आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article About \'Facebook Post\' By Eshwrya Patekar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आधार लिंक्ड भूक अर्थात फेसबुक पोस्ट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोष्टींनी माणसांना मंत्रमुग्ध केलं, नादावलं आणि पछाडलंसुद्धा. यातूनच संस्कृती-परंपरा विस्तारल्या, सहवेदनेचा संस्कार रुजला. काळ बदलला, माध्यम बदललं. गोष्टी सांगण्याची तहा बदलली. या बदलत्या काळातल्या माणूसपणाला साद घालणाया रोजच्या जगण्यातल्या गोष्टी उलगडणारे हे पाक्षिक सदर...

 

म्हणजे ती आई भाकरीवाचून मरणाया पोरीजवळ नुसतीच बसून राहिली होती, असं नाही! तिने खूप प्रयत्न केले. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतची जमीन तिने पालथी घातली. पृथ्वीला गरका मारून आली. तरी हताश न होता, तिने उंदराचे बिळ उकरले. पण एक दाणा त्यात सापडू नये.

 

आधार लिंक्ड भूक अर्थात फेसबुक पोस्टची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. माझ्या गोष्टीत, पृथ्वीवरचं एक घर. पृथ्वीवरच्याच मायलेकी. पण घनघोर अभावाच्या जगातल्या. मुलगी शाळकरी वयातली. अंगावर तिच्या वयातली कुठलीही मुलगी घालू शकेल, असे कपडे. तिची आई फाटक्यातुटक्या कपड्यातली. घर घरासारखं. त्याचं काय वर्णन करणार? एक मोडकीतोडकी खाट, जी पृथ्वीवरच्या बऱ्याच घरांत असते. जशी तुमच्या घरी आहे; तशीच माझ्याही घरी आहेच. इथपर्यंतचं वर्णन आपल्या घरातल्यासारखं असलं, तरी पुढचं मात्र नाही. हे मी खात्रीने सांगतो आहे. मुलगी गेले आठ दिवस उपाशी आहे. तिच्या पोटात अन्नाचा एक कण गेलेला नाही. तिची आई तिच्या उशाशी बसलीय. मुलीच्या भुकेची चिंता तिला सतावतेय. पण, तिच्या आईलाही पोट होतंच की, मग तिच्या भाकरीचं काय? पण मुलीच्या भुकेपुढे तिला तिची भूक अगदीच छोटी वाटत असावी. 

 

आजच का जगातल्या सगळ्याच्या सगळ्या भाकऱ्या संपून गेल्या? त्यांचा खरपूस वासही का मरून पडला? शिळ्या भाकरीचा एखादाही कुटका नजरेस येऊ नये, अशी चोख व्यवस्था केलीय जगाने. माझ्या पोरीला जेवायचंय. ती नाही जेवली तर मरून जाईल. मग भाकरीचं काय करायचं? ती मेली तर जगास थोडेच सुतक पडणार आहे? का तिचा सामुदायिक दुखवटा पाळला जाणार आहे? खाणारं एक तोंड कमी होईल; जगाच्या दृष्टीने ही चांगलीच गोष्ट आहे. तिच्या वाटची भाकर इतरांत वाटून खाल्ली जाईल. असा काही विचार ती, आई करत होती का? एवढं खरं की एका भाकरीसाठी तिला युद्धात उतरायची अट घातली असती तर ती खुशाल युद्धात उतरली असती अन् मुलीसाठी भाकर मिळवली असती. मुलीने मोठ्या प्रयासाने ओठांची हालचाल केली. जणू गेल्या कित्येक शतकांपासून तिने शब्द उच्चारलेलाच नसावा.


‘आई, शाळेला येवढ्या दिवस का सुट्टी देतात, हे शाळेवाले?’
‘रोजच शाळा घेऊन कसं भागंल पोरी, अन् लोक काही आपल्यासारखे शाळेच्या भाकरीवर अवलंबून न्हायी!’
‘सुट्टी नसती तर मिळाली असती नं भाकर!’
‘आगं मिळविलच मी भाकर. तू फकस्त जीवनाला धरून जित्तं राहण्याचा खुटा सोडू नकोस!’
‘आई जित्तं राहण्यासाठी भाकर तर लागंलच नं!’
‘तू भाकरीला इतकंही महत्त्व देऊ नको, न्हायी तर ती आणखीनच धारेवर धरेल!’
‘म्हण्जे गं आई!’
‘..............!!!’


ते मुडदे रेशनवाले म्हन्त्यात की रेशन मिळणार न्हायी. ‘आधार’ लिंक न्हायी. न्हायी तं न्हायी. राशन नका दिवू. चार दाणं भीक मागितलं. तेबी न्हायी दिलं. म्हंजी भीक मागाय आधार लिंक करावं लागंल, म्हने, ‘आधार’ म्हंजी वळख हाये तुमची! मेल्यावर झटक्यात संपून जातं आधार कार्ड. त्या वळखीचं काय करायचं? आईच्या गर्भातून घेऊन आलोय का ते कार्ड? माणसाला माणूस वळख दाखवत न्हायी. काय करायचं जगण्याचं? कुणालाच कसा सुगावा लागेना, माझ्या पोरीच्या भुकेचा? का आम्ही पृथ्वी सोडून राहतोय. आम्हाला वाटलं की, आम्ही माणसात राहतोय. कुठे गेलीय सारी संवेदनशील माणसं? का कुणी डाव रचून संवेदनशील माणसांना पृथ्वीवरून हुसकावून लावलं?  असा काही विचार ती आई करत होती का? तेही मला काही सांगता यायचं नाही. भुकेनं मरणाऱ्या पोरीकडे पाहत होती फक्त. म्हणजे ती आई भाकरीवाचून मरणाऱ्या पोरीजवळ नुसतीच बसून राहिली होती, असं नाही! तिने खूप प्रयत्न केले.

 

सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सगळी जमीन तिने पालथी घातली. पृथ्वीला गरका मारून आली. तरी हताश न होता, तिने उंदराचे बिळ उकरले. पण एक दाणा त्यात सापडू नये. उंदरांना बिळात दाणे घेऊन जाण्यासाठी जगाकडे दोन दाणेही शिल्लक नव्हते, म्हणे! त्यात काय आश्चर्य! जग अठराविश्वाचं दरिद्री. त्या दरिद्री जगात एक शाळकरी मुलगी भाकरीसाठी अडून बसली होती. अन् तिच्या आईच्या पदराच्या झोळीत एकही भाकर कुणी टाकू नये.  तुम्हाला असं वाटू शकतं की, ही गोष्ट आपल्या जगातली नाहीच. ही तर अद््भुत कल्पकथा आहे. असं भाकरीशिवाय माणूस कधी मरू शकतो? हे काही खरं वाटत नाही. म्हणजे, दुसऱ्या कुठल्या तरी जगातल्या या मायलेकी असल्या पाहिजेत. कारण, त्यांच्याकडे आधार कार्ड नसल्यामुळे मेल्या. नंतर त्यांची तशीही नोंद होऊ शकली नाही! खूप मोठी गर्दी त्यांच्या घराजवळ जमा झाली होती. ते सारेच आधार कार्डधारक होते. पण त्यांच्यातल्या कुणाचंच आधार कार्ड मायलेकीसाठी उपयोगाचं नव्हतं. अशा गोष्टी का निर्माण केल्या जात असाव्यात? ज्या इतरांच्या कामी येऊ नये! मग हे लोक कशासाठी जमले असतील? बरं कुणाच्याच हातात भाकर नाही की त्या मुलीला वाचवायची त्यांची इच्छा असावी, असं म्हणायला कुठलीच जागा शिल्लक नाही. लोक मरणाऱ्या मुलीचे फोटो मोबाइल कॅमेऱ्याने  घेत होते. काय करतील लोक, त्या पोरीचे फोटो घेऊन? फेसबुक आल्यामुळे जगातली कुठलीच गोष्ट वायफळ ठरत नाही. निर्घृण कोरडी संवेदनशीलता आळवता येईल, पोस्ट टाकून!  

 

तरीही प्रश्न उरतोच आधार लिंक न झालेल्या रेशन कार्डचा! शेवटी मुलगी मरतेच. ती किती वेळ तग धरू शकणार होती? लोकांनी मोबाइलमध्ये फोटो घेतलाच. मेलेल्या मुलीचा निश्चेष्ट चेहरा अन् आईचा करुण आकांत. काळजात कळ उमटली! मोबाइल तातडीने घेऊन पोहोचणारी ही माणसं. कदाचित त्यांच्याही घरात भाकर नसावी. असती तर आणली नसती का?

 

या आधी मी असा संवाद मांडला मायलेकीचा... 
‘आई पुस्तकातले धडे वाचले म्या, पण त्याच्यात बी भाकर न्हवती. कविता वाचल्या. पाठ बी केल्या. त्यात बी भाकर न्हवती. गणितात बी न्हायी अन्् भूगोलात बी न्हायी.’
‘त्यात कशी आसंल पोरी!’
‘मग कुडे असेल भाकर?’
‘आधार कार्डात!’
‘तेच तं न्हायी नं आपल्याकडं!’
‘मग दुसऱ्याचं मागून आणायचं नं आई, काही दिवसांसाठी! माझी शाळा भरली असती तर मला भाकर मिळाली असती अन् आपण आधार कार्ड परत केलं असतं, ज्याचं त्याला!’
‘दुसऱ्याचं न्हायी चालत!’
‘मग काय उपेग त्याचा?’ 


अर्थात मी मांडलेला हा संवाद पूर्णपणे काल्पनिक आहे. माणसाने माणसाच्या भावना काल्पनिक करून टाकल्या अन् तो कल्पना कल्पना खेळत बसतो. भुकेल्या पोटाने कुठे असा वास्तव संवाद करता येईल का? की वास्तवाचीच कल्पना करून टाकलीय? 

 

फेसबुक पोस्टला लाइक न करता मी लिहू पाहिली, त्या बातमीमागची ही कथा. तसा मीही गुन्हेगार आहेच. जग ऑनलाइन होऊनही, मीही त्या मुलीसाठी साधी एक भाकर ‘सेंड’ करू शकलो नाही..! आणि मी ही कथा तुम्हाला सांगितली. ती अशीच घडली की काय? मला नाही माहीत! एवढं मात्र खरं आहे, की ते पृथ्वीवरचं एक घर होतं अन् पृथ्वीवरच्याच मायलेकी. जी मुलगी भाकरीशिवाय मरून गेली, ती पृथ्वीवरचीच होती. ते जग घनघोर अभावाचं होतं. पण पृथ्वीवरचंच! न राहवून मी पोस्ट टाकलीच. मोजत राहिलो लाइक. शंभर... दोनशे... हजार... लाख...करोड... अब्ज... यात तुमचाही एक लाइक आहेच...! आपण सारे पृथ्वीवरचे. का तुम्ही अभावातल्या जगातले नाही आहात? त्याने काय फरक पडतो? मी ही कथा लिहिताना हा भेद केलाच नाही की, उच्चभ्रू जग आणि अभावाचं जग. कथा वाचण्यासाठी साक्षर असणं ही पूर्वअट. ती पार केली की कुणीही ती वाचू शकतं..! तुमच्याजवळ आधार कार्ड नसलं तरीही...

(लेखक दै. दिव्य मराठीचे संपादक आहेत)