आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक: महाजनांचा साहसवाद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर तालुक्याचे सुपुत्र हिरालाल सोनवणे यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाल्याबद्दल काळखेडा ग्रामस्थांनी त्यांचा नागरी सत्कार ठेवला होता. त्यामुळे ग्रामस्थांनी साहजिकच या तालुक्याचे नेते आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते हा सत्कार होणे उचित समजले. कार्यक्रम राजकारणविरहित असल्यामुळे गावकऱ्यांनी दुसरे पाहुणे राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांना निमंत्रित केले होते. जैन हे देखील जामनेरचेच. काळखेडा ग्रामस्थांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून या दोन्ही नेत्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली आणि आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र हिरालाल सोनवणे यांचा सत्कार केला. सोनवणे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नोकरी मिळवली आणि शासनाच्या विविध विभागात आपल्या कामाचा ठसा उमटवला. भारतीय प्रशासकीय सेवेत त्यांची निवड होणे ही जामनेर तालुकावासीयांच्या दृष्टीने गौरवाची आणि अभिमानाची बाब असल्याचा उल्लेख या दोन्ही नेत्यांनी आपल्या भाषणातून केला. जामनेरच्या ज्या सुपारी बागेत जळगाव जिल्ह्याचे राजकारण मधल्या काळात शिजवले आणि घडवले जात होते. त्या सुपारी बागेला परिचित दोन दिग्गज राजकारणी एकाच व्यासपीठावर आल्यानंतर राजकीय भाषणबाजी होणारच. ईश्वरलाल जैन म्हणाले, मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पक्षाने जबाबदारी सोपवली आणि ते निवडणूक हरले असे अजून झाले नाही. त्यांनी जिंकत राहावे, त्यांना माझा आशीर्वाद आहे. त्यांनी आता मुख्यमंत्री व्हावे, असेही जैन म्हणाले. जैन यांच्याच भाषणाचा मुद्दा पुढे नेत मंत्री महाजन म्हणाले की, होय मी ईश्वरलाल जैन यांचा मानसपुत्र असून त्यांचा मला आशीर्वाद आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील सर्वच निवडणुका मी जिंकल्या आहेत. मी खरोखर सिद्धहस्त राजकारणी आहे. पक्षाने जबाबदारी सोपवली तर मी बारामतीही जिंकून दाखवेन, असे आव्हानही त्यांनी दस्तुरखुद शरद पवारांना दिले आहे. ईश्वरलाल जैन हे पवारांच्या जवळचे आहेत. शरद पवारांनीच त्यांना राज्यसभेचे खासदार केले होते, हे गिरीश महाजनांना चांगले ठाऊक आहे. त्यामुळे पवारांपर्यंत संदेश पोहाेचवायचा असेल तर हीच चांगली संधी आहे, असे महाजनांना वाटले असावे. विशेष म्हणजे, बारामतीकरांना आव्हान देत असताना त्यांनी आपल्याला मुख्यमंत्रिपदाचा मोह नसल्याचे स्पष्ट केले आणि हे म्हणत असताना मुख्यमंत्रिपदाचा मोह ठेवणाऱ्यांचे काय झाले? असेही ते म्हणाले. त्यांनी कुणाचे नाव घेतले नाही, पण इशारा खडसेंकडे होता. हे लोकांना कळून चुकले. 

 

आगामी लोकसभा असो की विधानसभा निवडणूक राज्यात बदलासाठी घडामोडी या हाेणारच आहेत. जसजसे निवडणुकांचे नगारे वाजू लागतील, तसे राजकीय भक्त इकडून तिकडे उड्या मारतील. एकनाथ खडसेंच्या नाराजीमुळे खान्देशात भाजपची पिछेहाट होऊ शकते. यासाठी खडसेंना काँग्रेस, राष्ट्रवादीकडून पक्षात येण्याचे खुले आवाहन केले जात आहे. खडसे अजून भाजपतच असले तरी ते कोणत्या पक्षात जातील आणि त्याचा कुठे, कसा परिणाम होऊ शकतो, याचे राजकीय आडाखे देखील बांधले जात आहेत. खडसेंना बळ देण्यात आणि त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची पाठराखण करण्यात पवार फॅमिली नेहमीच पुढे राहिली आहे. त्यामुळेच महाजन यांनी बारामतीही जिंकून दाखवू, असे आव्हान थेट शरद पवारांना दिले आहे. महाजन यांनी आतापर्यंत पक्षाने त्यांच्या नेतृत्वाखाली पालघर लोकसभा आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्व महापालिकेच्या निवडणुका जिंकल्या आहेत. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. महाजनांनी अनेक निवडणुका भाजपला जिंकून दिल्या आहेत. पण बहुतांशी उमेदवार अन्य पक्षातून आयात केले आहेत. निवडणुका जिंकण्याची ही त्यांची नीती राहिली आहे. महाजनांच्या वक्तव्यानंतर हाच मुद्दा जनसामान्यात प्रचंड चर्चिला जात आहे. 

 

महाजन बारामतीतही कमळ फुलवू शकतील, पण त्यांना आधी पवारांना पक्षात आणावे लागेल, असा चर्चेचा सारीपाटही राजकीय पटलावर रंगला आहे. निवडणुका जिंकल्यामुळे महाजनांचा आत्मविश्वास दुणावणे स्वाभाविक आहे. थेट बारामतीला आव्हान म्हणजे ओव्हर काॅन्फिडन्स तर नाही ना? असे सामान्यांपासून राजकीय विश्लेषकांना वाटत आहे. अर्थात, निवडणुकीत कोणाचे केव्हाही पानिपत होऊ शकते. त्यामुळे बारामती जिंकणे अवघड नाही, पण तशी लाट किंवा परिस्थिती हवी असते. देशातील पाच राज्यांच्या निवडणुका भाजप विरोधात गेल्या आहेत. चार महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. भाजपात उड्या मारू पाहणारे थांबून गेले आहेत. गेलेले परतीच्या मार्गावर आहेत. निवडणुकीपूर्वी आलेलेे सर्व्हे हे भाजपविरोधी जात आहेत. त्यामुळे महाजनांचा दुणावलेला आत्मविश्वास थेट बारामतीला आव्हान देत असेल तर तो त्यांचा अतिआत्मविश्वास किंवा वाढलेल्या महत्त्वाकांक्षेचा सूर म्हटला पाहिजे. 

 

बातम्या आणखी आहेत...