आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खिळखिळी एनडीए! (अग्रलेख)

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संसदेत भाजपने सर्व विरोधकांना पेचात पकडत सवर्ण आरक्षण विधेयक मंजूर केले असले तरी अनेक प्रादेशिक मुद्द्यांवर भाजपचे जवळपास सर्वच सहकारी पक्ष प्रचंड नाराज आहेत. भाजपचा अत्यंत जुना स्नेही नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाने मोदी सरकारच्या कृषी धोरणामुळे भ्रमनिरास झाल्याची तक्रार करत एनडीएशी काडीमोड घेण्याचा अनपेक्षित असा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन पटनायक भाजपशी युती करतील वा जागावाटपात स्वत:चा दबाव ठेवतील असे वाटत होते, त्यांनी काँग्रेससोबतही जाणार नसल्याचे जाहीर केले. पटनायक यांनी थेट एनडीए आघाडीत आमचा पक्ष सामील होणारच नाही व स्वत:ची ओळख वेगळी आहे, असा पवित्रा घेतल्याने भाजपचे ओडिशात मुसंडी मारण्याचे स्वप्न भंगले. पटनायक यांना 'अँटी इन्कम्बन्सी' दिसत असल्याने त्यांनी एनडीएला रामराम केला, हे स्पष्ट आहे. एनडीएमध्ये असलेले अपना दल, लोकजनशक्ती पक्षासारख्या अगदीच चिटूर पक्षांनी मोदी-शहांच्या मनमानीविरोधात आवाज उठवल्याने जेडीयू, बीजेडीसारख्या राज्यात सत्ता असलेल्या पक्षांना स्वाभिमान आहे की नाही असे प्रश्न विचारले जात होते. (शिवसेनेचा स्वाभिमान फक्त भाषणापुरता आहे) अखेर आम्ही स्वाभिमानी आहोत हे दाखवण्यासाठी त्यांना एनडीएशी काडीमोड घ्यावा लागला. असाच पवित्रा आसाम व ईशान्य राज्यातील भाजपच्या अनेक मित्रपक्षांनी घेतला आहे. काही महिन्यांपर्यंत ईशान्य भारत पूर्णपणे आपल्या ताब्यात असल्याच्या आविर्भावात मोदी सरकार वागत होते. ईशान्य भारतात संघ परिवाराच्या अनेक संघटना अनेक वर्षे सामाजिक कार्य, हिंदू धर्मप्रसार, कम्युनिस्टांच्या विरोधात लढत होत्या, त्यांच्या मेहनतीला आसाम, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश येथे राजकीय यश मिळाले होते. या आनंदाचे भाजपमध्ये इतके उधाण आले की, त्या भरात लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात मोदी सरकारने बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तानातील हिंदू निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देणारे विधेयक संमत करून घेतले. तो आनंद क्षणिकच ठरला. हे विधेयक संमत झाल्यानंतर काही तासांतच आसाम गण परिषदेने आसाममधील भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतला. आसाम गण परिषदेची ही प्रतिक्रिया पाहून मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा, जे भाजपचे मित्र आहेत त्यांनी आपला पक्ष भविष्यात भाजपपासून फारकत घेईल असे जाहीर केले. त्यानंतर त्रिपुरा, नागालँड, मिझोराम राज्यातील भाजपच्या मित्रपक्षांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मागे घ्यावे, त्यातील काही तरतुदी जाचक व स्थानिकांच्या रोजगार-अस्मितेवर घाला घालत असल्याचा आक्रोश केला. गंमत अशी की ईशान्येतील या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीअगोदर भाजपने ईशान्य भारत लोकशाही आघाडी स्थापन केली होती व काँग्रेसच्या विरोधातील सर्व छोट्या-मोठ्या ११ पक्षांना एकत्र आणून संपूर्ण ईशान्य भारतातून काँग्रेसला हुसकावून लावले होते. आता स्थानिकांच्या प्रश्नांची सांगड हिंदू-मुस्लिम राजकारणाशी लावून भाजपने आपला मूळ स्वभाव या मंडळींना दाखवल्याने हे पक्ष नाराज झाले आहेत. या सर्व पक्षांना बांगलादेशातील निर्वासित हिंदूंना भारतात प्रवेश देऊ नये असे वाटते. आसाम गण परिषदसारख्या प्रखर आसामी अस्मिता दाखवणाऱ्या पक्षाने बांगलादेशमधून घुसखोरी करणाऱ्या मुस्लिमच नव्हे, तर हिंदूंनाही विरोध करत ११ संघटनांच्या मदतीने परवा ईशान्य बंद पुकारला होता. केवळ पाच दिवसांपूर्वी मोदींनी सिल्चर दौऱ्यात एकही भारतीय एनआरसीच्या नोंदीतून सुटणार नाही, अशी वल्गना केली होती आणि त्यानंतर तीव्र प्रतिक्रिया बराकघाटीतील हिंदूंकडून उमटल्या होत्या. हा प्रदेश बांगलादेश सीमेच्या लगत असल्याने स्थानिकांना बांगलादेशातील हिंदू निर्वासितांमुळे आपली भाषा, जात व संस्कृतीवर आक्रमण होत असल्याची भीती वाटत आहे. एकुणात भाजपचा देशव्यापी हिंदू बहुसंख्याकत्वाचा मुद्दा हिंदू समाजातील काही वर्ग, जातीकडून नाकारला जात आहे. म्हणून लोकसभा निवडणुका जशा जवळ येत जातील तेव्हा देशातील सर्वच भागातील प्रादेशिक पक्षांना आपल्या अस्मिता आठवत जातील. 

 

या सगळ्या राजकीय घडामोडींत एनडीएतील सर्वात मोठा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेला स्वत:चा असा सूर, स्वाभिमान, अस्मिता सापडलेली दिसत नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रोज भाजप, मोदी-शहांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. पण सत्तेतून बाहेर पडण्याची धमक ते दाखवू शकलेले नाहीत. धारूर तालुक्यातील अंजनडाेहच्या एका शेतकऱ्याची तीन तासांत कर्जमाफी करण्याची किमया त्यांनी करून दाखवली. असा चमत्कार त्यांनी सत्तेतून बाहेर पडून दाखवला असता तर त्याचा फायदा समस्त शेतकरी वर्गाला झाला असता. मात्र सत्तेचा मलिदा लाटत रोज भाषणबाजी करण्यातच शिवसेना समाधानी असल्याचे दिसते, तर दुसऱ्या बाजूला एकुणातच एनडीए खिळखिळी होत चालल्याची लक्षणे स्पष्ट हाेत आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...