आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'प्रिन्स' घरोघरी, 'जोतिबां'चा शोध जारी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरजातीय विवाहातून होणाऱ्या हत्यांच्या बाबतीत जरा सूक्ष्म निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येईल की असा विवाह करणारी मुलगी जर तथाकथित उच्च जातीतील असेल तर या हिंसाचाराची तीव्रता जास्त असते. घराण्याची तथाकथित इज्जत वाचवण्याची जबाबदारी ही मुलींनीच चालवायची ही बुरसटलेली मानसिकता यामागे दिसून येते. 

 

काही दिवसांपूर्वी बीड शहरात भर वस्तीत सुमीत वाघमारे या इंजिनिअरिंगला शिकणाऱ्या तरुणाचा त्याची पत्नी भाग्यश्रीच्या समोर खून करण्यात आला. भाग्यश्रीचा भाऊ बालाजी लांडगे आणि त्याचा मित्र संकेत वाघ यांनी बहिणीने जातीच्या बाहेर लग्न केले याचा राग मनात धरून सुमीतचा धारदार शस्त्राने वार करून खून केला. ही बातमी वाचून मनाचा तळ ढवळून निघाला आणि 'सैराट' चित्रपटाचा शेवट आठवला. 'सैराट'मध्ये शेवटाला 'आर्ची' आणि 'परशा'चा खून करणारा 'प्रिन्स' हा आर्चीचा भाऊ आणि त्याने केलेले कृत्य दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी अतिरंजित दाखवले आहे, असे सूर त्या वेळी उमटले होते. बीडमधील सुमीत वाघमारेच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर 'सैराट'मधील शेवट हा काल्पनिक नसून आपल्या आजूबाजूलादेखील अनेक असेच हिंस्र प्रवृत्तीचे प्रिन्स राजरोस वावरत आहेत हे अवस्थ करणारे वास्तव पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. 


अधिक खेदाची गोष्ट ही आहे की, सुमीत वाघमारेसारख्या घटना या आता दुर्मिळ राहिलेल्या नाहीत. आंतरजातीय विवाहातून होणारी हिंसा ही जणू आपल्या दैनंदिन जगण्यातील एक भाग म्हणून आपण स्वीकारल्यासारखी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. ज्या राज्यात जोतिबा फुले नामक द्रष्ट्या पुरुषाने स्वत:च्या कुटुंबाचा आणि सर्व समाजाचा रोष पत्करून स्वत:च्या पत्नीला सावित्रीबाईला शिक्षणाची दारे खुली करून दिली, त्याच महाराष्ट्रातील पुरुष हे या 'सैराट'च्या प्रिन्ससारख्या मानसिकतेत अजून का अडकून पडले आहेत आणि त्यामधून बाहेर पडण्यासाठी काय करायला पाहिजे हे म्हणूनच समजून घेणे आवश्यक आहे. आंतरजातीय लग्नाच्या रागातून झालेल्या हिंसक घटना आपण तपासून बघितल्या तर जातींमध्ये मानली गेलेली उच्च-कनिष्ठ वर्गवारी आणि त्यामुळे घरात कोणी आंतरजातीय विवाह केला तर आपल्या घराण्याचे नाक कापले गेले ही भावना यामागे आहे हे तर अगदी खरेच आहे. त्यामध्ये मुलीला आपली संपत्ती मानण्याची खोलवर दडलेली प्रवृत्तीदेखील आहे. आंतरजातीय विवाहातून होणाऱ्या हत्यांच्या बाबतीत जरा सूक्ष्म निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येईल की असा विवाह करणारी मुलगी जर तथाकथित उच्च जातीतील असेल तर या हिंसाचाराची तीव्रता जास्त असते. घराण्याची तथाकथित इज्जत वाचवण्याची जबाबदारी ही मुलींनीच चालवायची ही बुरसटलेली मानसिकता यामागे दिसून येते. खासकरून वडील, चुलते, भाऊ असे पुरुष या हिंसेत मोठ्या प्रमाणात सहभागी असतात. आपल्या बहिणीवरील किंवा मुलीवरील त्यांचे प्रेम या वेळी कुठे जाते, असा एक नैसर्गिक प्रश्न यानिमित्ताने आपल्या मनात निर्माण होतो. याचे खरे उत्तर असे आहे की, समाजातील प्रतिष्ठा या गोष्टीचे आपल्याकडे इतके स्तोम माजवलेले आहे की, त्या प्रतिष्ठेच्या पुढे जवळचे नातेदेखील दुय्यम वाटण्याची मानसिकता तयार होते. शिवाय स्वत:च्या मुलीवर किंवा बहिणीवर असलेले प्रेम हे माणुसकीच्या आणि समानतेच्या भावनेतून आलेले नसून मालकी हक्काच्या भावनेतून आलेले असते. 'सैराट'मधील प्रिन्सच्या मानसिकतेचे तरुण हे अचानक निर्माण होत नसतात. अनेक पिढ्या अंगात मुरलेला जातीचा वृथा अभिमान आणि पुरुषप्रधानता यातून ते जन्माला येत असतात. खरे क्रौर्य तर याच्यापुढे येते. आपले म्हणणे आपल्या जवळच्या व्यक्तीने ऐकले नाही म्हणून त्या व्यक्तीचा राग येणे अथवा भांडण होणे हे आपण समजून घेऊ शकतो. अगदी टोकाचे मतभेद झाले तर आपापल्या वाटा वेगळ्या करून स्वतंत्र आयुष्य जगण्याचादेखील आपल्याला पर्याय असतो. अशा स्थितीत केवळ मतभेद आहेत म्हणून किंवा आपल्या कुळाची तथाकथित प्रतिष्ठा धुळीला मिळवली म्हणून दुसऱ्या व्यक्तीला ठार मारण्याचा अधिकार कोणालाही असू शकत नाही. 

 

आंतरजातीय लग्न होणे, नंतर त्यामधून निर्माण होणारे ताणतणाव आणि पुढे जाऊन अशा स्वरूपाची टोकाची घटना ही बहुतांश वेळा अचानक घडत नसते, त्या मागे कुटुंबात अनेक दिवस किंवा महिने चर्चा-विसंवाद चालू असतात. आंतरजातीय विवाह केला म्हणून खून करण्यापर्यंत आपल्या घरातील कोणाची तरी मानसिकता जाते आहे, हे कुटुंबातील बाकी व्यक्तींना अजिबात माहीत नसते यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. अनेक वेळा कुटुंबातील इतर सदस्यांचा छुपा पाठिंबा अशा कृत्याला असतो. पोलिस यंत्रणा आणि शासनदेखील अशा प्रकरणांमध्ये अनेक वेळा निष्क्रियतेची भूमिका घेतात. बीडमधील घटनेत पोलिस तक्रार होऊनदेखील सुमीतचा जीव वाचवण्यासाठी काहीही प्रयत्न झाले नाहीत हे वास्तव खूपच वेदनादायी आहे. 

 

जर आपल्या कुटुंबात असे 'सैराट' प्रिन्स नाही, तर सत्यशोधक जोतिबा जन्मायचे असतील तर आपल्याला अनेक पातळ्यांच्या वर प्रयत्न करायला हवेत. आंतरजातीय विवाह करण्याचा विचार असलेल्या तरुण-तरुणींना पाठबळ देणारी एक यंत्रणा तयार करणे हे त्यामधील अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन संस्था लातूर, वर्धा, सांगली, कोल्हापूर, सातारा अशा अनेक ठिकाणी स्वयंसेवी पद्धतीने आंतरजातीय/धर्मीय विवाह साहाय्यता केंद्र चालवते. माधव बावगे आणि दिलीप आरळीकर यांच्या पुढाकाराने सातशेपेक्षा अधिक आंतरजातीय/धार्मिक विवाहांना अंनिसने पाठबळ दिले आहे. शासनाने जर अशा स्वरूपाचे अांतरजातीय/धर्मीय विवाह साहाय्यता केंद्र प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुरू केले तर त्यामुळे असा विवाह करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींना मोठे पाठबळ मिळू शकते. आंतरजातीय/धर्मीय विवाह केल्यानंतर सुरुवातीचा काही काळ खंड हा नवीन दांपत्यासाठी अत्यंत खडतर असू शकतो. घराचा आधार सुटलेला असतो व स्वतःचे आयुष्य स्थिरस्थावर करण्यासाठी थोडा कालावधी जाणार असतो. 'डीस-ऑनर किलिंग'च्या नावाखाली कुटुंबाकडून धोकादेखील असतो. अशा परिस्थितीत या दांपत्याला निवारा उपलब्ध करून देणे हेदेखील शासनाचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. हरियाणा आणि पंजाबमध्ये 'डीस ऑनर किलिंग'च्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अशी निवारा केंद्रे शासनाने सुरू केली. या केंद्रांचा मोठा आधार आंतरजातीय विवाह करणाऱ्या दांपत्यांना आहे. महाराष्ट्र अंनिसच्या पुढाकाराने असेच एक निवारा केंद्र सातारा जिल्ह्यातील पिंपरी गावात सुरू केले आहे. शंकर कणसे या कार्यकर्त्याने त्यासाठी विनामोबदला जागा उपलब्ध करून दिली आहे. केंद्र सुरू झाल्या झाल्या तिथे मदत घेऊ इच्छिणाऱ्या लोकांचा ओघदेखील सुरू झाला आहे. शासन अशा स्वरूपाची निवारा केंद्रेही सुरू करू शकते. वातावरणातील तणाव निवळेपर्यंत आणि नवविवाहित दांपत्याला थोडी स्थिरता येईपर्यंत एक ते तीन महिने कालावधीत अशा ठिकाणी निवारा मिळाला तर पुढचे आयुष्य किती तरी अधिक सुरळीत होऊ शकते. 

 

आपल्या कुटुंबात प्रेम आणि आकर्षण, यापुढे जाऊन जोडीदाराची निवड त्याविषयी मुलांना असलेला अधिकार तसेच आंतरजातीय विवाह याविषयी चर्चा सुरू होणेही खूप महत्त्वाचे आहे. अशा तरुण-तरुणींना आपण सहकार्य करू शकलो तर उत्तमच, पण ते नाही जमले तरी त्यांना त्यांचे आयुष्य स्वतंत्रपणे जगण्याचा असलेला अधिकार तरी आपण मान्य केला पाहिजे. अशा वेळी आपल्या जवळच्या परिघातील कोणी हिंसक कृती करण्याचा विचार करत असेल तर त्यामध्ये कृतिशील हस्तक्षेप करून ती हिंसक कृती होण्याआधी थांबवली पाहिजे. आंतरजातीय विवाहांच्या पार्श्वभूमीवर आपण गांभीर्याने विचार करून कृतिशील झालो तरच भविष्यात सुमीतसारख्या अनेक तरुणांचे जीव आपण वाचवू शकू.