापाशी पोचलो. ‘एक पाऊल भूमी व्यापणारे’ हे त्या आरंभ-लेखाचं शीर्षक पंजाबी कवी अवतारसिंग संधू ऊर्फ पाश यांच्या कवितेतून उमलेलेले. कालजयी कलाकृतींचा संभाव्य अवकाश सूचित करणारं. पाशने मला आज निरोपाच्या वेळीही साथ दिली. आज मला जे वाटतंय, ते त्यानं आधीच सांगून ठेवलंय, त्याच्या ‘आता मी निरोप घेतो’ या कवितेत.
पाश प्राथम्याने प्रेयसीला उद्देशून म्हणतोय, पण मी वापरतोय आस्वादकांसाठी- वाचकांसाठी.

...मला या निरोपाच्या वेळी
त्या सर्व सुंदर गोष्टींचे आभार मानावेसे वाटतात...
...मी एक माणूस आहे  
अनेक लहान लहान गोष्टी जोडून बनलेला.
मी आभारी आहे.
मला विखरून जाण्यापासून वाचवणाऱ्या
त्या सर्व गोष्टींचा.
आभार मानण्यासारख्या खूप भेटवस्तू आहेत, माझ्याकडे...  

या  मालिकेत मी ज्या कलाकृतींवर लिहिलं, त्या साऱ्या त्याच्या रचयितांनी-सर्जकांनी मला दिलेल्या भेटवस्तूच आहेत; ज्या आपल्या सह-मैफलीत मी तुमच्यासमोर सादर करत होतो.
पाशची ही कविता मला आपल्या अवतीभवती असलेल्या नानाविध निरोप-रूपांकडे घेऊन गेली. मध्यमवर्गीय जीवनात नोकरीतून निवृत्त होणे ही सर्वपरिचित बाब असते. त्याचे एक शब्दचित्र हेमंत जोगळेकरांच्या ‘निरोप’ या कवितेत उमटले आहे.
ही पार्टी थोड्या वेळाने संपेल...
तुम्हाला संपूर्ण विसरून उद्याच्या कामाची चर्चा करत कार्यक्रम संपेल. तुम्ही जाण्यासाठी निघाल. एकटेच... उद्यापासून कुणाशी बोलाल आपलं एक बोट उंचावून?...
चित्रपटातल्या अखेरच्या दृश्यासारखी
दूर जाणारी तुमची आकृती
आम्ही पहात राहू भारावून
तुमच्या जागी स्वतःला कल्पून...
आपल्या कार्यक्षेत्रातून बाहेर पडल्यावर किती झपाट्याने जग आपल्याला विसरते हे चित्रित करतानाच, स्वतःच्या  सेवानिवृत्तीचा निरोप-समारंभ आपण, आपल्या जेष्ठ सहकाऱ्यांना निरोप देताना, कल्पनेच्या पातळीवर आधीच अनुभवला असतो, असेही ते सुचित करतं.
आता रजनी परूळेकरांच्या कवितेतील रेंगाळलेल्या निरोपाला, किती अर्थच्छटा बिलगून आहेत ते बघू.
 मनसोक्त गप्पा केल्यावर
 मला निरोप देताना
 तू फाटकापाशी रेंगाळतेस,
...म्हणतेस, ‘तू समजून घेतेस, धीर देतेस  म्हणून...’
खरं तर मी मलाच समजून घेत असते,
मलाच धीर देत असते.
आईने मुलाच्या रूपाने स्वतःलाच थोपटावे,
त्याच्या डोळ्यांतला थेंब पुसताना
आपला मीलनक्षण ओंजळीत घ्यावा तसे!     
भेटीनंतर एकमेकांचा निरोप घेण्याच्या साध्या वाटणाऱ्या कृतीमध्ये केवढा मोठा मनोव्यवहार गुंतलेला असतो, हयाचे मानस-चित्र हा कविता-अंश  दर्शवतो...

अत्यंत कमी शब्दात मोठी आशयगर्भ कविता लिहिणारे म.म.देशपांडे निसर्ग, निर्मिती आणि माणसाचं मन एका निरोपाच्या कवितेत गुंफतात.
अधूनमधून पाऊस यावा
जसा कुणी
निरोप सांगावा

निरोपावर
यावे निरोप
ये बघायाला
जन्मा आले रोप...

कवी सदानंद रेगे यांच्या ‘निरोप’ या आगळ्यावेगळ्या चमत्कृतीपूर्ण कवितेत कवी आणि त्याच्या कवितेचं त्याच्याशी असलेलं नातं, त्याच्या अवतीभवती असलेल्या जगाच्या पार्श्वभूमीवर, रेखाटलं आहे.
तुम्ही गेल्यापासून
तुमच्या कवितांची वही
अत्यवस्थ आहे.
 
असा एक शब्द जात नाही
जो तुमच्या नावे
मोडला जात नाही

तुमची वही
रोज थोडीथोडी
कोरी होत चाललेय;
तिला चांगला भाव यायला
अजून थोडा अवकाश लागेल.

या कवितेत नुसता उपहासच नाही, तर शोकात्म-उपहास आहे. कवीने लिहिलेल्या कवितांपेक्षा कोऱ्या वहीचा ‘बाजारभाव’ अधिक आहे, पण कविता हाच कवीचा प्राणस्वर आहे, हे ही प्रारंभीच सूचवलं जातं.

 

कादंबरीकार-समीक्षक म्हणून अधिक माहीत असलेले भालचंद्र नेमाडे यांची ‘निरोप’ ही कविता एकमेकांच्या साथीनं राहणारी माणसं, ते मानव-वंश हे सारे काही आपल्या प्रतिभेच्या कवेत घेते. कवितेच्या पहिल्या कडव्यातच ‘तू-मी’ आणि विश्व यांच्यातलं अवकाश सूचित केला आहे आणि शेवटचं कडवं निरोपाच्या अटळ टप्प्यापर्यंतचा सारा प्रवास आपल्या संवेदनेत प्रवाहित करतं.


या विश्वभानाच्या घोंघावत्या समुद्रफेसात निरर्थक न ठरो
आपल्या आयुष्याचा सुरम्य सप्तरंगी बुडबुडा, न ढळो
हे पहाटी पांघरलेले दाट झाडांतून डोकावणारे रोशन सूर्य

घरकामाची अहोरात्र गाज सांभाळत तू आपलं हे तारू संथ ठेवलंस
न उसळता न खवळता उलटं होऊ दिलं नाहीस, हे बुडबुड आयुष्य प्रिये,
आपण एकमेकांना द्यायचं घ्यायचं काहीच, बाकी ठेवलं नाहीय,
त्या एका जड थंड निरोपाशिवाय.

‘हिंदू’ या  नेमाडेंच्या कादंबरीची स्पष्टीकरणात्मक म्हणावी अशी टॅगलाईन ‘जगण्याची समृद्ध अडगळ’ ही शब्दकळा याच निरोपाच्या कवितेत सघन-क्षणी अवतरते...
या खिन्न विनाशतत्वाच्या झपाट्यात दरवळो
अकाली महामेघानं उठवलेली जमिनीतली उग्रगंधी धूळ, साचो
घर भरून जगण्याची समृद्ध अडगळ
या कवितेत क्रियापदांची रचना ‘निरर्थक न ठरो’ ‘न ढळो’ ‘दरवळो’ ‘साचो’ अशा  इच्छा-प्रार्थनेसारखी निरोपाचे शब्द बनून येते.
या वर्षी २३ जानेवारीला १०३ वर्ष प्रदीर्घ आयुष्य जगलेला, निकनोर पाऱ्या या जगप्रसिद्ध चिलियन कवीने या जगाचा निरोप घेतला; पण  निरोपाची कविता त्यानं जणू आधीच लिहून ठेवली होती. ती वाचतो, तेव्हा  आपलं मन त्याच्या  मनाच्या साथीनं प्रवास करत, एक उन्नत-बिंदू गाठतं.

जाण्याची वेळ आलेली आहे
मी सर्वांचा ऋणी आहे
जितका आपल्या कृपाळू मित्रांचा
तितकाच आपल्या माथेफिरू शत्रूंचा...

दुनियेतल्या उच्चतम आनंदासोबत
निरोप घेण्यासाठी मी तुम्हाला आमंत्रित करतोय...

ठीकय की मी रडू लागलोय...
स्वतःची काळजी घ्या   मला दोन ओळीचं पत्र लिहा...

आपलं कोळ्यासारखं जाळं विणणं चालू ठेवा
मी चिंतितो तुमचं आरोग्य तुमची समृद्धी  
आणि तो दिवस आनंद ज्याचा तुम्ही घेऊ शकाल...

 

गेल्या वर्षभरात ज्या कलाकृतींसह या मालिकेतून  मी तुम्हाला भेटलो, त्यातही काही महत्वाची निरोप-दृश्यं होती, ‘संस्कृती समतोलाच्या वाटेवरचे सहोदर’ या लेखात भेटलेला देरसू उझाला याला लष्करी अधिकारी व्लादिमीर आसेनिव्ह आपल्या घरी, नागरी वस्तींमध्ये स्वतःबरोबर राह्यला घेऊन जातो, पण तिथं आपण ‘मिसिफीट’-उपरे आहोत हे कळल्यानंतर देरसू

आपल्या जंगलात परतण्याचा निर्णय घेतो. एकमेकांचे जणू प्राणसखा झालेल्या आर्सेनिव्ह आणि देरसू या दोघांसाठी हा निरोप-क्षण, त्यांच्या आयुष्याचाच एक भाग दूर गेल्यासारखे होता. ‘आठवणीतल्या होडीतून निरागस नंदनवनाकडे’ या लेखात संदर्भ आलेल्या माजिद माजिदी यांच्या ‘कलर्स ऑफ पॅरॅडाईज’या चित्रपटात महंमदचे बाबा हाशिम, त्याला एका अंध सुताराकडे सोडून त्याचा निरोप घेतात, तो क्षण दोघांचेही काळीज पिळवटून टाकणारा आहे, कारण त्यात पित्याने मुलाचा त्याग करण्याचा विचार केला होता, हे सत्य दडलेले आहे. खानोलकरांच्या ‘एक शून्य बाजीराव’ या नाटकातील ‘बाजीराव’ यात बाजीरावाने प्रत्यक्षात जगाचा घेतलेला निरोप(त्याचा मृत्यु) प्रेक्षकांना खरा वाटत नाही, त्यावेळीही लोक हसत असतात, इतका हा शोकात्म निरोप आहे. आंद्रे तारकोव्हस्की याच्या ‘इव्हान्स चाइल्डहूड’ या चित्रपटावर आधारित ‘फाशी दिलं, गोळी घातली’ या लेखात युद्धकाळात जर्मनांनी केलेल्या अत्याचारात आपलं सारं कुटुंब गमावलेल्या इव्हान्सला एका अर्थी आपल्या बालपणाला निरोप द्यावा लागला आहे.

‘माणसाचा भला थोरला मित्र’ हा लेख थोर रशियन लेखक लिओ टॉलस्टॉय यांच्यावर आधारलेला होता. मृत्युपूर्वी सर्वस्वाचा त्याग करून आपल्या घराचा निरोप घेणाऱ्या टॉलस्टॉयची जीवनकहाणी, त्याच्या गृहत्यागाच्या कारणांसह आपल्या मनात रूतून बसते. ‘सत्यप्रकाशात झळाळत्या सॉक्रेटिस’ने सत्यासाठी मृत्युदंड स्वीकारत जगाचा निरोप घेतला. अकिरा कुरोसावाच्या ‘मादादायो’ या चित्रपटातील प्राध्यापक ह्याकेन उचिदा जीवनावरील प्रेमामुळे अगदी मृत्युने ‘रेडी?’ असा निरोप पाठवला, तरी ‘नॉट यट’ असे उत्तर देतील, असे आहेत. संगणक-विज्ञान आणि आरेखन क्षेत्रातील जागतिक कीर्तीचे तज्ज्ञ रँडी पॉश यांचे ‘द लास्ट लेक्चर’ हे पुस्तक, तर या जगाचा निरोप घेण्यापूर्वी,आपल्या शेवटच्या भाषणाच्या रूपात, मानवी वंशासाठी दिलेल्या अजरामर भेटीचा वेध  आहे. म्हणूनच या मालिकेत ते ‘अमर खेळिया’ म्हणून अवतरले.


‘थोडासा रूमानी हो जाये’ या चित्रपटातल्या शेवटच्या दृश्यात बारिशकरने घेतलेला सगळ्यांचा निरोप आपल्या सगळ्यांच्या मनात हृद्य आठवणींसह रिमझिमतो. ‘देवराई’ या चित्रपटातील शेष हा कल्याणीच्या साथीने गावात नीट राहील, अशी आशा असूनही त्याची बहीण सीना हिच्या डोळ्यात निरोपाच्या क्षणी, साऱ्या कठीण काळाचे प्रतिबिंब उमटले आहे. अगदी अलीकडे, या मालिकेत ज्या  ‘बरान’ या चित्रपटावर मी लिहिले आहे, त्यातले शेवटचे दृश्य तर जागतिक चित्रपट-सृष्टीतील एक नितांतसुंदर निरोप-दृश्य आहे. निरपेक्ष- समर्पित प्रेमभावनेनं भिजलेलं हे दृश्य, अनिश्चिततेच्या विश्वात असा ठसा उमटवतं, की बघणाऱ्या प्रत्येक जणाच्या मनात तो पाऊल-ठसा काळीजभर पसरतो...

या निरोपाच्या क्षणी, मी वर्षभरात जे सारे तुमच्यासमोर मांडले, ते सारे पुन्हा सांगणे शक्य नाही. निरोप घेणाऱ्याची अवस्था कशी असते, तेवढेच आता सांगतो. दिलीप चित्रेंच्या शब्दात -
... पण निरोपाचा थेंब असतो, निरोपाचा समुद्र
अन् निरोपाचा पूर्णविराम असते न संपणारी रात्र
मी फक्त थेंबात साठवलेले समुद्राचे गुणधर्म दाखवले. बाकी होडी-जहाज-प्रवास सारे तुमचेच. निरोपाच्या क्षणी मी आठवलो, तर हे संवाद-वर्ष मी पुन्हा जगेन...!

लेखकाचा संपर्क : arvikarsanjay@gmail.com

 

 

बातम्या आणखी आहेत...