आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिले मायावती-अखिलेश (अग्रलेख) 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

१९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर केंद्रातील नरसिंह राव सरकारने उत्तर प्रदेशातील कल्याणसिंह सरकार बरखास्त केले होते आणि त्याच काळात मंडल-कमंडलू राजकारणातून मुलायमसिंह यादव यांनी समाजवादी पार्टीची स्थापना करत राज्यातली भाजपची शक्ती जोखत कांशीराम यांच्या बहुजन समाज पार्टीशी युती केली होती. या युतीची 'मिले मुलायम कांशीराम, हवा हो गए जय श्रीराम', ही निवडणूक प्रचारातील घोषणा अत्यंत लोकप्रिय ठरली होती. या घोषणेमुळे उत्तर प्रदेशातील यादव, दलित व मुस्लिम असा संख्येने मोठा मतदार भाजपच्या विरोधात गेला, राममंदिराची हवा विरली आणि मुलायमसिंह मुख्यमंत्री झाले. ही युती दोन वर्षे टिकली, पण भाजपच्या कडव्या हिंदुत्वाला रोखण्यासाठी हिंदूंमधील अनेक मागास, अतिमागास जाती, मुस्लिमांची मोट बांधता येते हे दिसून आले. आता बरोबर २४ वर्षांनी उत्तर प्रदेशात अखिलेश यादव व मायावती भाजपला रोखण्यासाठी एकत्र आले आहेत. या दोघांपुढे पुन्हा भाजपचेच कडवे आव्हान आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुका व २०१७ च्या विधानसभा निवडणुकांत भाजपला या राज्याने घवघवीत यश मिळवून दिले. त्याची पुनरावृत्ती यंदाच्या लोकसभा निवडणुकांत होणार नाही, असे निवडणूक शास्त्र अभ्यासून व विविध जातीय समीकरणे मांडत हे दोन नेते शड्डू ठोकून मैदानात उतरले आहेत. ९० च्या दशकात कांशीराम व मुलायमसिंह मैदानात उतरले तेव्हा राममंदिर हा उत्तर प्रदेशातील प्रमुख मुद्दा होता, आता दोन दशकांनंतरही तोच मुद्दा आहे. पण मंदिराला 'विकासा'ची साथ आहे, मोदी यांचा काहीसा शिल्लक असलेला करिश्मा आहे. योगी आदित्यनाथ यांचे कट्टर हिंदुत्वही आहे. या बदललेल्या राजकीय नेपथ्यात बसपा, सपा एकत्र येणे हा काही राजकीय योगायोग नाही. दोघांनी हिंदुत्व रोखण्यासाठी आपल्या कट्टर मतदारांना गृहीत धरत आपल्या विचारांशी राजकीय तडजोड केलेली आहे. वास्तविक गेली २० वर्षे दोन्ही पक्षांमधून विस्तव जात नव्हता, दोघांनी विविध जाती वाटून घेतल्या, त्यातून दोन्ही पक्षांचे प्रचंड केडर तयार झाले. बसपाने देशभर पायही पसरले, पण २०१४ च्या लोकसभा निवडणुका व पुढच्या तीन वर्षांनी झालेल्या विधानसभा निवडणुकांत सपाबरोबर मायावतींनाही जबर फटका बसला. उत्तर प्रदेशातले राजकीय नेपथ्य भगवे झाले होते. या दोन्ही निवडणुकांतून मोदी-शहा-योगींनी उ. प्रदेशातील सर्व जातीय समीकरणे उद्ध्वस्त करून टाकली. त्यांना मिळालेले नेत्रदीपक यश हे जसे अनपेक्षितच होते तसे उ. प्रदेशात मुस्लिम वगळून वेगळा हिंदू जातीय फॉर्म्युला भाजप आणू शकला हेही महत्त्वाचे ठरले. त्यामुळे पराभवातून आलेले शहाणपण ओळखून मायावती-अखिलेश या दोघांनी आपापसातील रुसवे-फुगवे मिटवून एकत्र येण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या नव्या युतीत या दोघांनी काँग्रेसला दोन जागा सोडून चार हात लांब ठेवण्याची एक चलाख पण धाडसी रणनीती केली आहे. ती रास्त आहे. कारण उत्तर प्रदेशात काहीच शक्ती नसलेल्या काँग्रेसशी युती करणे, त्यांच्यासाठी किमान काही जागा देणे म्हणजे आपल्याच जागा गमावण्यासारखे असे या दोघांना वाटणे साहजिकच आहे.
 
१९९६, २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकांत काँग्रेससोबत युती केल्याने या दोन्ही पक्षांना काहीच फायदा झाला नाही. म्हणून काँग्रेसनेही फारशी कुरकुर न करता राज्यातील लोकसभेच्या ८० जागा स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर करून आपली वाट मोकळी केली. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला २१ जागा मिळाल्या असल्या तरी गेली १० वर्षे त्यांची मतांची टक्केवारी व जागा घसरत आहेत. त्यांनी आपली शक्ती जोखत भाजपला रोखणाऱ्या विविध राजकीय पक्षांशी हात मिळवण्याची तयारी दाखवली आहे. पण काँग्रेससोबत कोण जाणार हाही एक प्रश्नच आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसला असे एकटे टाकल्याने या पक्षाला स्वत:ची एक जातीय रणनीती आखावी लागेल व त्याने राज्यात एक नवा अक्ष तयार होईल असे दिसते. या राजकीय घडामोडीने केंद्रातील संभाव्य यूपीए-३ आघाडीचे भविष्य दोलायमान झाले आहे, हे स्पष्ट दिसून येते. जर उत्तर प्रदेशमध्ये हे दोन्ही पक्ष काँग्रेसला मोजत नसतील तर यूपीए-३ आघाडीचे सारथ्य करणाऱ्या काँग्रेसशी त्यांचे राष्ट्रीय पातळीवर सख्य राहील याची खात्री नाही. मायावतींनी सपाबरोबरची आपली युती तात्पुरती नसून प्रदीर्घ काळापर्यंत राहील असेही म्हटले आहे. हे विधान इतिहासात कोरून ठेवावे लागेल. एवढा विश्वास दोघांनी एकमेकांवर दाखवणे हे बुचकळ्यात टाकणारे आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...