आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एन्काऊंटर टायगर - रसिक स्पेशल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहुसंख्याकवादी, आत्ममग्न व्यवस्था सत्तेच्या लोभाने बेधुंद झाली की माणूस काय, पाळीव जनावर काय आणि वन्यप्राणी काय... या सगळ्यांमध्ये कसलाच फरक करेनाशी होते. माणूस असेल तर त्याचा धर्म पाहून आधी त्याला दहशतवादी ठरवले जाते, मग त्याचा एन्काउंटर केला जातो. हाच प्रघात आता वाघ, बिबट्यांसारख्या वन्यप्राण्यांबाबतीतही पाळला जाताना दिसतो आहे. जणू हा वाघ किंवा बिबट्या आपल्या धर्मावर, आपल्या अस्तित्वावरच हल्ला करणार, असा कांगावा करून ‘शूट अॅट साइट’चे आदेश वनखात्याकडून सुटले आहेत. हे आदेश माणसांच्या ‘जंगला’त आणि जंगलातल्या ‘माणसां’मध्ये एकाच वेळी उत्पात घडवणारे आहेत... 


यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यातल्या ‘टी १’ नावाच्या वाघिणीमुळे बातम्यांमध्ये सध्या खूपच धुरळा उडाला आहे. वनखात्याचे, टिपेश्वरजवळील सामान्य नागरिकांचे आणि शेतकऱ्यांचे किंवा तिथल्या गुराख्यांचे असे म्हणणे आहे, की तिथल्या जंगलामध्ये किंवा पांढरकवडा, वेदशी आणि इतर आजूबाजूच्या प्रदेशात जी माणसे किंवा गुरे मरत आहेत ते सर्व ‘टी १’ वाघीणच मारते आहे आणि वाघीण एवढी हुशार आहे, की ती माणसांना मारून त्यांचे शरीर ५० ते ६० टक्के खाऊन पळून जात आहे. जणू हा कोणी गोतस्करच आहे...


गेल्या जानेवारीपासून म्हणजेच २०१८च्या जानेवारी महिन्यापासून १३ लोकांचे या ‘टी १’ वाघिणीने प्राण घेतले, असा दावा पांढरकवडा आणि वेदशीच्या लोकांनी केल्यामुळे आणि लोक आक्रमक झाल्यामुळे तिथे वनखात्याने या वाघिणीला आधी पकडण्यासाठी आणि नंतर ती वाघीण ताब्यात येत नाही, म्हणून ‘शूट अॅट साइट’चे आदेश दिले आहेत.  जणू हा कुणी दहशतवादीच आहे...


महाराष्ट्र वनखात्याचे मुख्य वन संरक्षक,अपर मुख्य वन संरक्षक आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ६० वन खात्याचे गार्ड््स, इतर रेस्क्यू टीम तसेच वाघिणीला शोधण्यासाठी दोन हत्ती आणि गेल्या काही दिवसात कार्नो जातीचे हंटिंग कुत्रे अशी भली मोठी टीम तिथे जाऊन पोहोचली आहे. जणू हा कोणी पाकिस्तानातून समुद्रमार्गे आलेला फिदायीन आहे...


या टीममधल्या दोन हत्तींमधला एक हत्ती उधळल्यामुळे एका बाईचा मृत्यू ओढवला आहे. त्यामुळे हत्ती पुन्हा माघारी पाठवण्यात आले आहेत.   आता पॅराग्लायडरमार्फत शोध घेणे  सुरू आहे. मधल्या काळात या वाघिणीला मारू नये, म्हणून काही वन्यजीव संस्थांनी न्यायालयातही धाव घेतली, परंतु आता न्यायालयानेही आदेश दिले आहेत की, या वाघिणीला पकडा किंवा ठार मारा. 


हे सर्व सुरु असताना जे १३ मृत्यू झाले ते का झाले, त्याची पार्श्वभूमी किंवा ते कसे झाले आणि ते खरेच या वाघिणीने मारल्यामुळे झाले का हे मात्र कोणीच तपासून बघत नाही आहे. किंवा वन खात्याकडे किंवा पांढरकवड्याच्या जनतेकडे कुठलेच याबाबतचे पुरावे नाही आहेत. किंवा याच वाघिणीने मारले, यासाठी ज्या मेलेल्यांचे मृतदेह होते त्याचे आणि तिथे आढळलेल्या अवशेषांचे कुठल्याही प्रकारे डीएनए टेस्टिंग झालेले नाही किंवा करण्यात आलेले नाही. किंवा वन खात्याच्या म्हणण्यानुसार पांढरकवडा आणि तिथल्या ७० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ भागात ८० कॅमेरा ट्रॅप बसवण्यात आलेत, त्यातही कुठेही या वाघिणीच्या अस्तित्वाचे पुरावेही मिळालेले नाहीत, तरीही वन खाते आणि पंढरकवड्याची जनता या टी१ वाघिणीला "नरभक्षक' घोषित करून बसली आहे...


आता या नरभक्षक वाघिणीला हरप्रकारे मारण्यासाठी जीवतोड प्रयत्न सुरु झाले आहेत. परंतु  या वाघिणीला १० महिन्यांचे २ बछडे आहेत आणि जर या वाघिणीला मारले तर ते उघड्यावर येतील, ते जगण्याची शक्यता मावळेल, या वन्यजीव संवर्धनाशी निगडित वास्तवाकडे वनखाते सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत आहे. शिवाय गेल्या ५ ते ६ वर्षांमध्ये आपल्याकडे "सेव्ह टायगर’ ही मोहीम राबवण्यात येत आहे. हे सर्व असताना मग महाराष्ट्रातील वनखाते टी १ वाघिणीला मारण्यासाठी एवढे आतुर का आहे?


वस्तुत: माणूस आणि वन्यप्राणी यांच्यामधील संघर्ष हा नित्याचाच झालेला आहे. त्यातही वाघ किंवा बिबटे आणि माणूस यांच्यातील संघर्ष मुंबईसारख्या शहरात टीपेला पोहोचलाय.या संघर्षात सगळ्यांत मोठा दोषी आहे, तो माणूस.  कारण, माणूस हा वाघ आणि बिबट्यांच्या अधिवासावर आक्रमण करू लागलाय. तो जंगलांवर किंवा नैसर्गिक अधिवासांवर आक्रमण करून तिथे घरे बांधू लागलाय.  माणूस जंगलाच्या हद्दीत शिरत असल्यामुळे घाबरून स्वसंरक्षणासाठी वन्य प्राणी माणसांवर हल्ले करताना आढ‌ळताहेत. 


तर  अनेकदा शेतकरी किंवा गावाकडची माणसे  आपली भाकड जनावरे जंगलांमध्ये सोडून देताना दिसताहेत. यात त्यांचा सुप्त हेतू हा असतो, की आपल्या या भाकड जनावरांना वाघाने मारावे, म्हणजे त्यातून वन खात्याकडून नुकसान भरपाई वसूल करता यावी. अनेकदा नाईलाजाने का होईना, वनखात्याला या अशा संधिसाधू लोकांना नुकसान भरपाईच्या नावाखाली १० ते १५ लाख रुपये द्यावे लागताहेत.


गेल्या दोन वर्षांचा विचार केला तर विदर्भ आणि मराठवाड्यात किंवा एकंदरच  महाराष्ट्रात जिथे जिथे वाघासाठी संरक्षित अधिवास आहेत, तिथल्या वाघाच्या मृत्यूचे प्रमाण पहिले तर आपल्याला लक्षात येईल की, या काळात जवळपास ४० ते ५० वाघ मरण पावले आहेत.   बरेचदा वाघाच्या कातडीच्या किंवा वाघाच्या शरीराच्या विविध अवयवांच्या तस्करीसाठी बळी घेतला जात आहे.  आता ‘टी १’ वाघिणीला मारण्याची जी इव्हेंट होय, इव्हेंट राबवण्यात येतेय, त्यामागचे हेतू फक्त त्या वाघिणीला मारून लोकांचे संरक्षण करणे एवढेच आहेत, की आणखीन काय आहेत, हे शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. 


 कारण, बऱ्याचदा वाघ नरभक्षक झालाय, असा ओरडा करणारे लोक हे एवढे साळसूद आणि संधिसाधू असतात, की ते त्या नरभक्षक म्हणून जाहीर केलेल्या वाघाची अगदी व्यवस्थित लपून छापून शिकार करतात आणि त्याचे कातडे किंवा इतर भाग हे लपून छापून विकतात, हा आजवरचा अनुभव आहे. संधिसाधूपणे वन खातेही तो वाघ नाहीसा झाला आणि आता त्या वाघाचेकाहीच अस्तित्व नाही हे सोयीस्कररीत्या जाहीर करून मोकळे होते. प्रसिद्ध “जय’ नावाच्या वाघांच्या बाबतही हेच झाल्याचे दिसून येते.
 
इथे उदाहरणच द्यायचे झाले, तर राजस्थानातील रणथंभोरमधील “उस्ताद” नावाच्या वाघाचे देता येईल. उस्तादबाबतही असेच काहीही पुरावे नसताना धुरळा उडवला गेला होता,  ज्यांची हत्या झाली ती माणसे अनधिकृतरित्या जंगलात घुसली होती आणि अचानकपणे ‘उस्ताद’च्या समोर आल्यामुळे त्यांच्यावर हल्ले झाले होते. हे असे असतानाही ‘उस्ताद’ला जेरबंद करण्यात आले आणि त उदयपूरच्या प्राणीसंग्रहालयात एका दहा बाय  दहाच्या छोट्याशा खोलीत बंदिस्त करण्यात आले. आता तो तिथल्या गैरव्यवस्थेमुळे मरणपंथाला लागला आहे. ही व अशीच अनेक उदाहरणे असूनही “टी १ वाघिणीने’ माणसांना मारल्याचे किंवा त्यांच्यावर हल्ला केल्याचे कुठलेही पुरावे नसताना तिला नरभक्षक घोषित करून “शूट अॅट साइट’चे आदेश देऊन, त्यासाठी भलीमोठी “इव्हेंट’ राबवून या “इवेन्टवर’ कोट्यवधी रुपये खर्च करून वनखाते नेमके काय सिद्ध करू पाहत आहे ?


वनखात्याला या सर्व प्रकरणाचा व्यवस्थित आणि सारासार अभ्यास करणे आणि तेही वनखात्याच्या नि:पक्ष अधिकाऱ्यांकडून किंवा प्रतिष्ठित वन्यजीव अभ्यासकांकडून सहज शक्य आहे. शिवाय या वाघिणीला नरभक्षक घोषित करून  “शूट अॅट  साइट’चा आदेश देताना प्रोटोकॉलही पायदळी तुडवला जात आहे. खरेतर अशाप्रकारे एखादा वाघ वागतो, तेव्हा त्याला खरेतर भूल देऊन त्याची रवानगी एखाद्या प्राणीसंग्रहालयात करावी असा प्रोटोकॉल आहे, परंतु महाराष्ट्रातील वनखाते आणि त्याचे प्रसिद्धीला चटावलेले अधिकारी या वाघिणीला माराच, असा अध्यादेश काढून मोकळे झालेले आहेत.


हे सर्व बघितल्यावर एक लक्षात येते की ‘सेव्ह टायगर’ या मोहिमेचे किंवा वाघ वाचावा आणि आपले जंगल, आपले पर्यावरण वाचावे याचे सोयरसुतक कोणालाच नाहीय, जो तो प्रसिद्धीला चटावलेला आहे. या मोहिमेतून जो पैसा मिळणार आहे, त्यातून आपले कसे भले करून घेता येईल याच्यामागे प्रत्येकजण लागला आहे... शेवटी या जंगलच्या राजाबाबत एवढंच म्हणावेसे वाटते की “लेट लिव्ह दी टायगर... गॉड ब्लेस टायगर...’!


गॉड ब्लेस एशियाटिक लायन...
गेल्या काही दिवसांमध्ये गुजरातमधल्या प्रसिद्ध गिर राष्ट्रीय उद्यानामध्ये २३ सिंहांचा "मृत्यू" झाल्याचे आढळून आले. या २३ सिंहांच्या मृत्यूनंतर तिथल्या वनाधिकाऱ्यांनी यातल्या ११ सिंहांचा आपापसातल्या भांडणामुळे मृत्यू झाल्याचे जाहीर केले, तर इतर सिंहांचा मृत्यू हा एका विशिष्ट प्रोटोझोल विषाणूंमुळे झाल्याचे जाहीर केेले. या प्रकारच्या विषाणूंमुळे इथले आणखीन ३६ सिंहही आजारी असल्याचेही सांगितले. आता या सिंहांची रवानगी गिरमधल्याच वन्यप्राणी इस्पितळात करण्यात आली आहे. अमेरिकेतून  मागवलेली एक विशिष्ट प्रकारची लस  आजारी सिंहांना देण्यात आली आहे. गिरमधले सिंह हे गुजरात सरकारसाठी प्रतिष्ठेचा विषय आहेत. मोदी मुख्यमंत्री असताना तर हा विषय अधिकच  प्रतिष्ठेचा करण्यात आला होता. त्याचपायी  अमिताभ बच्चनसारख्या प्रथितयश "सेवाभावी' कलाकाराला घेऊन गिरचे मार्केटिंग करण्यात आले.  प्रत्यक्षात गिरमधले सिंह  गेली अनेक वर्ष मरगळलेल्या अवस्थेमध्ये आहेत. बरेचदा फॉरेस्ट गार्ड््स किंवा रेंजर्स याच सिंहांना लाथा बुक्के मारून आणि बाबूंनी टोचून पर्यटकांसमोर आणून बसवताहेत. वन्यजीव संशोधकांनी आणि अभ्यासकांनी यामागचे वास्तव शोधायचा प्रयत्न केला तेव्हा तर असे आढळून आले, की या सिंहांना पर्यटकांसमोर आणण्यासाठी खूप जास्त प्रमाणात भूल दिली जातेय आणि त्याचाच परिणाम म्हणून हे सिंह मरगळलेल्या अवस्थेत दिसून येताहेत... बरेचदा तर असेही घडते की गिरच्या आजूबाजूच्या गावातली गुरे चरण्यासाठी आजूबाजूच्या गावातील रहिवासी त्यांना गिरच्या जंगलात सोडून देतात.  असेही होते की विष टाकून मारलेल्या बकऱ्या किंवा कोंबड्या या सिंहांना खायला घालून सिंहांची हत्या केली जाते. 


हे सर्व प्रकार होऊनही गुजरात सरकार किंवा गीरमधल्या वनखात्याने ठोस उपाययोजना राबलेल्या नाहीत. गीरचे जंगल हा एशियाटिक लायन्सचा नैसर्गिक अधिवास म्हणून अयोग्य असल्यामुळे इथल्या ५२५ सिंहांना मध्यप्रदेशातील “पालपूशो’ या सिंहांसाठी आणि त्यांच्या जगण्यासाठी योग्य असलेल्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय अलीकडे भारत सरकारच्या वन्यजीव बोर्डामध्ये घेण्यात आला, परंतु गुजरातची शान किंवा अस्मिता म्हणून आणि व्यक्तिगत प्रतिष्ठेचा प्रश्न करून मोदी यांनी आजवर या सिंहांना हलवण्याची परवानगी दिलेली नाही.  गीरमधील वनखाते ज्या विशिष्ट विषाणूंमुळे गिरमधले सिंह मेलेत, असे सांगतंय, त्या विषाणूंची लागण टांझानिया मधल्या “सेरेंगेटी’ मधल्या सिंहांना होऊन तिथले एक हजार सिंह मरण पावल्याची घटना गेल्या काही वर्षांपूर्वी घडली होती. परंतु तज्ज्ञांच्या मते,  हे  “प्रोटोझोल इन्फेक्शन’ आपल्या भारतात आढळून येत नाही.  ते केवळ आफ्रिकेतच आढळून येते. अशा वेळी सिंहांच्या मृत्युचे प्रकरण संशयाच्या धुक्यांनी घेरलेले असताना, राजकारण्यांनी किंवा वनखात्याने आपली खोटी प्रतिष्ठा किंवा खोटी शान व अस्मिता सोडून देऊन जंगलाच्या या खऱ्या राजाला गांभीर्याने वाचवायला हवे. “एशियाटिक लायन’ ना मध्यप्रदेशातील “पालपूशो’ इथे स्थलांतरित करायला हवे. तसे घडले कदाचित या सिंहांना  मोकळा श्वास घेता येईल. पर्यायाने वनसंपदेचे आणि माणसाचेही रक्षण होईल...

 

लेखकाचा संपर्क - ९६१९७५२१११
(लेखक वन्यजीव अभ्यासक व संशोधक आहेत.)

बातम्या आणखी आहेत...