आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगाप्रसाद अग्रवाल : हैदराबाद मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रेसर नेतृत्व

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ सर्वोदयी आणि गांधीवादी नेते गंगाप्रसाद अग्रवाल यांचे गुरुवारी दीर्घ अाजाराने वसमत येथे निधन झाले. आयुष्यभर महात्मा गांधी यांच्या विचारांवर वाटचाल करणाऱ्या अग्रवाल यांनी हैदराबाद-मराठवाडा मुक्ती आंदोलनात सहभाग नोंदवून निझामाच्या तावडीतून मराठवाडा मुक्त करण्यासाठी मोठे योगदान दिले. विनोबा भावे यांच्या भूदान पदयात्रेतही त्यांनी सहभाग घेतला. याशिवाय आणीबाणीच्या काळात त्यांनी जयप्रकाश नारायण यांना साथ देत १९ महिन्यांचा तुरुंगवासही भाेगला हाेता. त्यांच्या कारकीर्दीचा हा अाढावा...


वसमत येथे १ जानेवारी १९२३ राेजी गंगाप्रसाद अग्रवाल यांचा जन्म झाला. स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या अंबाजोगाई येथील योगेश्वरी विद्यालयातून त्यांनी मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर वर्धा येथील बियाणी महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली. वर्धा येथे शिक्षण घेत असताना त्यांनी महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या विचारावर प्रभावित होऊन सर्वोदय चळवळीत स्वतःला झोकून दिले. महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने या वर्षी जानेवारी महिन्यात गंगाप्रसादजी अग्रवाल यांना 'जीवनगौरव' पुरस्कार देऊन साहाय्यता निधीही देण्यात आला होता.


वसमत नगरपालिकेचे पहिले लोकनियुक्त अध्यक्ष म्हणून १९५२ मध्ये निवडून आले आणि त्यांनी अडीच वर्षे काम केले. त्या काळात संयुक्त महाराष्ट्राचा लढा जोरात होता. नगर परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ते उतरले. राष्ट्रसेवा दलाचे कार्य करीत असताना गंगाप्रसादजींनी मराठवाडा पातळीवर तरुणांच्या संघटनांची बांधणी केली. मराठवाडा राष्ट्र सेवादलाचे पहिले शिबिर वसमत तालुक्यातील भोरीपगाव येथे आयोजित केले. तेथे त्यांनी श्रमदानातून दलितांना पाण्यासाठी विहीर खुली केली. आचार्य विनोबा भावे यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्याने त्यांनी १९५८ मध्ये विनोबा भावे यांच्यासोबत भूदान पदयात्रा आणि महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षात १४५ दिवसांचे साखळी उपोषण केले.


आणीबाणीत तुरुंगवास
आणीबाणीच्या काळात लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतिविचारांच्या कार्याने प्रेरित होऊन त्यांनी १९ महिन्यांचा तुरुंगवासही भोगला. शिवाय त्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामात सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे निझामाच्या सैनिकांशी सशस्त्र संघर्ष केला होता. गंगाप्रसादजी यांनी संपूर्ण आयुष्य गांधी-विनोबांच्या सर्वोदय विचाराला समर्पित केले होते. गेल्या तीन वर्षांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते घरीच राहत होते. सहा महिन्यांपासून त्यांची प्रकृती आणखीच खालावली होती. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्र एका मोठ्या गांधीवादी नेत्याला तसेच स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, जयप्रकाश नारायण यांच्या सहकाऱ्याला मुकला असून सर्वोदयी व गांधीवादी कार्यकर्ते संपूर्ण मराठवाड्यातील नागरिकांमधून शोक व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...