आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर भारतीय नवनिर्माण (अग्रलेख)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे राजकारण, वक्तृत्व शैली तशी चिथावणीखोर स्वरूपाची. मराठी अस्मिता, मराठी माणसाचा दिल्लीकरांकडून होणारा सततचा अवमान, उत्तर भारतीयांचे मुंबईवरचे आक्रमण, रोजगारात मराठी माणसांची हेटाळणी अशा विषयांवर राज ठाकरे आक्रमकपणे, कुणाचाही मुलाहिजा न ठेवता थेट बोलतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची वक्तृत्व शैली, त्यांचा राजकीय रोखठोकपणा त्यांनी उचलला आहे, असे पूर्वी म्हटले जात असे. आता मात्र तसे बोलले जात नाही. राज ठाकरे यांचे स्वत:चे संकुचित, मर्यादित असे राजकारण आहे. त्यात मराठी अस्मितेचा मुद्दा आहेच; पण जोडीला रोजगार, नवनिर्माण व विकासाची भाषा असते. राज ठाकरे अजून आक्रमक हिंदुत्वाच्या वाटेवर गेलेले नाहीत आणि ते मवाळ हिंदुत्व मानणारे सुद्धा नाहीत. जातीय अस्मिता व कडवं हिंदुत्व याच्या पलिकडे जाऊन ते अनेकदा बोलतात. रविवारी उत्तर भारतीय महापंचायतीच्या मंचावर राज ठाकरे यांचे हिंदीमधील भाषण राज यांच्या स्वभावाला साजेसे वाटले नसले तरी ते त्यांच्या भूमिकेला साजेशे मात्र नक्की होते. उत्तर भारतीयांच्या लोंढ्यावर, उत्तर भारतीय नेत्यांवर ज्या आवेशात ते तुटून पडतात, ताे अावेश त्यांच्याच कार्यक्रमात अपेक्षितही नव्हता. मात्र, सभ्य आणि संयत भाषा शैलीत आपली भूमिका त्यांनी ठामपणे मांडली. ‘तुमच्या राज्यात रोजगार नाही, म्हणून तुम्ही इथे येता हे मी मान्य करतो, मात्र मराठी राज्यातल्या बेरोजगार तरूणांना डावलून जेव्हा तुम्हाला नोकरी मिळते, तेव्हा संघर्ष अटळच आहे’, असे सांगणे म्हणजे उत्तर भारतीयांना मुंबईत नोकरी मिळू देणार नाही, हे सांगण्यासारखेच होते. राज यांनी ते केले. तरीही ‘कुणाचा दुस्वास करणे हा माझा हेतू नाही, उलट असा दुस्वास होऊ नये अशी परिस्थिती निर्माण व्हावी ही आपली इच्छा अाहे’, हे त्यांचे बोलणे त्यांच्या बेधडक वृत्तीवर प्रेम करणाऱ्यांना कितपत आवडले असेल, हा प्रश्नच आहे. 

 

राज यांच्याविषयी उत्तरेत प्रचंड उत्सुकता असते. ते काय बोलतात, काय आंदोलन करतात यात उत्तर भारतीयांना रस असतो. तिथली माध्यमेही त्याकडे लक्ष ठेवून असतात. अशा परिस्थितीतही राज यांना उत्तर भारतीयांच्या संघटनेने बोलावले याचे श्रेय त्या संघटनेच्या प्रमुखांना द्यायचे की राज यांच्या व्यवस्थापनाला, हा मात्र प्रश्न आहे. या आमंत्रणाचा राज यांनी जो काही राजकीय लाभ करून घ्यायचा तो घेतला आहे. त्यांच्या या कार्यक्रमातून किती उत्तर भारतीय मतदार त्यांच्याकडे वळतील, हा प्रश्न असला तरी उत्तर भारतीयांना त्यांच्या व्यासपीठावर जाऊन सुनावले, या प्रभावात काही मराठी माणसे नक्कीच आली असतील. जगभर स्थलांतराप्रमाणेच अस्मिता, भाषा, संस्कृती व रोजगार यावरून राजकीय रण पेटले आहे. त्याचे संदर्भ राज यांनी आपल्या भाषणात दिले. आपल्या भूमिकेला एक व्यापक आंतरराष्ट्रीय संदर्भ देण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता. ‘आपण ज्या राज्यातून रोजगारासाठी येतो त्या राज्यात तेथील नेत्यांकडून उद्योग सुलभ संस्कृती व पोषक वातावरण का निर्माण केले गेले नाही याचा जाब विचारायला हवा’, हे त्यांचे विधान आज उ. प्रदेशात गोरक्षण, राम मंदिर, शहरांची नावे बदलणे अशा प्रकारचे जे उपद्व्याप राज्यातले बहुमताचे सरकार करत आहे, त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे ठरते.राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या मंचावर जाणे ही एक विचारपूर्वक आखलेली ‘चाल’ आहे. एकीकडे शिवसेना रोजगार, मराठी माणूस या मुद्द्यापासून भरकटत जाऊन राम मंदिरावरून आक्रमक झाली आहे. त्यामुळे राज्यातला काही टक्के मराठी मतदार नाराज आहे. अशावेळी राज यांना मराठी आणि बिगर मराठीच्या मुद्याचे भांडवल करण्याची इतकी चांगली संधी दुसरी कोणती असणार? राज यांनी ती उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर जाऊन साधली.

 

महाराष्ट्राच्या विकासाची ‘ब्लू प्रिंट’ देण्याची भाषा करीत राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाविषयी शिक्षित आणि मध्यमवर्गीयांच्या अपेक्षा वाढवून ठेवल्या होत्या. त्याचा फायदा त्यांना २००९ च्या विधानसभा निवडणुकीत झाला देखील. पण त्या विषयात ना राज ठाकरे ना त्यांचा पक्ष काही आश्वासक करू शकले. त्याचे परिणाम लगेच २०१४ च्या निवडणुकीत मतदारांनी दाखवूनही दिले. त्यामुळे शिवसेना जशी हिंदुत्वाच्या जुन्या अजेंड्याकडे वळाली, तशी मनसेही नवनिर्माणचा मुद्दा जरा बाजूला सारून जुन्या मराठी विरुद्ध उत्तर भारतीय, या आपल्या जुन्या अजेंड्याकडे वळते आहे, याचे ही सभा संकेत देते आहे का, असाही प्रश्न आहे. येत्या काळात त्याचे उत्तर आपोआपच मिळण्याची शक्यता आहे. राज यांच्या या सभेला प्रसिद्धी तर खूप मिळाली. आता काँग्रेस पक्षातील काही वाचाळ मंडळींनी आपल्यावर टीका करावी, अशीही त्यांची अपेक्षा असेल. तसे झाले तर राज यांचा पक्षाच्या नवनिर्माणाचा हेतू सफल झाला समजायचे. यावर काही प्रतिक्रीया उमटल्या नाही तर मात्र, राज यांचे हे उत्तर भारतीय नवनिर्माण फारसे यशस्वी ठरणार नाही, हे सांगणे न लगे. 

बातम्या आणखी आहेत...